मोगरा माझा

नजरेत मिसळली नजर राजसा तेव्हा
तो क्षणही थांबला होता
शब्दाविण तू बोललास तेव्हा
पाऊस थांबला होता


घनव्याकुळ डोळ्यांमधला
मी प्रश्न पाहिला होता
रुकार तेव्हा नकळत माझ्या
कसा उमटला होता


तुझा वितळता कानी माझ्या
सूर वाजला होता
रजनीच्या अन् कुशीत तेव्हा
मोगरा बहरला होता


तोच मोगरा दारी माझ्या
कसा कोमेजला होता
आवेग तुझ्या उबदार मिठीचा
आज ओसरला होता


माळियाने कसा अपुला
वृक्ष दुर्लक्षिला होता
नजरेत या रे आसवांचा
पूर दाटला होता


आसवांचे अर्ध्य पिऊनी
मोगरा फुलणार होता
जागवाया गंध त्याचा
तू पुन्हा येणार होता


जयश्री