साधारण ५ वर्षांपूर्वीची घटना आहे..
नुकतीच बारावी पास होऊन (चांगल्या मार्क्सनी) मी विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता.. सगळ्या विषयांमध्ये (रसायनशास्त्र सोडून) चांगले गुण मिळाले होते.. नाहीतरी रसायनशास्त्र हा तसा नावडता विषय.. अगदी काठावर उत्तीर्ण व्हायचो..
पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊन एक दोन महिने होतात न होतात तोच सहामाही परीक्षा आली.. आणी नंतर दिवाळीची सुट्टी आली... दिवाळीमुळे परीक्षा दिल्याचा विसरही पडला...
कॉलेज सुरू झाले... आणी तिसऱ्याचं दिवशी रसायनशास्त्राच्या बाईंनी सर्वांच्या उत्तरपत्रिका वर्गात आणल्या.. आता बाई सर्वांसमोर प्रत्येकाला मिळालेले गुण (अगदी घसा ताणून) सांगणार... माझी धाकधूक वाढली...
तसे सर्व विद्यार्थी बाईंना नवीनंच.. मोजक्या लोकांचीच नावे त्यांना माहीत होती... त्यामुळे त्या सर्वांना रोल नंबरनेच बोलावत होत्या.. पाच सहा विद्यार्थ्यांचे पेपर वाटल्यावर अचानक बाई ओरडल्या..
११४४ कोण आहे???... मी आपला शांत.. पुन्हा बाईंनी विचारले..११४४ कोण आहे?.. मी काहीच बोलत नाहीये हे पाहिल्यावर नितिन जाधव नावाचा माझा एक मित्र मला म्हणाला.. "अरे सुम्या.. ऊठ ना. ११४४ तुझाच नंबर आहे.."
मी आपला शांतच.. तिसऱ्यांदा बाईंनी नंबर पुकारल्यावर नितिनच जागेवर उठून उभा राहिला... बाईंनी विचारले.. "काय रे! ११४४ तुझाच नंबर काय?".. नितिनने माझ्याकडे एकवार पाहिले आणी म्हणाला.."हो बाई! तो माझाच नंबर आहे.."
बाईंनी त्याला समोर बोलावले... अगदी त्यांच्या जवळ उभे केले.. आणी उत्तरपत्रिका हातात घेऊन सर्वांना म्हणाल्या.." हा आपल्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा !!.." सगळा वर्ग नित्याकडे पाहू लागला.. नितिन माझ्याकडे बघत छाती फुगवून उभा राहिला...
इतक्यात बाई ओरडल्या.. "अरे लाज नाही वाटत !! शंभर पैकी सहा मार्क्स पडलेत.. आणी विज्ञान शाखेला प्रवेश घेतलास.." नितिनचा चेहरा पांढराफटक पडला.. आपण न केलेली चूक त्याच्या लक्षात आली... बाई ओरडतच होत्या.. आणी सगळा वर्ग नितिनला पाहून हसत होता...
आणी सगळ्यात जास्त मी... अगदी पोट दुखेपर्यंत हसत होतो.... हसून हसून डोळ्यात पाणी आले होते... शेवटी सगळे महाभारत संपल्यानंतर मी नितिनच्या जवळ गेलो आणी त्याला म्हटले.. "म्हणूनच मी उभा राहत नव्हतो.."
या गोष्टीला खूप वर्ष झाली... पण तो प्रसंग अगदी जसाच्या तसा माझा समोर आहे....
आपला सुमित.