ग्रहमंडल दिव्यसभा-४

      २००७ च्या एप्रिल महिन्यामध्ये २४ तारखेला एक खळबळजनक शोध लागला. एका ताऱ्याच्या 'वसतीयोग्य प्रदेशा'मध्ये असणारा परसूर्य ग्रह सापडला. तो केवळ वसतीयोग्य प्रदेशात आहे एवढेच नाही, तर तो ग्रह पृथ्वीशी तुलना करता येण्याजोगा आहे. पृथ्वीच्या केवळ ५ पट वस्तुमान असलेला व पृथ्वीच्या दीडपट त्रिज्या असलेला हा ग्रह म्हणजे 'ग्लाएस ५८१ सी'. त्याला अतिपृथ्वी वा सुपर अर्थ असेही संबोधले जाते. हा ग्रह तूळ राशीतील (तारकासमूहातील) ग्लाएस ५८१ (Gliese 581) ह्या लाल बटु ताऱ्याभोवती (red dwarf) फिरतो. ह्या ग्रहावर पाण्याचे अस्तित्व आहे अथवा कसे ह्याबद्दल माहिती अजून मिळाली नसली तरी तो ताऱ्याच्या वसतीयोग्य प्रदेशामध्ये असल्यामुळे तेथे पाणी द्रवावस्थेत राहू शकते. हा आजवर सापडलेला सर्वात कमी वस्तुमामानाचा परग्रह. स्विस, फ्रेंच आणि पोर्तुगीज वैज्ञानिकांच्या चमूने ह्या ग्रहाचा वेध घेतला. ह्या ग्रहाचा नेपच्यूनच्या आकाराचा, पृथ्वीच्या १७ पट वस्तुमानाचा भाऊबंद पूर्वीच, डिसेंबर २००५ मध्ये सापडला होता, त्याचे नाव 'ग्लाएस ५८१ बी'. 'सी' ग्रह सापडला तेव्हाच त्याला आणखी एक भाऊ असल्याचे भक्कम पुरावे मिळाले होते, आणि दुसऱ्याच दिवशी, २५ एप्रिलला त्याचा हा भाऊ सापडला, त्याचे नाव ठेवले 'ग्लाएस ५८१ डी'. 'सी' चे तापमान शून्य ते चाळीस अंश सेल्सियसच्या दरम्यान असावे असा अंदाज आहे. तो वायुग्रह नसून पृथ्वीप्रमाणे एक तर तो दगडमातीने बनलेला ग्रह असावा वा समुद्राने पूर्णतः व्यापलेला तरी असावा. भविष्यात जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी आखल्या जाणाऱ्या प्रकल्पांसाठी पृथ्वीसादृश्यामुळे त्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. ग्लाएस ५८१ ह्या ताऱ्याचा समावेश आपल्या सौरमालेला जवळ असणाऱ्या पहिल्या १०० ताऱ्यांमध्ये होतो. हा तारा आपल्यापासून २०.५ प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या सूर्याच्या तुलनेत केवळ एक तृतीयांश वस्तुमान असलेल्या ह्या ताऱ्याची तेजस्विता सूर्याच्या केवळ अर्ध्याएवढी आहे. अचूक त्रिज्य गती तंत्राचा वापर करून ह्या अतिपृथ्वीचा वेध घेण्यात आला.

      विश्वामध्ये असंख्य दीर्घिका आहेत. प्रत्येक दीर्घिकेमध्ये अब्जावधी तारे आहेत. त्यातील मोजक्याच ताऱ्यांना ग्रहबाळे आहेत असे मानले तरी ग्रहांचा पोरवडा असणारे असंख्य तारे केवळ आपल्या आकाशगंगेमध्येच सापडतील. ह्या ग्रहबाळांपैकी मोजकेच ग्रह हे त्यांच्या ताऱ्यांच्या वसतीयोग्य प्रदेशात आहेत आणि त्यातही अगदी मोजक्याच ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे असे मानले तरी असंख्य ग्रहांवर जीवसृष्टी असायला हवी. ही झाली आपल्या आकाशगंगेची गोष्ट. विश्वामध्ये अशा अनेक दीर्घिका आहेत. म्हणजे केवळ शक्याशक्यतेचा तर्क करता विश्व हे जीवसृष्टीने गजबजलेले असायला हवे. त्यामुळे परसृष्टीचा शोध सुरू ठेवणे हे कधीही हितकारक. १९८४ मध्ये अमेरिकेतील सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे 'सेटी' (SETI - the Search for ExtraTerrestrial Intelligence) ही संस्था परसृष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशाने स्थापन झाली (पाहा http://www.seti.org/). परसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नांदरम्यान 'कोऽहम्' ह्या चिरंतन प्रश्नाचे उत्तर निदान काही प्रमाणात तरी मिळवणे शक्य व्हावे. भविष्यात मानवाला काही कारणाने पृथ्वी सोडायची वेळ आली, तर कोठे राहता येऊ शकेल ह्याची चाचपणी आतापासूनच केलेली बरी.

वरदा व. वैद्य.

 

 


 

संदर्भ -
१. Planet Quest - New Worlds Atlas, NASA's Jet Propulsion Laboratory,  http://planetquest1.jpl.nasa.gov/atlas/atlas_search.cfm
२. 'The search for Extrasolar Planets: A Brief History of the Search, the Findings and the Future Implications', 1997, compiled by G.H. Bell, Arizona State niversity

http://www.public.asu.edu/~sciref/exoplnt.htm
३. G.W. Marcy, et al., 1997, 'The Planet around 51 Pegasi', The Astrophysical Journal, 481, pp. 926-935.
४. J.-P. Beaulieu, et al., 2006, 'Discovery of a Cool Planet of 5.5 Earth Masses Through Gravitational Microlensing', Nature, 439, pp. 437-440, http://arxiv.org/abs/astro-ph/0601563
५. The Extrasolar Planets Encyclopaedia, http://exoplanet.eu/
६. S. Udry, et al., 2007, 'The HARPS search for southern extra-solar planets. XI. Super-Earths (5 and 8 M{earth) in a 3-planet system', Astronomy and Astrophysics, 469(3), pp. L43-

L47.
७. 'A Road Map for the Exploration of Neighboring Planetary Systems (ExNPS)', Origins, Jet Propultion Laboratory, NASA, http://origins.jpl.nasa.gov/index1.html
८. Te Ara, the Encyclopedea of New Zealand, http://www.teara.govt.nz/en
९. European Space Agency (ESA), http://www.esa.int/esaCP/index.html

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.