पहिल्या दोन भेटीत मी पायी चढायच्या मार्गाने गेलो होतो. विस्तिर्ण पायऱ्या चढायला सुरुवात करताना एक गमतीशीर गोष्ट नजरेस पडली. भिंतीच्या पायथ्याला, जिथे चढ सुरु होतो, तिथे कठड्याला लांबच लांब साखळदंड बांधलेले होते व त्याला रेशमी फिती लावलेली हजारो कुलुपे लटकत होती. या दृश्याने माझे कुतूहल जागे झाले. सहलसखीला याबाबत विचारले असता तिने एक मजेशीर हकिकत सांगितली
प्रेमाचे बंधन
या भिंतीवर जर दोन प्रेमिकांनी जर आपली नावे कोरलेले कुलूप चावीबंद केले तर त्यांचे प्रेम त्या कुलुपासारखे बंदिस्त होते व ते कायम एकमेकाच्या सहवासात राहतात अशी एक समज असल्याने हजरो जोडपी इथे भेट देतात व आपले कुलूप लावतात.
चढायला सुरुवात करताना चुयुंग्क्वान भागातील भिंतीला लगेच बऱ्यापैकी चढ लागतो. वाटेत थोडासा सपाट भाग व त्यावर टेहेळणी बुरूज होते. बुरुजाच्या आतून असलेल्या जिन्याने हौशी पर्यटक वर छज्जावर जाऊन आपली छबी उतरवताना दिसत होते.
क्षणभर विश्रांती
इथे थांबून थोडी विश्रांती घेत पुढे दिसणाऱ्या चढाचा व पायऱ्यांच्या संख्येचा अंदाज घेत मग पुन्हा चढायला सुरुवात करायची. एकदा का चढून वर गेले, की वळून खाली पाहायला मजा येते. आपण बरेच वर आल्याचा आनंद मिळतो. मस्त गार वारा खात आजूबाजूला पाहत सर्व दिशांचे दृश्य न्याहाळणे हा एक मस्त अनुभव आहे.
वाडा चिरेबंदी
मध्येच एखाद्या रुंद भागावर पसरट पायावर मजबूत वाडा बांधलेला दिसतो. हे वाडे भिंतीवर पहारा करणाऱ्या सैनिकांच्या वरील सरदार वा अधिकारी मंडळींना राहण्यासाठी बांधलेले होते. दुमजली वाडा, लाकडी तक्तपोशीचे मजबूत कौलारू छत, छपराच्या टोकांना असलेल्या लाकडी तुळईच्या बाह्यदर्शनी भागावर प्राणी, ड्रॅगन व सरदार यांच्या आकृतीची नक्षी दिसून येते. या पद्धतींची नक्षी भिंत, प्रनिषिद्ध नगर, राजवाडा व अनेक वास्तूंमध्ये दिसून येते.
थेट 'वरती'
जर वर पायी चढून जाण्याइतका वेळ नसेल, वा पायी जाणे शक्य नसेल तर थेट वरपर्यंत गुज्जुमार्गाने, नव्हे रज्जूमार्गाने जाण्याची सोय बादालिंग भिंतीवर आहे. (प्रशस्त देहाच्या गुर्जरांना पायी चालणे साफ नामंजूर असल्याने ते जिथे थेट पर्यंत वाहन जाऊ शकते, जिथे खायला मुबलक मिळते व बाजारभावही कळू शकतो अशाच ठिकाणी ते जातात असे एक निरीक्षण आहे)
यावेळी झटपट भेटीचा कार्यक्रम असल्यामुळे आम्हीही रज्जुमार्गाने वर माथा गाठला. हवामान अनुकूल असल्याने भिंत पाहायला मजा आली आणि प्रकाशचित्रणाचा आनंदही मनसोक्त घेता आला.
सळसळती नागीण
रज्जुस्थानकावरून उतरून जरासे खाली डाव्या बाजूला आलो, तर मोठे विहंगम दृश्य नजरेस पडले. हिरव्यागार गर्द झाडीतून डोंगरमाथ्यावरून नागमोडी वळणे घेत जाणारी भिंत सळसळत जाणाऱ्या नागिणीसारखी भासत होती.
साप-शिडी
पुढे जाऊन भिंत चढून वर गेलो. टोकाला जाताच आजूबाजूला लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा व त्यांच्या अंगावर खेळणारी अखंड भिंत, कधी उभी तर कधी आडवी पळत होती. ते दृश्य साप-शिडीच्या पटाची आठवण करून देणारे होते.
संगम
प्रत्येक वेगळ्या अंगाने वेगळे दृश्य उलगडत होते. पूर्वेच्या दिशेने लांबवरून येणाऱ्या दोन भिंतींचा संगम झालेला दिसत होता. या भिंती अगदी दूर व अवघड जागी असल्याने तिथे पर्यटकांची वर्दळ नसणे स्वाभाविकच होते. त्यामुळे या भिंतींवर वर रुंदीभर गवत व लहान रोपे पावसात रुजली, वाढली होती आणि भिंतीवर चालायचा रस्ता हिरवागार दिसत होता.
घाटबंदी
तटाच्या जरा पलीकडे जाऊन पाहिले तर मी उभा होतो तिथून जरा पुढे भिंत एक वळण घेत खाली पायथ्याकडे झेपावत पुन्हा पुढच्या पर्वतमाथ्याच्या दिशेने जाताना दिसत होती. ती अथांग तटबंदी डोंगर पार करून जाणाऱ्या घाट्मार्गासारखी दिसत होती.
क्रमशः