मला कळलेच ना आयुष्य का बिलगायला आले
गळाभेटीस आले की गळा कापायला आले
कुणाला मी विचारू जाब माझ्या सर्व वर्षांचा
इथे सारे ऋतू केवळ तिथी बदलायला आले
कशी उमलून येताना पुन्हा कोमेजली स्वप्ने?
कशाला रातराणीला किरण चुंबायला आले ?
अशी ती यायची येथे , मला सांगायची वेडी
"तुला घेऊन जाताना, मला विसरायला आले "
अजूनी हात जे माझ्या खुनाने माखले होते
बघा ते त्याच हातांनी मला उचलायला आले
"अरे मृत्यो, नको लाजू , हवे ते माग तू आता"
मला कित्येक दिवसांनी कुणी भेटायला आले