
या वेळच्या पैचिंग भेटीत अनपेक्षित पणे भिंतभ्रमणाचा योग आला. या आधी दोन वेळा मी भिंतभ्रमण केले होते त्यामुळे यावेळी भिंतीवर स्वारीचा विचार नव्हता, अर्थात वेळही नव्हता. रविवारी सायंकाळी पैचिंग येथे आगमन, सोमवारी पैचिंगमधील एका कंपनीच्या मुख्यालयाला भेट, तिथे बैठक, चर्चा, प्रदर्शनीतील उत्पादनांची पाहणी, दूरगामी व्यापार धोरण वगरे चर्चा. सायंकाळी हॉटेलवर परत. मंगळवारी सकाळी हंग्झौ ला प्रस्थान असा मूळ कार्यक्रम होता. सोमवारी सकाळी ते लोक साडेआठ वाजता न्यायला येणार होते. साडेआठ च्या पाच मिनिटे आधीच आवरून तयार होऊन आम्ही खाली आलो तेव्हढ्यात पानचा भ्रमणध्वनी आला की काही कारणास्तव तो उशीरा येत आहे. तेंव्हाच शंकेची पाल चुकचुकली. साडेनउला पेनी आली व आम्ही त्यांच्या मुख्यालयाकडॆ निघालो. वाटेतच पेनीने शुभवर्तमान ऐकविले की काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक परदेश दौऱ्याहून परतू शकलेले नाहीत, सबब ते आज भेटू शकणार नाहीत. त्यांनी समजावले, दिलगिरी व्यक्त केली तरी आमचा विरस झालाच. इतक्या लांबून आलो आणि भेट नाही. नाइलाज होता. त्यांच्या कचेरीत थोडीफार चर्चा वगरे झाली, काही जुजबी माहिती वगरे देऊन मग साधारण ११.३० लाच आमची भेट संपत आली. मुख्य अधिकारीच नाहीत तर काय चर्चा करणार? पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करींत पेनी म्हणाली की आता काम तर फारच लवकर संपले आहे, तर आपल्याला पैचिंग शहर पाहायला आवडेल का? माझ्या बरोबर आमच्याच समूहातील एका नव्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. तो पैचिंगला प्रथमच येत होता. मग काय? भिंत आणि प्रनिषिद्ध नगर असा कार्यक्रम ठरला. गाडी बादालिंगच्या दिशेने निघाली.
आमच्या आगमनाबरोबरच पैचिंगला थंडीची चाहूल लागली होती. हवेत अतिशय प्रसन्न असा गारवा होता. मात्र वर सूर्य तळपत होता व आकाशही निरभ्र होते. मी विलक्षण खूश झालो. या आधी मी दोनवेळा महाभिंत पाहिली होती, पण पहिल्यांदा गेलो तो मार्चच्या पहिल्या आठवड्यात. तेंव्हा पैचिंगमध्ये ७-८ अंश इतके तापमान होते, म्हणजे शहरा बाहेर बादालिंग पर्वतराजीत साधारण २-३ अंश तापमान असावे. बोचरी थंडी व गार वारा या पेक्षा धुके हे मोठे संकट होते. कमी प्रकाश व दृश्यताही कमी म्हणजे प्रकाशचित्रणाला वाईट परिस्थिती. दुसऱ्यांदा गेलो तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. थंडी नुकतीच संपली होती, परंतु वातावरण धूसर होते, दृश्यता फारशी चांगली नव्हती. आज मात्र सुंदर निळे आकाश, चांगला सूर्यप्रकाश व प्रसन्ना करणारा गारवा होता. योगायोगाने सारथ्याने आम्हाला योग्य स्थळी नेले. वाटेत चुयुंगक्वान खिंड व स्वागताची कमान लागताच मी सावधपणे विचारून घेतले की अजून किती दूर आहे? बस्स, १५-२० मिनिटे हे उत्तर मिळताच मी जाम खूश. अनेक कामचुकार पर्यटन संस्था पर्यटकांना चुयुंगक्वान येथील भिंतीचा भाग फिरवून परत नेतात. इथलाही भाग बघण्यासारखा आहे पण तो फारच लहान व तुलनेने कमी आकर्षक आहे.
खरी भिंत पाहायची तर बादालिंगला. अगदी पहिल्या भेटीत मी बादालिंग भागात पथभ्रमण मार्गाने गेलो होतो, यावेळी आमच्या सारथ्याने आम्हाला थेट लोहरज्जु केंद्रावर आणून सोडले. बादालिंग हे पैचिगंच्या वायव्येला सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. पैचिंगच्या वलय मार्गातून शहराबाहेरचा मार्ग पकडताच थोड्याचे वेळात बादालिंग द्रुतमार्गाच्या पाट्या दिसू लागतात. द्रुतमार्ग अत्यंत सुंदर आहे. बादालिंगला जाताना वाटेत काम सुरू असलेले चीनी डिस्नेलँड दिसते. हळूहळू शहरी भाग मागे पडल्याचे जाणवते आणि दुतर्फा पर्वतराजी दिसू लागते. मग भिंतीची उत्सुकता लागते. मध्येच भिंतीचा एखादा तुकडा पर्वतमाथ्यावर असल्याचा भास होतो, मात्र लवकरच तो भास असल्याचे लक्षात येते. मात्र डाव्या अंगाला भिंत दिसू लागली की समजावे चुयुंगक्वान जवळ आले.
इथे भव्य कमानीखालून प्रवेश करताना उजवीकडे बहिर्गमनाचा फलक दिसू लागतो. एक वळसा घेत तो रस्ता पायथ्याशी असलेल्या प्रवासी कचेरीपाशी पोहोचतो. तिथे प्रवेशपत्र व हवे असल्यास पाणी, पेय, खाद्यपदार्थ वगरे घ्यायचे आणि चढायला सुरुवात करायची. हा भाग तसा आकर्षक असला तरी फारच लहान आहे. मुख्य म्हणजे एकाकी डोंगरावरील भींतविस्तार एकठेपी दृष्टिक्षेपात येत नाही. मात्र वर चढून गेल्यावर पायथ्याशी विस्तीर्ण वाहनतळ, दुकाने व संग्रहालय आणि दोन्ही बाजूला डोंगरावर पसरत गेलेली भिंत दिसते. मात्र भिंतीचा खरा आनंद लुटायचा तर बादालिंगला पर्याय नाही. चुयुंगक्वान पासून बादालिंग जेमेतेम १५-२० किलोमीटर आहे. द्रुतमार्ग न सोडता सरळ पुढे गेले की बोगदे लागता. तिसरा बोगदा बादालिंग बोगदा. तशी पाटी आहे. या बोगद्या बाहेर पडताच बादालिंग भिंत - बहिर्गमन १८ - १ किमी. असा फलक दिसतो. या बहिर्गमनातुन मुख्य द्रुतमार्गु सोडून बाहेर येताच बादालिंग भिंतीची कमान लागते. इथून दोन मार्ग आहेत. एक पायी फिरण्यासाठी व एक लोहरज्जुमार्ग स्थानकासाठी.
जगातील आश्चर्यांपैकी एक समजली जाणारी ही अवाढव्य भिंत सुमारे अडीच हजार वर्षांहून जुना इतिहास बाळगून आहे. नक्की साल सांगणे कठीण असले व वयाबद्दल दुमत असले तरी सुरुवात ही इसवी सनापूर्वी सातशे ते अडीचशे वर्षे या कालावधीत झाली असावी असे मानले जाते. मुळात बांधताना एका सलग भिंतीची संकल्पना नव्हती, अर्थातच चीन हा प्रचंड देश; तेंव्हा संयुक्त राज्य नव्हते वा देश एकसंध नव्हता. उत्तरे कडून येणाऱ्या हूणादी जामातींच्या टोळ्यांपासून संरक्षणासाठी भिंत बांधायची संकल्पना निघाली व तत्काळ प्रकल्प हाती घेतला गेला. या बांधकामात सैनिक, कैदी तसेच सामान्य कारागीर यांचा वापर केला गेला. यान, झाओ आणि छिन या तीन प्रांतात छिंग, हान व मिंग या तीन घराण्यांनी तीन भिंती बांधल्या. इसवीसन पूर्व २३४ मध्ये चौ घराण्यातील सम्राट छिन शिव्हुआंग याने सर्वप्रथम या भिंतींचे एकत्रीकरण करून एका सलग संरक्षक भिंतीची निर्मिती केली.
बादालिंग येथे आज दिसत असलेली भिंत ही मिंग घराण्याने १३६८ ते १६४४ या काळात बांधलेली आहे. ही भिंत उत्तर पूर्व सीमे अलीकडील हैलुंगच्यांग प्रांतातील यालुंच्यांग नदीपासून सुरू होत ल्यावनिंग, हबेइ, अंतर मंगोलिया, शंशी, श्यांशी, निंगशा मार्गे कांन्सु प्रांतात जाऊन संपते. वाटेत छिन्व्हांगताओ येथे तर ती समुद्रकिनाराही गाठते. मिंग राजघराण्याने एकूण १८ वेळा या भिंतीची डागडुजी, विस्तार वगरे केले. त्या काळात युद्धात वापरल्या जाणाऱ्या भाले, तलवारी, बाण इत्यादी शस्त्रांनी सज्ज असलेल्या आक्रमकांना तोंड देण्यास सुसज्ज अशीच ही भिंत बांधली गेली. सरासरी ३० फूट उंची (तीही डोंगरमाथ्यावर)व १२-१५ फूट रुंदी, सखल भागात खंदक, काही अरुंद मोऱ्या, ठिकठिकाणी टेहळणीचे मनोरे, पहारेकऱ्यांच्या चौक्या अशा पद्धतीने ही भिंत बांधली गेली.
शत्रूची चाहूल लागताच मनोऱ्यावरून दूरचे पाहू शकणारे पहारेकरी बुरुजांवर जाळ पेटवून संकेत देत. एक ज्वाळ व एक धूर म्हणजे १०० शत्रू सैनिक, २ धूर म्हणजे ५०० सैनिक, ३ म्हणजे १००० सैनिक असा संकेत होता. दूरवरून ज्वाला व धूर दिसताच तसा संदेश पुढे प्रसारित केला जात असे. अशा प्रकारे शत्रूचा हल्ला होताच आगाऊ सूचना मिळून हल्याच्या प्रतिकारासाठी सैन्य त्या जागी एकवटता येत असे.
देवगिरीच्या किल्ल्याप्रमाणेच शत्रू आत शिरू शकला तो भिंत कमकुवत ठरल्याने नव्हे तर राज्यकर्ते कमकुवत ठरल्यामुळे. नेमक्या याच कारणांमुळे मंगोलियातील युआन घराणे (१२७१ ते १३६८) व मांचुरीयातील छिंग घराणे (१६४४-१९११) ह्या भिंतीचा भेद करून आत येऊ शकले व राज्यकर्ते झाले.

डोंगरमाथ्यावरील तटबंदी पाहताना शिवराय व सह्याद्रीतले किल्ले यांची प्रकर्षाने आठवण होते.
(क्रमशः:)