स्मृतींचे जुने सूर

कधी अंतरी मेघ दाटून आले...
क्षणार्धात अन् कोवळे ऊन आले!


तयारीत रस्ते तुझ्या स्वागताच्या
जणू सांजरंगांत न्हाऊन आले!


तुझी भेट झाली अचानक इथे, पण...
स्मृतींचे जुने सूर धावून आले!


कथाभाग तो टाळला मी खुबीने
तुला मात्र सारेच समजून आले!


कसे लोक वेडे तुझ्या मैफिलीचे
पुन्हा ऐकण्या ते तुझी धून आले!


कुठे धर्मवेडा विषय काढला मी?
तरी लोक का पाडण्या खून आले?


- कुमार जावडेकर, मुंबई