सकाळी सुहास उठला तेव्हाही त्याचं अंग ठणकत होतं. ब्रश घेऊन तो बाथरुममध्ये गेला आणि.....
पिंकीचा लाडका मनू चकाकत्या डोळ्याने पाहत बेसिनवर बसला होता!!!
सुहासने डोळे चोळले. दुसरं एखादं मनूसारखंच दिसणारं मांजर? पण इतकं सारखं? आणि त्याच्या मानेवर मरताना मनूच्या मानेवर होती तशी जखमेची खूण. सुहास ब्रश घेऊन स्वयंपाकघरात गेला आणि तिथूनच ब्रश करुन दाराला कुलूप लावून बाहेर पडला.
गजाननरावांच्या दारावरची बेल वाजवली तर त्यांनी वाटच पाहत असल्यासारखं दार उघडलं. त्यांचा चेहरा खूप गंभीर दिसत होता.
'ये सुहास. मला माहीत आहे तू मला काय सांगायला आला आहेस.मनू परत आला ना?'
'माहिती नाही तो मनू आहे का दुसरं कोणी..पण मनू परत येईलच कसा? मी या हातांनी त्याला पुरला आहे.'
'जरा निवांत बस. थोडी बिअर घे माझ्याबरोबर.'
गजाननराव सांगू लागले,
'मी तुझ्याइतकाच होतो तेव्हाची गोष्ट.माझा एक कुत्रा होता. मला खूप आवडायचा.एक दिवस तो विजेच्या तारेवर पाय पडून मेला. मी खूप दुःखी होतो. तेव्हा मला माझ्या मित्राने दफनभूमीमागची ती जागा दाखवली आणि तिथे त्या कुत्र्याला पुरायला सांगितलं. मी पुरुन आलो आणि रात्रीच माझा कुत्रा परत माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. चमत्कार म्हण,चेटूक म्हण, तो परत जिवंत झाला होता. पण आता त्याच्यात पूर्वीची धडाडी, चपळता राहिली नव्हती. जिवंतपणी पण तो निर्जीव मांसासारखा वाटत होता. मी त्याला तो मरेपर्यंत सांभाळलं, पण मला त्याच्याबद्दल पूर्वीसारखं प्रेम वाटत नव्हतं तो परत आल्यापासून. एका कर्तव्यबुद्धीने मी त्याला सांभाळले. तुझ्या पिंकीचा मनू परत आला आहे. पण तिला आता तो पूर्वीसारखा आवडणार नाही. पण तिचं मनूवर प्रेम आहे. ती त्याला सांभाळेल.'
'म्हणजे म्हणून काल तुम्ही मला त्याला त्या जमिनीत पुरायला सांगितलं? आणि आता असलेला मनू किंवा जे काही असेल ते मला हवं आहे अशी अपेक्षा केली?मला खरं काय ते कालच का नाही सांगितलं?'
'नाही सुहास, खरी गोष्ट अशी आहे की ज्याने ती भूमी पाहिली त्याला हे गुपित आपल्या जीवनात दुसऱ्या कोणाला तरी सांगावंच लागतं आणि त्याला तिथे न्यावंच लागतं. ती जमिन परत बोलावल्याशिवाय राहत नाही.काल मी तुला काय सांगत होतो माझं मला पण कळत नव्हतं. पण मी तुला खूप मोठ्या संकटात टाकलं आहे. मला माफ कर.' गजाननरावांच्या डोळ्यात पाणी होतं.
सुहासचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो वेगळ्याच तंद्रीत होता. बऱ्याच वेळाने त्याने विचारलं,
'काका, त्या जमिनीत कोणी माणूस पुरला आहे का?'
गजाननरावांच्या हातून ग्लास खाली पडला. 'काहीतरीच काय?असे नसते विचारही करु नकोस आणि घरी जा. मनूला सांभाळ किंवा जर ते जमत नसेल तर त्याला मारुन टाक आणि पिंकीला काहीतरी सांग तो पळून गेला वगैरे.'
सुहास सुन्न अवस्थेत घरी आला. अशा गोष्टींवर एका डॉक्टरने विश्वास ठेवायचा?पण कसा नाही ठेवायचा?मनू किंवा त्याच्यासारखं जे काही आहे ते त्याच्या घरात होतं. शेवटी सुहासने दार उघडलं. मनूला दूध दिलं.
फोन खणखणला. सीमा होती. 'नीट जेवलास का?काळजी घे.रात्री दूध तापवून ठेव.अरे हो, पिंकीला बोलायचं आहे.'
'बाबा, माझा मनू कसा आहे? त्याने खाल्लं का?'
(तुझा मनू मुडद्यासारखा माझ्या समोर बसला आहे. सुहासने चिडून विचार केला.)
'हो बेटा, त्याची काळजी नको करुस.तू नीट खा पी. आजीआजोबांना त्रास नाही द्यायचा. त्यांच्याकडे काही मागायचं नाही. लवकर ये. बाय.'
खोटं बोलणं असह्य झाल्यासारखा सुहासने घाईघाईने फोन ठेवला.
सीमा पिंकी चिनू घरी आले. सुहासला हायसं वाटलं. तीन दिवस त्या मनूबरोबर एकटं घरात राहणं त्याला असह्य झालं होतं.
'बाबा, मनू असा काय सुस्त झालाय? आणि त्याला कसला तरी घाणेरडा मातकट वास का येतोय?'
'मला नाही गं माहित. त्याला नीट अंघोळ घाल. काही दिवसांनी आपोआप जाईल वास.'
असे दिवसामागून दिवस जात होते. बदललेल्या मनूची पण पिंकीला सवय झाली होती. एका रविवारी सीमा आणि सुहास अंगणात बसले होते. पिंकी आत टिव्ही बघत होती. सुहास चिनूला पतंग उडवून दाखवत होता.
'बघ हा असा दोरा धरायचा आणि..तो बघ पतंग उडाला भुर्र!'
चिनूला खूप आनंद झाला. तो टाळ्या पिटायला लागला.
'आता तू धर दोरा हातात. हा अस्सा.'
चिनू बडबडायला लागला, 'चिनू पतंग उलवनार!!' तितक्यात त्याच्या हातून फिरकी गडगडत खाली पडली. चिनू तिच्या मागे धावायला लागला.
पुढून रस्त्यावरून भरधाव येणारा ट्रक सुहासने पाहिला आणि तो पटकन धावला. 'चिनू! थांब!पुढे जाऊ नकोस!'
सुहास अडखळून पडला. पुढे चिनूची किंकाळी, ट्रकच्या ब्रेकचा आवाज हे सर्व ऐकूनही त्याला ऐकू आलं नाही, कारण काय होणार हे त्याला तो पडला तेव्हाच कळलं होतं.
चिनूचा लहानसा बूट फक्त रक्ताने माखून बेवारशासारखा सुहासच्या पुढे पडला होता..