पावसाने मला....*

पावसाने मला भिजवले नाही तरी चालेल.
पण त्याने मात्र जरूर भिजवावे
   'तिला'
   सारखं. जाताना, येताना!
त्याने भिजवावे.
   एकाच छत्रीत जाणाऱ्या 'त्या' दोघांना.
   गल्लीतल्या सगळ्या पोरांना
   जंगलातल्या सगळ्या मोरांना
   मातीतल्या सगळ्या बीजांना
   हिरवळ हरवत चाललेल्या जुन्या खोडांना.
पण पावसाने  भिजवू नये..
  साखर नेणाऱ्या मुंगीला
  गाडी ओढणाऱ्या मजुराला.
पावसाने अजिबात भिजवू नये..
  झाडाला टांगलेल्या झोक्यातल्या बाळाला
  डोक्यावर विटा वाहणाऱ्या त्याच्या आईला
  झाडाखालच्या म्हाताऱ्या चांभाराला!

त्याने  भिजवू नये.......
 दप्तर नसणाऱ्या पोरांच्या वह्या-पुस्तकांना.
 देवळात भजनाला जाणाऱ्या आजीला.
 गुढघे दुखणाऱ्या आजोबांना.

बाकीच्याचं काय करायचं
 ते पावसाने आपलं आपण खुशाल ठरवावं...
 आपलं काय म्हणणं नाय!