नको लागाया नजर..

भाळी रेखलेलं कुंकू
खाली हळद पिवळी
झाला साजरा चेहरा
जशी जास्वंद कोवळी


गळा सजला तन्मणी
काळं डोरलं ओवलं
माझ्या वेड्या राजसाच्या
डोळी सपन हासलं


हाती भरलेला चूडा
सोनहिरव्या वर्खाचा
गोलसर मनगटी
स्पर्श नव्या कंकणाचा


पायी घातले नुपूर
रुणझुण रुणझुण
दारा आडून कुणाचे
खाकरणे; खाणाखूण


राया झाले मी तयार
जरा ढळू द्या ही सांज
कुणी नको ऐकावया
हितगूज; कुजबूज


तुम्ही अधिर आतूर
माझी पावलेही भारी
नको लागाया नजर
स्वर्गसुख माझ्या दारी.