आजच्या लोकसत्तेत हा बातमीवजा लेख वाचायला मिळाला. लंडनमध्ये चित्रित होणारा पहिला मराठी चित्रपट कसा असेलत्याची झलक वाचायला मिळाली. सर्वांना आस्वाद घेता यावा म्हणून तो लेख येथे उतरवून ठेवत आहे.
लोकसत्तेतील मूळ लेख : 'वैजनाथ हंपनवार" इन लंडन!
शैलेंद्र शिर्के
मुंबई, १० जून
बॉलीवूडकर शिल्पा शेट्टीने ब्रिटनवासीयांची झोप उडवली ती अलीकडे. पण शिल्पाच्याही वर्षभर अगोदर 'वैजनाथ हंपनवार' या मराठमोळ्या गड्याने संपूर्ण लंडनला वेड लावले होते. कपाळाला टिळा, डोक्यावर गांधी टोपी, तीन बटनांचा सदर्यासारखा शर्ट, कोट, खांद्याला शबनम झोळी, पायात विजार आणि जोडीला ब्रिटनच्या बालीस्टरांनाही संभ्रमात पाडेल असे 'फर्डे' विंग्रजी फाडत सातार्याचा हा फाकडो द्वीपदवीधर हिथ्रो विमानतळापासून बर्मिंगहॅम पॅलेसपर्यंत दाही दिशा हिंडत होता आणि त्याच्या या अवताराने भिरभिरलेले लंडनवासीय गोरे त्याच्याबरोबर हौसेने फोटू काढून घेत होते. वीस दिवस लंडनच्या प्रमुख रस्त्यांवर, ऑकस्फर्ड, वुडस्टॉक व इतर भागांमध्ये ही धमाल सुरू होती आणि याला कारणीभूत होता सुप्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधव अर्थात 'वैजनाथ हंपनवार'!
भरत जाधवला वैजनाथच्या भूमिकेत घेऊन केदार शिंदेने 'मुककाम पोस्ट लंडन' पूर्ण केला आहे. लंडनमध्ये चित्रित झालेला हा पहिला मराठी चित्रपट. लंडनमध्येच बहुतांशी कथानक घडणार्या या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते कमल शेठ आणि केदारने कॅमेरामन संजय मेमाणे, भरत जाधव, अभिनेत्री रीमा यांची कन्या मृण्मयी लागू, मोहन जोशी व तंत्रज्ञांचे युनिट घेऊन लंडन गाठले होते. वीस दिवस त्यांचा पत्ता खरोखरीच 'मुककाम पोस्ट लंडन' असाच होता. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टी फर्स्ट टाइम मराठी चित्रपटसॄष्टीत घडत आहेत. लंडनमध्ये चित्रित झालेला हा पहिला मराठी चित्रपट तर आहेच, शिवाय 'हाय डेफिनिशन' एचडी तंत्राने फिल्म न वापरता एका वेगळ्या कॅमेर्याद्वारे डिस्कवर छायाबद्ध झालेलाही हा पहिला मराठी चित्रपट आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने ब्रिटनमधील काही कलाकार मराठीच्या पडद्यावर प्रथमच दिसणार आहेत. येत्या २२ जून रोजी आपल्याकडे प्रदर्शित झाल्यावर लगेचच लंडनमध्ये झळकणाराही हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.
आपल्या ध्येयपूर्तीसाठी बायकोमुलाला एकटं टाकून लंडनमध्ये निघून गेलेल्या बापाला शोधण्यासाठी सातार्याच्या काळचौंडी गावातून आलेल्या एका सुशिक्षित पण खेडवळ तरुणाला लंडनच्या विदेशी, अनोळखी दुनियेत काय अनुभव येतात, अडचणी येतात, या वातावरणात पार भांबावून गेलेला हा तरुण या परिस्थितीतून कसा मार्ग काढतो अशी कारुण्य आणि विनोदाचा मिलाफ असलेली कथा या चित्रपटातून समोर येणार आहे. संपूर्ण चित्रपटात भरतचा अवतार प्रारंभी सांगितल्याप्रमाणे अस्सल गावरान आहे. लंडनवासीयांना भारतीय चेहरे परिचयाचे असले तरी कोट, टोपी, लेंगा असा भारतीय चेहरा त्यांना बहुधा प्रथमच दिसत होता. थंडी प्रचंड असली तरी भरत भल्या सकाळीच या अवतारात तयार व्हायचा आणि दिवसभर इकडेतिकडे फिरत असायचा. लंडनमधील कितीजणांनी त्याला सोबत घेऊन, खांद्यावर हात वगैरे ठेवून फोटो काढून घेतले त्याची गणतीच नाही. भरत इंटरनॅशनल स्टार झाल्यावर कदाचित त्यांच्या पुढेमागे लक्षात येईल की अरे ये तो वोईच है..., असे केदारने मिस्कीलपणे सांगितले. केदारने चित्रपटात काही लंडनवासीय विदेशी कलाकारही घेतले आहेत. त्यांच्याशी भरत त्याच्या 'फर्ड्या' इंग्रजीत संवाद साधायचा, मृण्मयीची मदत व्हायची. पण भरतने त्यांची फर्मास शिकवणी घेतली. 'सुटलो', 'चिरीमिरी' असे कितीतरी शब्द त्याने या गोर्यांना शिकवून टाकले. डॅनी नावाचा एक कलाकार तर साडेसहा पूट उंच आणि शरीराने चांगलाच आडवा. तो अजूनही फोन करून भरतची चौकशी करतो. त्यांनाही चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे, असे केदारने सांगितले. मोहन जोशी, मृण्मयी आणि भरत यांनी चित्रीकरणाचे सामान उचलण्यापासून प्रत्येक बाबतीत मदत केल्याचा उल्लेख त्याने आवर्जून केला. हिथ्रो विमानतळावरील चित्रीकरणासाठी आम्हाला केवळ नऊजणांना परवानगी मिळाली होती. तेव्हा तर इतरांबरोबर या तिघांनीही कॅमेरे, स्पेशल दिवे, बॅटरी चार्जर, स्क्रीन असे काय काय उचलून घेतले होते, असे तो म्हणाला. मराठी चित्रपट अटकेपारच नव्हे तर सातासमुद्रापार नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लंडन गाजविणारा वैजनाथ तथा भरत आणि केदार याच जोडगोळीला पुढच्या मराठी चित्रपटासाठी स्वित्झर्लंडमध्ये घेऊन जाणार असल्याचे कमल सेठ यांनी म्हटले आहे. तेव्हा मराठी चित्रपटाचा पुढचा मुक्काम स्वित्झर्लंड असणार एवढे नक्की!
लंडनात राहणाऱ्या मराठी लोकांनी हे चित्रीकरण पाहिले का?
कलाकारांबरोबर फोटो काढून घेतले का?
लंडनमधल्या स्थानिक लोकांनी मराठी चित्रपटांबद्दल औत्सुक्याने प्रश्न विचारले का?
बर्मिंगहॅम पॅलेस कुठे आहे?
मराठी पोशाख घालून रस्त्यावरून फिरण्याइतपत लंडनमधील तापमान योग्य असते का?