परवा बाजारातून घरी येताना असं दिसलं कि, रस्त्यावर एक कुटुंब पाहिल. काहितरी एकमेकाना दाखवत त्यांची आपापसात चर्चा चालली होती. मी सुद्धा कुतुहलापोटी त्यांच्या बाजूला उभा राहून ते काय पाहतायत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं कि तिथे एक बोर्ड लावला आहे ज्यावर त्या विभागातल्या सर्व इमारतींचं नेमकं स्थान(लोकेशन) दाखविलं आहे, पण नाव न लिहिता नुसते भूखंड क्र. टाकले होते. आणि ते कुटुंब त्यातून ते रहात असलेली म्हणजे 'आपली' इमारत शोधण्याचा प्रयत्न करत होते.
कसं असतं नाही माणसाचं? प्रत्येक ठिकाणी काहितरी आपलं शोधण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. मग तो टिव्हीवरचा एखादा कार्यक्रम असो वा क्रिकेटच्या मैदानावर चाललेली मॅच असो. टिव्हीवरचा कार्यक्रम बघता बघता आपले डोळे प्रेक्षकांत बसलेल्यांमध्ये 'आपलं' कोणी दिसतंय कां हे शोधत असतात. किंवा घरच्या टीव्हीच्या मैदानावर मॅच अगदी रंगात असते, सचिनची चौफेर टोलेबाजी चालू असते, तो शतकाच्या उंबरठ्यावर असतो. आपणहि हे सर्व एंजॉय करत असतो. पण आपला एक डोळा मात्र त्या एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांत 'आपलं' कोणी दिसतयं कां ते शोधीत असते.
एखाद्या लग्नसमारंभात जा. शेकड्यानी माणसं तिथे असतात, काही ओळखीची, काही अनोळखी. असे लग्न समारंभ म्हणजे खरतर नवीन ओळखी करून घेण्याची संधीच असते. पण तिथेहि आपली नजर आधी शोधते ती 'आपल्या' पैकी कुणी आलंय कां?
प्रल्येक ठिकाणी आपलं कोणी दिसलं कि, त्या माणसाला परमानन्द होतो पण नाहीतर त्याला एवढी माणसं आजूबाजूला असूनही एकटं पड्ल्यासारखं वाटतं.
माणसाचा हा आपलं माणूस शोधण्याचा प्रयत्न जीवनभर चालूच असतो. ज्याना ती आपली माणसं सापडतात ते आनंदित होतात. ज्याना ती सापडत नाहीत ती आयुष्यभर त्याना शोधत रहातात. काही माणसाना ती सापडतात पण कधीकधि अचानक हरवतातहि. मग ती परत शोधाला लागतात.
खरंच आपलं माणूस किंवा आपलं काहीतरी ही किती महत्त्वाची आणि आनंददायी बाब आहे नाही?