गोवा जंगल ट्रेक

गोवा ट्रेक

गोवा म्हटले की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतो तो गोव्याचा निसर्ग आणि समुद्रकिनारा.
हे गोव्याचे आकर्षण. बहुतेक म्हणूनच गोव्यामधे भारतीय पर्यटकांपेक्षा फॊरेनर्स जास्त बघायला मिळतात. गोव्याच्या खास वैशिष्ट्यांमधे येथील इतिहास आणि फूड यांचाही समावेश होतो. पेपरमधे गोवा ट्रेकची जाहिरात झळकली आणि बरेच दिवस शांत असलेल्या गिर्यारोहक मनाने उचल खाल्ली. डोंगरदर-यांतील स्वैर भटकंती म्हटली की आठवते सह्याद्रीचे खोरे. थोडं दूरचं पर्यटन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो बर्फाच्छादित काश्मिरचा प्रदेश किंवा अगदी दक्षिणेकडचा केरळचा निसर्गरम्य प्रांत. पण अशीच स्वैर भटकंती गोव्याच्या जंगलातही करता येते हे वाचून आश्चर्यच वाटले. हा काय प्रकार आहे बघण्यासाठी लगेचच नावे युथ होस्टेलकडे सुपूर्त केली. फोन खणखणले आणि आमचा ८ जणांचा ग्रुप तयार झाला. यापैकी आम्ही ६ जण मुंबईचे होतो आणि बाकी दोघे जण दिल्ली मधून येणार होते. मी पहिल्यांदाच अशा एका ग्रुपबरोबर जात होते. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक मी आणि बाबांनीच केले आहेत. मनात थोडीशी भीती होती..... ग्रुप कसा असेल??????? मी त्यांच्यात फीट बसू शकेन की नाही??????? असे हजार प्रश्न माझ्या मनात घिरट्या घालत होते. आम्ही एकदम प्रवासाच्या दिवशीच एकमेकांना भेटलो. ट्रेन मधेच माझी या सर्वांशी ओळख झाली आणि मग काय विचारता....बास, फूल टू धम्माल!!!!!!!! या सगळ्यांच्यात मी एकदम फीट बसले. मला हा ग्रुप खूप आवडला. पल्लवी, प्रशांत, रवी, मनिषा, निधी ,निशांत बाबा आणि मी..........असा हा आमचा ८ जणांचा ग्रुप होता. खरं तर यूथ होस्टेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमुळे मला आज एवढे चांगले मित्र, मैत्रिणी मिळाले. तसेच गोव्यातील काही नवीन ठिकाणांची ओळख देखील झाली जसे कुवेशी, अटाली, वेलसाव....... ट्रेकिंग करण्याचा हाच एक फायदा असतो....ज्या ठिकाणी आपण एक पर्यटक म्हणून कधीच जाऊ शकत नाही तेथे एक ट्रेकर म्हणून जायला मिळते.....ही सर्व ठिकाणं आड जंगलात वसलेली आहेत ....म्हणूनच यांचे निसर्गसौंदर्य आजही टिकून आहे.
आम्ही सकाळी ११.०० च्या सुमारास गोव्यात पोहोचलो. शेती बागायती, नद्या, गावं आणि निसर्गातल्या विविधतेचं धावतं दर्शन घेत रेल्वेमधे वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. तसेच यांच्या सोबतीला गप्पा देखील होत्या की........ गोव्यात पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही बेस- कॆंप गाठला. रिपोर्टिंग केले. थोड्या वेळाने आम्ही आसपासच्या भागात मस्त फेरफटका मारून आलो. त्या दिवशीच्या कॆम्प फायरमधे शिरस्त्याप्रमाणे यूथ होस्टेलचे ध्येय, नियम हे सोपस्कार पार पाडले.

आज कॆंपचा दुसरा दिवस......सरावासाठी आम्हाला संपूर्ण मिरामार बीचला प्रदक्षिणा घालायची होती. आम्ही सकाळी ७.०० वाजता जड सामान पाठीवर घेउन चालावयास सुरवात केली. पहिले तर आम्ही खुपच एन्जोय करत, गप्पा मारत अगदी हातात हात घालून चालत होतो. पण जसजशी उन्हं चढत होती तसतसे त्या तळपत्या वाळूतून चालणे नकोसे वाटत होते. हळूहळू आमच्यातही ग्रूप पडायला लागले. कैंपवर पोहोचेपर्यंत १२.३० वाजून गेले होते. सर्वांना सणकून भुका लागल्या होत्या. आम्ही सगळे ताटं,वाट्या, भांडी जे मिळेल ते घेऊन टेबलपाशी धाव घेतली. आणि सगळ्यात मोठी हाईट म्हणजे आम्ही ८ जणं ८ ही दिवस एकाच ताटातून जेवत होतो. कह ते हैं इससे दोस्ती बढती है!!!!!!!! खरे आहे !!!!!! पण आम्ही मात्र आळस म्हणून ....... पुराव्याखातर फोटो सुद्धा काढून ठेवले आहेत.
जेवण झाल्यावर आम्हाला डॊल्फीन राईडसाठी नेले होते.
' डॊल्फीन राईड ' म्हणजे आम्हाला एका बोटीतून समुद्राच्या मध्यभागी नेण्यात आले आणि तेथूनच डॊल्फीन्सचे दर्शन घडवले. जवळ जवळ ६/७ जोड्या तरी आम्ही पाहिल्या ते पण अगदी जवळून.......एक वेगळाच अनुभव मिळाला. असे अनेक नाविन्यपूर्ण अनुभव आम्ही ट्रेकर्स नेहमीच गाठीशी बांधत असतो. प्रत्येक ट्रेक आम्हाला काही तरी नवीन शिकवून जातो......आयुष्यभर जतन करता येतील अशा आठवणींचा खजिनाच देतो. डॊल्फीन राईड संपल्या नंतर संध्याकाळच्या सुमारास समुद्रकिना-यावर छान गप्पा रंगल्या होत्या. शहरातील तणावपूर्ण जीवनातून एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही सर्व एकत्र आलो होतो..... मजा, मस्ती आणि फक्त धमाल करायला. संध्याकाळ झाली आणि कैम्पवर परतायची वेळ कधी आली ते कळलेच नाही. रात्री जेवणानंतर आम्हाला ब्लॆंकेट देण्यात आली. रात्रीची थंडी देखील वाढत होती. दिलेल्या रजईत आम्ही लगेच गुडूप झालो तसे आमचे दिवसभराचे परीश्रमही होते.

कैम्पवरचा तिसरा दिवस.... आजचा कार्यक्रम थोडा निराळा होता . दिवसाची सुरूवात आम्ही व्यायामापासून केली. पहिले जॊगिंग मग व्यायाम. वाय.एच.ए. { युथ होस्टेल असोसिएशन ओफ इंडिया } चे काही नियम खरेच खूप छान असतात. यामधून बरेच काही शिकायला मिळते......जसे शिस्त, व्यायामाचे महत्व, वेळेच बंधन , सगळ्यांच्यात मिळून मिसळून रहाणे , वेळ पडली तर आपल्या साथीदारास मदत करणे...... ट्रेकिंग माझ्याच नकळत मला बरेच काही शिकवून जाते.

२१ डिसेंबर ....... ट्रेकचा पहिला दिवस ..... म्हणजे आज आम्ही ट्रेकिंगच्या मार्गावर प्रयाण केले .

पहिला दिवस -: बेस कैम्प ते वेलसाव असा रूट होता.
ट्रेकच्या दिवशी गरजेपुरते सामान घेऊन हायर कैंपला जायला निघालो.
खास बात म्हणजे आम्हाला पूर्ण ट्रेक मधे एक पण गाईड देण्यात येणार नव्हता. कैंप सोडताना ही बातमी ऐकून पहिले तर धडकीच भरली. पुन्हा एकदा मनामधे हजार प्रश्नांनी गलका केला.......गाईड नाही????? आता आपले कसे होणार???????? कोणी रस्ता चुकले तर ????????
आणि मी जर वाट चुकले तर !!! काय होईल ??? एक ना दोन हजार प्रश्न!!!!!!!! पण कैम्प लीडरने सांगितले की संपूर्ण रूटमधे आम्ही ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवले आहे .......यात घाबरण्यासारखे काहीच नाही. फक्त तुम्हाला ते नीट बघत चालायचे आहे....एवढी खबरदारी तुम्ही घ्या की मग काळजीचे काहीच कारण नाही. लीडरने एवढे सांगूनही आमची काळजी काही कमी झाली नव्ह्ती. { मी म्हटले होते ना.....प्रत्येक ट्रेक काही तरी नवीन शिकवतो. }
लीडर्सची भाषणे संपल्यावर आम्हाला कैंप सोडायची अनुमती मिळाली. सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आम्हाला सी-ऒफ केले ..... कैंप सोडताना प्रत्येकाने मनात प्रार्थना केली...... ट्रेक सुखरूप पणे पार पडण्याची........

बेस कैंप ते वेलसाव हे १४ कि.मी. चे अंतर होते. यात पहिले ९ कि.मी. जंगलातून रस्ता होता आणि उरलेले ५ कि.मी. बीच वरून चालायचे होते......म्हणजे वेलसाव बीचवर आमचा कैंप होता. तेथे पोहोचेपर्यंत ४.०० वाजले होते आणि ब-यापैकी दमछाकही झाली होती. लीडरने वेलकम ड्रींक देऊन आमचे स्वागत केले. कांऊटिंग घेऊन सर्वांची ओळख करून घेतली. दुस-या दिवशीच्या शेड्यूल विषयी सर्वांना इन्फॊर्म केले.

दुस-या दिवशी संपूर्ण बीचवरून चालायचे होते.
हे ऐकून सगळेच सुखावले....मस्त वाळूतून, पाण्यातून मजा करत जाता येइल असे वाटून आम्ही दुस-या दिवशीच्या प्रवासाची स्वप्नं रंगवत झोपी गेलो.
रूट होता वेलसाव ते बेनॊलीम बीच.
{अंतर जवळ जवळ १२ कि.मी. }
सुरवातीला वाळूतून, पाण्यातून खेळत, गाणी म्हणत जाण्यात फार मजा आली. पण आम्हाला ही गम्मत फार काळ लुटता आली नाही.
ते म्हणतात ना..... " सोचा था क्या....क्या हो गया ....क्या हो गया " अशी अवस्था झाली.... कारण थोड्याच वेळात समुद्रावरून येणा-या थंडगार वा-याने गरम गरम झुळूकांचे रूप घेतले....पायाला शीतल, मुलायम वाटणारी रेती आता तळपत होती..... समुद्र किनारा, त्याच्यावरून चालणॆ वगैरे यात काही नावीन्यच उरले नव्हते. ते तर आमचे रूटिन बनले होते. तसेच निसर्ग सोंदर्य देखील दिसत नव्हते. बास !!! दूर दूरवर पसरलेला समुद्र. बाकी काहिच नाही....कसेबसे स्वत:चे मन रमवत आम्ही अंतर कापत होतो.
मग मधेच प्रशांतचे व्हिडिओ शूटिंग सूरू होई आणि आमचे मॊडेलिंग.......
परंतु समुद्रकिनारा काही संपण्याचे नावच घेत नव्हता.
आज आमच्यात ४-४ असे ग्रुप पडले होते. मी, पल्लवी, मनिषा आणि प्रशांत असे एकत्र होतो तर दुसरीकडे निधी,निशांत, रवी नि बाबा एकत्र झाले होते.
ते आमच्यापेक्षा बरेच पाठी पडले होते. जवळ जवळ ३-४ तासांची मोठी गॆप पडली होती. या रूटवरून चालताना आम्हाला गोव्यातील अनेक छोटी छोटी गावं बघायला मिळाली. आकाशाला भिडलेली उंच नारळाची झाडं, वृक्ष, फुलझाडं अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने ही गावं नटलेली आहेत. कमर्शियल वारे न लागल्यानेच इथले सौंदर्य अबाधित आहे. या गावाच्या जवळ गोव्यासारखं मोठं राज्य वसलेलं असूनही याने आपले ' गावपण ' अजूनही जपले आहे , हे विशेष . कोकणचं वर्णन करताना गो.नी.दांडेकरांनी एका ठिकाणी म्हटलयं, " कोकणच्या भूमीत एवढं अफाट सौंदर्य आलं कुठून ? का ते मूळचंच होतं ? पाण्याची प्रचंड मिठी पडताचक्षणी ते उन्मळून आलं...." गावाच्या वेशीवरून फिरताना गोनीदांच्या या वाक्याची आठवण होते.
बघता बघता बेनोलीम कैंपवर पोहोचलो सुद्धा. सूर्याची किरणं बेनोलीमचा समूद्र सोनेरी करून टाकत होती. तेथे सगळ्यात आधी आम्हीच चौघे पोहोचलो होतो. आता हे लोक २-३ तास तरी येत नाहित असे वाटून जरा पेट-पूजा करायला आम्ही कैंपच्या शेजारी असलेल्या शॆक्स{ होटेल } मधे गेलो. येथील बीच वरच्या रेस्टोरंट्सना लोकल लोकं 'शॆक्स 'असे म्हणतात. तेथे वेगवेगळे फीशच्या प्रकारांची चव चाखली. { तसा टेस्ट मधे काही फरक जाणवलाच नाही हा भाग वेगळा.} मला मात्र वरण-भाता पुढे हे जेवण अगदीच फीके वाटत होते. पण गोव्यात येऊन गोवयन फूड नाही खाल्ले तर काय खाल्ले!!!!!
गोव्याची स्पेशॆलिटी फीश करी आणि राईस ते मात्र मला भारी आवडले.
बाकी फूडही छान होते. काही तरी नवीन ट्राय करून पाहिले.
थोड्यावेळाने आमचं पब्लिक येताना दिसू लागलं. तब्बल दोन तासांनी. बेनोलीम बीच वर आम्हाला पाण्यात मनसोक्त डूंबायची मुभा मिळाली आहे; हे ऐकताच सगळ्यांनी समुद्राच्या दिशेने धाव घेतली. मनसोक्त पाण्यात डूंबलो.... २/३ तास तरी आम्ही पाण्यातच होतो. नंतर सगळ्यांना सपाटून भूक ही लागली. जेवण तयार व्हायला अजून वेळ होता. मग सगळे पून्हा एकदा बीचवर फेरफटका मारायला बाहेर पडलो. बेनोलीमच्या समुद्रकिना-यावर बसून सूर्यास्त पाहताना ' निळ्या-जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे ' या कवितेतील ओळींचा प्रत्यय येतो. एकीकडे प्रकाशदाता जलाखालच्या घरी जात असताना मागच्या बाजूने चंद्रोदय होत असतो. समुद्रकिनारी वसलेल्या या गावात वीज आली असली तरी वीजेचा झगमगाट इथे नाही. त्यामुळे काळोख पडल्यावर चंद्राचा प्रकाश बेनोलीमचा समुद्रकिनारा उजळून टाकतो. रात्री ७.०० च्या सुमारास आम्ही डिनर आणि कैंप फायर दोन्ही उरकले आणि आपापले ब्लैंकेट घेऊन झोपायला गेलो. परंतू समुद्राच्या त्या घोंघावणा-या आवाजाने आम्हाला झोपूच दिले नाही. रात्री परत प्रोग्राम ठरला. किना-यावर फेरफटका मारण्याचा. वाह!!! ही कल्पना कोणाची होती ते नाही आठवत पण ज्याची असेल त्याला दाद दिली पाहिजे...... ते क्षण आम्ही ग्रूप मेंबर्स कधीच विसरणार नाही.
आम्ही बीचवर बसून चंद्रोदय पाहत होतो. शुभ्र चांदण्यांनी आकाश भरलेलं असतं तेव्हा किना-यावरची वाळू त्या प्रकाशात चमकून उठते आणि किना-यावरची पांढरी शुभ्र वाळू चंदेरी भासू लागते. ओहटीनंतर अनेक रंगी शंख-शिंपल्याची नक्षी पांढ-या वाळूवर पसरते. वाळूवर उठलेल्या खुणा भरतीच्या वेळी पाणी किती बाहेर आलं होतं आणि किना-यावर लाटा कशा फिरल्या होत्या, याची साक्ष देतात. रेड कार्पेट हा शब्द आपण नेहमीच उच्चारतो पण बेनोलीमच्या किना-यावर वाळूचं पांढरं कार्पेट असं काही पसरलयं , की नकळतच चपला हातात घेऊन आपण चालू लागतो.

इतर ट्रेक्स प्रमाणे इथेही सकाळी ५.०० वाजता बेड-टी दिला जायचा. ७.०० वाजता ब्रेकफास्ट करून ८.०० वाजता हायर कैंपला प्रयाण असा सकाळचा कार्यक्रम. आज अम्ही दूधसागर वॊटरफोल येथे जाणार होतो. तसेच आजचे अंतर जरा जास्त होते. आज आम्ही जवळपास १८ कि.मी. चालणार होतो. सर्व तयारी झाली. आम्ही आमच्या हावर्स सैक घेऊन तयार होतो.नेहमी प्रमाणे तेथील लीडरने ही आम्हाला निरोप दिला आणि अंगात जोश निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा देत आम्ही हायर कैंपसाठी प्रयाण केले. संपूर्ण रस्ता जंगलातील होता. वाटेत बरेच चढ-उतार आले. बरेच क्लाइंबिंगचे स्पॊट्स देखील आले.
बेनोलीम बीचचा निरोप घेऊन डोंगरद-यांमधल्या वळणदार चढ उतारांच्या वाटांनी आगेकूच करत होतो.
दूधसागरला जातानाचा अर्धा रस्ता तर रेल्वेच्या रूळावरून होता. तिथे मनसोक्त फोटो काढून घेतले. कॆमॆ-याशिवाय पिकनिक ......कभी नही !!!
बाबा तर एका फोटोसाठी रूळावर देखील आडवे झाले होते.
मग पुन्हा एकदा जंगलतील पायवाट धरली. या वेळेस मात्र आमच्या बरोबरचे ३ जण जंगलात हरवले. हे ऐकून तर सर्वांना धडकीच भरली. लीडरने तसेच ग्रूपमधील इतर मुलांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ. आता कैंप्वर पोहोच्ल्याशिवाय दुसरे काहीच हातत नव्ह्ते. आम्ही मात्र मग सगळे जण एकमेकांना पकडूनच चालत होतो. एक तर ते घनदाट जंगल ...त्यात तर जर कोणी हरवले तर त्याला शोधणे अशक्यच !!!!!!
यूथ हॊस्टेलने केलेल्या खूणा शोधत शोधत दूधसागरपाशी पोहोचलो.तर बघतो तर काय !!! ते तिघे जण आमच्या आधीच तिथे येउन पोचले होते..... गावक-यांनी त्यांना रस्ता दाखवला आणी तेथे आणून सोडले. त्यांना बघुन आमच्याही जीवात जीव आला.
चारही बाजूंनी दाट जंगलाने आम्हाला वेढले होते. या जंगलात जनावरे देखील बरीच आहेत असे तिथल्या कैंप लीडरने आधीच सांगून टाकले. म्हणूनच कोणाला जंगलात एकेकट्याने भटकण्याची मुभा नव्हती. जाताना कमीतकमी चार/पाच माणसांनी तरी एकत्र जायचे, असा नियम होता. तेथे पोहोचल्यावर कळले कि आपण बेनोलीम किंवा वेलसाव बीच वर किती सेफ होतो .
संध्याकाळी ६.०० वाजता जेवणं उरकली आणि ६.३० वाजता कैंप फायर संपवून आम्ही झोपी गेलो. आजचे अंतर जास्ती असल्याने सगळेच थकलो होतो.
आम्ही जिथे उतरलो होतो तिथे समोरच पण दूरवर नदी वाहत होती. रात्रभर आम्ही नदीच्या खळखळणा-या पाण्याच्या आवाजात बुडून गेलो होतो.
या ट्रेकमधील प्रत्येक ठिकाण आमच्यासाठी खास होते. प्रत्येकाचं वैशिष्ट्य निराळं. येथे शीळ घालणारा वारा शीण घालवतो. जंगलातील या परिसरत नीरव शांतता पसरली होती. पक्ष्यांचे कितीतरी प्रकारचे आवाज आम्ही येथे ऐकले. या सर्व गोष्टी रोमांचक होत्या पण तितक्याच भीतीदायकही. एकदा मनात विचार येउन गेला की समुद्रकिना-यावरील कैंप्स यापेक्षा कितीतरी पटीने चांगले होते.
जंगलातील शांतता, भन्नाट वारा, तेथील सन्नाटा मनावर दडपण आणत होते. तेथे निदान २४ तास समुद्राचा घोंघावणारा आवाज तरी सोबतीला होता. या समुद्रकिना-यांची गोष्टच वेगळी होती.
सकाळ होताच आम्ही टेंट्सच्या बाहेर पडलो तेव्हा बघतो तर काय, धुकाचा दाट गालीचा टेंट्सवर पसरलेला होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात ते जंगल असंख्य निसर्ग देखाव्यांनी संपन्न वाटत होते. जणू काही सतत खुलत जाणरं, मनाला भुरळ घालणा-या सृष्टिसॊंदर्याचं नवनवीन दालनचं !!!
यांस साजेसा शब्द साज चढवणं अशक्यच.
अपने बस की बात नहीं !!!
अशा या सुखद थंडीत शाली ओढून गरमागरम चहाचे घुटके घेत टेंटच्या बाहेर गप्पाष्टके करीत आम्ही निवांत बसलो होतो. तेवढ्यात लीडरने शिट्टी वाजवली...... एखाद्या सुखद स्वप्नातून उठवल्यासारखे भासले....
आज दूधसागर वॊटरफॊलच्या जवळून चालावयाचे होते. आम्ही ते पहायला फारच उत्सुक होतो. ती वाट थोडीशी आड वळणाची होती. तेथे अर्धा-पाऊण तास थांबल्यावर आम्ही आमच्या मार्गाला लागलो. आजून थोडा वेळ त्या तलावाच्या काठी आराम करण्याची आमची मनापासून इच्छा होती. पण आता जर उशीर केला तर पुढच्या कैंपवर पोहोचायला उशीर होईल हा व्यवहारी विचार करून आम्ही चालू पडलो.

येथून निघताना लीडरने पून्हा एकदा सावध केले " एकमेकांमधे अंतर पडू देऊ नका, ग्रूपमधे रहा, एकेकटे चालू नका, येथील घनदाट जंगलात हरवलात तर बाहेर पडणे मुश्किल आहे " असे तो परत परत सांगत होता.
तसेच या जंगलात जंगली जनावरे असल्याचीही त्याने आठवण करून दिली. हे ऐकताच सर्वजण शांतपणे सावधतेने त्याचं ऐकू लागले , "
तुम्ही या प्राणांच्या घरात शिरला आहात, ते कदाचित तुम्हाला दिसणार नाहीत पण त्यांचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवेल. कदाचित एखाद्या झुडपा मागून ते आपल्याला बघतही असतील." हे ऐकताच अंगावर काटा आला. नजर दूरवर पसरलेल्या जंगलात, आजुबाजूच्या झाडा-झुडपांमधे फिरू लागली.
काही जण मस्करीत, टेर खेचण्यासाठी निरनिराळे आवाज काढू लागले.
आम्ही जनावरांच्या काही पाऊलखुणा देखील बघितल्या. यावरून जंगलातील त्यांचे अस्तित्व जाणवत होते. अस्वलाच्या गुरगुरण्याचा आवाजही ऐकला पण दर्शन दुर्लभ होते.
लीडरचे एकीकडे भाषण चालूच होते..... हे पग मार्क्स या या प्राण्याचे आहेत. हे ठसे ताजे वाटत आहेत म्हणजे सकाळी किंवा पहाटेच्यावेळी हे जनावर येथे फिरकले असणार वगैरे वगैरे...
या सर्व गोष्टी प्रत्यक्षात अनुभवणं फारच रोमांचकारी होतं, ते आजमावण्यासाठी प्रत्येकाने एक्दा तरी जंगलाची वाट धरावी.

पुढे आमचा प्रवास होता...अटाली च्या दिशेने..... हा रस्ता फारच सोप्पा आणि सरळ होता. एकही क्लाइंबिंग नाही.... आरामात गप्पा मारत, हातात हात घालून आम्ही चलत होतो..... या रूटवर खूप एन्जोय केले कारण आधीच्या प्रत्येक रस्त्यावर अथक परिश्रम घेतले होते . अटालीमधील रात्रीचे चांदणे बघत बाराच वेळ आम्ही बसलो होतो... गाणी गात होतो. थंडी मी म्हणत होती पण ती मैफल सोडून जाण्याची कोणाला ही इच्छा होत नव्हती. आपले एकटक आकाशाकडॆ बघत बसलो होतो. या ट्रेकमधे अनुभवलेला प्रत्येक क्षण मनामधे कोरला गेला आहे.

अटाली वरून आम्ही कुवेशी च्या दिशेने चालू पडलो. हा आमचा शेवटचा कैंप. या कैंप विषयी काही खास सांगण्यासारखे नाही. कारण हा देखील इतर कैंप सारखाच होता. विशेष असे काही नाही. हा पण इथे पोहोचल्यावर घराची ओढ आतुरतेने जाणवू लागली. उद्या सकाळी येथून निघायचे गोवा कैंप गाठायचा आणि तेथून मुंबई ...... सगळ्यांनाच आता घरचे वेध लागले होते.
हा कैंप संपवून आम्ही दुस-या दिवशी गोव्यात परतलो [ थोडक्यात कुठे कुठे जंगलात आदिवासींसारखे भटकून परत एकदा माणसांमधे आलो ]
जंगलातला फेरफटका, धबधबे, समुद्रकिना-यावरची सफर हे सारे काही आम्हाला दहा दिवसांमधे येथे अनुभवता आले. येथील पारंपारिक आणि आधुनिक संस्कृतीचा मिलाफ पर्यटकांना खिळवून ठेवतो. कैंपवर गर्मागरम पाण्याने शुचिर्भूत हौऊन, थोडी झोप कढून सगळी मंडळी एकत्र जमली.
आता सर्वांनाच परतीचे वेध लागले होते.
कैंपवर आल्यावर मोबाइलचे नेटवर्क बघून सगळेच मंडळी खुष झाली होती. प्रत्येक जण आपापल्या घरी फोन करून खुस हाली कळवत होते ..... ट्रेक विषयी भरभरून बोलत होते.... काही जण एकमेकांचे फोन नंबर, पत्ते, इमेल आय.डी. घेण्यात मग्न होते.
"मुंबईत परतल्यावर कॊन्टॆक्ट ठेवा आम्हाला विसरून जाउ नका " असे उद्गार आपोआपच मनातून येत होते. त्या स्मृती जागवण्यात मोठी गंम्मत असते.

मला आठवतय घरी परतताना मी, निधी,पल्लवि, मानिषा अगदी एकमिकिंना ना मिठी मारून रडलो होतो. त्याच भारलेल्या अवस्थेत असताना घडयाळाचे काटे परतीच्या प्रवासाकडे खुणावू लागले .
ईशा भागवत

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*