कधी प्रेयसी, कधी असे ती हट्टी दुहिता
शब्दथव्यांची किलबिल आहे माझी कविता ॥धृ॥
कधी खळाळे निर्झर होऊन पानोपानी
अल्लड, अवखळ अर्थहीनशी येई कानी
कधी शांत अन् निश्चल असते सरोवरासम
तरंग उठती अर्थछटांचे जिथे विहंगम
कधी सुवासिक आम्रमंजिरीचुंबित वारा
कधी शिरी आघात करी ह्या अक्षरगारा
कधी मेघ ती होऊन वर्षे रिमझिम रिमझिम
तनामनाला भिजवून जाई माझी कविता ॥१॥
कधी दिसे ती सालंकृतसी रूपगर्विता
कुंजवनातील रासरंजना सखी गोपिका
लंकेची ती कधी पार्वती होऊन येते
पौलस्त्याचा उपवनातली विरही सीता
कधी पुरंध्री, कधी कामिनी, कधी योगिनी
कळे न मजला रूप बदलते कोणाकरिता
क्षणोक्षणी पण रंग बदलते माझी कविता ॥२॥
कळे न अजुनी कोण आपला, कोण परावा
अजून अनुभव आयुष्याचा कमी असावा
कसे जमावे गंगेसम तिज विशाल होणे ?
मिणमिणणाऱ्या पणतीला ह्या मशाल होणे ?
काव्य न केवळ ते शब्दांचे हमाल होणे
किनारपट्टीची ती केवळ वाळू ओली
कशी सागराची यावी तिज अथांग खोली ?
गाज होऊनी गरजत नाही माझी कविता ॥३॥