माझीही अपूर्वाई - भाग ३

परदेशगमन करणारा आमच्या कुटुंबातला मी पहिलाच सदस्य होते. आते, मामे, चुलत, मावस वगैरे नात्यातलेही अजूनपर्यंत कोणी देशाबाहेर गेलेले नव्हते. मात्र ऑफीसात तसेच शेजारपाजारी बरीच अनुभवी मंडळी होती. त्यांतील एक दोघांना भेटून कांही व्यावहारिक महत्वाच्या सूचना घेतल्या. निव्वळ ऐकीव माहितीच्या आधाराने अनाहूत सल्ला देणारेही बरेचजण भेटतात. कोणी सांगे की "तिथे कपडे धुण्याची कांहीच सोय नसते तेंव्हा निदान दिवसागणिक एक एक कपड्याचा जोड तरी आपल्या बरोबर घेऊन जायलाच हवा." तर दुसरा म्हणे की "तिकडे घाम येत नाही की धूळ उडत नाही. त्यामुळे कपडे मुळीच मळत नाहीत, त्यातून सगळे अंग झाकणारा ओव्हरकोट वरून घालावा लागतोच. मग उगाच कपड्यांचे ओझे न्यायची गरजच कुठे असते?" कोणाच्या मते "चेक्ड इन बॅगेज तिकडे गेल्यावर मिळेलच याचा कांही नेम नसतो, कधी कधी गहाळ होते किंवा खूप उशीराने पोचते, तेंव्हा जास्तीत जास्त गोष्टी आपण आपल्या हातातल्या बॅगेजमध्ये ठेवलेल्या बऱ्या. तर आणखीन कोणाच्या मते "हँडबॅगेजमधल्या कुठल्या वस्तू सिक्यूरिटीवाले काढून टाकतील ते सांगता येत नाही. त्यामुळे हँडबॅगेज शक्यतो घेऊच नये." शिवाय "तिकडून परत येतांना तुम्ही चार गोष्टी आणणार म्हणजे सामान वाढणारच. ते ठेवायसाठी बॅगेत पुरेशी रिकामी जागा ठेवायला पाहिजे , म्हणजेच चांगली मोठी बॅग नेली पीहिजे ." आणि "एक्सेस बॅगेजचा चार्ज प्रचंड असतो. त्यामुळे फार कांही आणायचा मोह धरू नका." वगैरे वगैरे परस्पर्विरोधी उपदेश मिळाले.

सगळ्यांचेच सांगणे थोडे थोडे ऐकून घेऊन त्याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करीत मी त्यानुसार बॅगा भरल्या आणि विमानतळावर पोचलो. एका सुहास्यवदनेने माझे स्वागत करून मला विमानातली कोठली जागा आवडेल याची विचारणा केली. हे एक मी नव्यानेच ऐकत होतो. काउंटरसमोरच्या लांबलचक रांगेत उभे राहून आपली पाळी आल्यावर हांतात पडलेले बोर्डिंग कार्ड घ्यायचे आणि त्यावर लिहिलेल्या सीटवर निमूटपणे जाऊन बसायचे असते एवढेच यापूर्वी ठाऊक होते. आता संधी मिळताच मी 'नॉनस्मोकिंग विंडोसीट' मागितली. पुन्हा एकदा गोड हंसून तिने या दोन्हीपैकी एकच इच्छा पूर्ण होणे शक्य आहे असे नम्रपणे सांगितले. धूम्रपानाची मला आवडही नव्हती किंवा धुराचा त्रासही होत नसे त्यामुळे ती मागणी विशेष महत्वाची नव्हती. 'विंडोसीट'वर बसल्या बसल्या खिडकीतून खालचे फारसे कांही दिसत नाही आणि वरच्या आभाळात पहाण्यासारखे कांही नसते याचा अनुभव घेतलेला होता. बहुतेक वेळी विमानाचे अवाढव्य पंखच समोरचा बराचसा व्ह्यू अडवतात. सुरुवातीला तर त्यावरचे सारखे उघडझाप करणारे फ्लॅपर्स पाहून नक्की त्यांतले कोठले तरी आटे ढिले झाले असणार अशीच शंका येऊ लागली होती व माझीच झोप उडाली होती. इतके असले तरी परदेशी चाललो आहे, तिकडचे कांही दृष्य दिसले तर तेवढेच अशा विचाराने विंडो सीट घेतली. आजूबाजूला बसलेले प्रवासी धूम्रपानाचे शौकीन नव्हते. त्यामुळे दुसरी इच्छासुद्धा आपोआप पूर्ण झाली. मान वाकडी तिकडी वळवून दूरवर दोन चार बर्फाच्छादित शिखरे पाहिली आणि हाच तो सुप्रसिद्ध आल्प्स पर्वत असणार अशी मनाची समजून करून घेतली.

विमान सुटताच आमच्या विभागाचे काम पहाणारी गौरवर्णीय हवाईसुंदरी जवळ आली आणि मला कोठले पेय घेणे आवडेल याची तिने विचारणा केली. आली कां पंचाईत? कॉलेजात असतांना परदेशी जाण्याचा जो अभ्यास केला होता, त्यात हे प्रकरण राहून गेले होते हे मागच्या भागात आलेच आहे. त्यानंतर कधी मित्रांच्या संगतीने दोन चार प्याले पोटांत रिचवले होते तर कधी इतरांप्रमाणे सोनेरी रंगाच्या पेयाने भरलेला ग्लास नुसताच हांतात धरून पार्टीमध्ये हिंडतांना त्यातले घोट, दोन घोट घशाखाली ढकलले होते. त्यामुळे कोठलाही काकाजी मला "हाय कम्बख्त, तूने पी ही नही" असे म्हणू शकला नसता. पण मला एकंदरीत या विषयातली गती कमीच होती. त्यातून यातले सकाळी उठल्यानंतर काय घ्यायचे आणि रात्री कशाने तहान भागवायची? जेवणापूर्वी कोठले ड्रिंक घ्यायची पद्धत आहे आणि जेवल्यानंतर कुठल्या नशेत झोपी जायचे असते? याचे कांही नियम असतात असे ऐकले होते. "अमक्याच्या बरोबर तमके" अशा जोडीची फरमाईश करतांना लोकांना पाहिले होते. त्यामुळे आता या वेळी नक्की काय मागावे हा प्रश्न पडला. "तुमच्याकडे कोणकोणती पेये आहेत?" अशी विचारणा करणे म्हणजे आपण अगदी नवखे आहोत हे खरे असले तरी तसे दाखवून देणे होते. शिवाय तिने चार नांवे सांगितली असती तरी त्याने प्रश्न सुटणार नव्हता. "तुझ्या कोमल हांताने तुझी इच्छा असेल ते पेय माझ्या प्याल्यात भरून दे" असे सांगणे जरा अतीच झाले असते. त्यानंतर तिने हातात कांही देण्याऐवजी श्रीमुखात भडकावण्याचीच शक्यता होती. तिने आणलेल्या ट्रॉलीवर सफरचंदाचे चित्र काढलेला एक उभा डबा दिसला. त्याकडे बोट दाखवीत मी सफरचंदाचा रस मागून घेतला.

रसपानाच्या पाठोपाठ जेवण आले. मध्यरात्रीचा दीड वाजून गेला होता. खरे तर ही कांही आपल्याकडच्या जेवणाची वेळ नव्हती. पण रात्रीच्या जेवणाच्या वेळेला प्रवासाच्या धावपळीत असल्याने आणि मानसिक ताणामुळे फारसे अन्न पोटांत गेले नव्हते. आता स्थिरस्थावर झाल्यावर भूक जाणवायला लागली होती. शिवाय दुसरे दिवशी सगळ्याच जेवणांच्या वेळा बदलणार होत्या. त्यामुळे मिळेल ते कांहीतरी खाऊन घ्यायचे ठरवले. पुन्हा एकदा तीच सुकांत गौरांगना ट्रॉली घेऊन आली. "व्हेज ऑर नॉनव्हेज" असे विचारतांच मी त्या दिवशी नॉनव्हेजमध्ये काय ठेवले होते याची चौकशी केली. तिने "वीयल् " कां असे कांही तरी सांगताच माझी विकेट उडाली. ट्रॉलीमधून मसाल्याचा मंद सुगंध येत होताच. त्याच्या अनुषंगाने मी शाकाहारी जेवण मागवले आणि काश्मीरी पुलावाने भरलेली थाळी घेतली. त्या दिवशी विमानात प्रवासीच कमी होते की सगळ्यांनी उपास करायचे ठरवले होते, काय झाले होते कोणास ठाऊक? थोड्या वेळाने तिने आपण होऊन मला नॉनव्हेज पदार्थाने भरलेली एक प्लेट आणून दिली आणि आणखी पुलाव हवा असेल तर घेण्याचा आग्रहसुद्धा केला. तिने आणलेला पदार्थ खाऊनसुद्धा तो जीव जमीनीवर चालणारा होता, की पाण्यात पोहणारा होता की हवेत उडणारा होता याचा पत्ता कांही लागला नाही.

सीटच्या समोर असलेल्या खणात एक स्टेथॉस्कोपसारखे दिसणारे उपकरण ठेवले होते. आजूबाजूचे प्रवासी त्याचे दोन स्पीकर कानांत अडकवून प्लग कुठेतरी खुपसत होते. मीही आपल्या सीटजवळचे सॉकेट शोधून काढले. तिथेच एक कॅलक्युलेटरसारखे दिसणारे पॅड होते. त्याची बटने दाबताच कानावर पडणाऱ्या संगीताचे प्रकार बदलत होते. विमानात व्हीडीओ मॉनीटर ठेवायची पद्धत त्याकाळी सुरू झाली नव्हती. त्या बटनांशी चाळे करता करता कुठल्या तरी संगीताच्या चालीवर निद्राधीन झालो. जाग येईपर्यंत उजाडले होते व सकाळच्या चहा नाश्त्याचे ट्रे घेऊन येणाऱ्या ट्रॉल्यांचा खडखडाट सुरू झाला होता. ते आन्हिक उरकेपर्यंत आपण रोम येथे येऊन पोचलो असल्याची घोषणा झाली. बसल्या बसल्या अंग आंबून गेले होते. आता थोडा वेळ मोकळेपणी हिंडावे फिरावे असे वाटत होते. पण मला तर रोमला उतरायचे नव्हते. त्यापुढे फ्रँकफर्टपर्यंत जायचे होते. इतक्यात "विमानातल्या सर्व प्रवाशांनी आपापल्या केबिन बॅगेजसकट इथे उतरून ट्रान्झिट लाउंजमध्ये जाऊन थांबावे." अशी घोषणा झाली आणि मी तर मनातल्या मनात "देव पावला" असेच म्हंटले. थोड्याच वेळात रोमच्या 'लिओनार्दो दा विंची' विमानतळावर आमचे विमान उतरले आणि युरोपच्या मातीवर आमच्या पायातल्या बुटांचे ठसे उमटवले. यापूर्वीच नील आर्मस्ट्रॉंग वगैरे मंडळी चंद्रावर जाऊन आली असतीलही. पण युरोपच्या भूमीवर पाय ठेवणे हीच माझ्या दृष्टीने केवढी अपूर्वाईची गोष्ट होती.

. . . . . . . (क्रमशः)