आयुष्यात पहिल्यांदाच एक भक्तिरसातील रचना झाली. माझ्यासाठी ती एक वेगळी अनुभूती होती. योगायोगाने ती गझलेच्या वाटेने गेली. अशा रचनेला गझल म्हणता येईल कां याबद्दल तज्ञांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. कृपा करावी.
तुझ्या पायरीला जीव हा जडू दे
स्वप्न ओंजळीला कृपेचे पडू दे
हात रंगलेले कर्दमी पापांच्या
तुला जोडताना मला अवघडू दे
मन साचलेले गाभारी ढाळता
आर्त अभंगांचा सूर सापडू दे
खडे षड्-रिपूंचे जीवी मिसळले
ज्ञानाच्या सुपाने जरा पाखडू दे
दोन श्वासतरी सोनियाचे व्हावे
संग परीसाचा संतांचा घडू दे
जन्म तुझ्यापूनी दूर दूर गेला
आठवूनी आता मोकळे रडू दे
बोलावया जाता तुझ्या नामाविण
मनातला शब्द ओठात अडू दे
येथून नुरावे तुझ्याविण काही
इथे पायापाशी मीपण झडू दे