कवडसे पकडणारा कलावंत

      विजय पाडळकर यांचे  'कवडसे पकडणारा कलावंत ' हे  रशियन साहित्यिक अंतोन चेकॉव्ह या श्रेष्ठ कथाकारावर लिहिलेले पुस्तक वाचनात आले.  त्यामध्ये वर्णन केलेला  अंतोन चेकॉव्ह मनात घर करून बसला.  'द कोरस गर्ल', 'द डार्लिंग, 'वेंका' या चेकॉव्हच्या लोकप्रिय कथा वाचल्या होत्या. त्यामुळे अंतोन चेकॉव्ह बद्दल अधिक माहिती मिळवावी असे वाटू लागले होते. पुढे काही वर्षांनी पाडळकरांचे 'कवडसे पकडणारा कलावंत' वाचले आणि चेकॉव्हची विचारसरणी अधिक स्पष्ट झाली.  आपल्या पुस्तकाद्वारे पाडळकरांनी समकालीन रशियन साहित्यिक आणि चेकॉव्ह, त्याच्या लेखनपद्धती, त्याच्या काही प्रसिद्ध कथा, त्याची जीवनविषयक तत्त्वे या सर्वांचा आढावा घेतला आहे. त्यामधील आवडलेला भाग सारांशाने देण्याचा हा एक प्रयत्न.

      अंतोन चेकॉव्ह  या प्रसिद्ध रशियन कथाकाराने लेखनास जेव्हा सुरुवात केली तेव्हा रशियातील साहित्याच्या सुवर्णयुगाचा अस्त व्हायला सुरुवात झाली होती. 'ब्रदर्स कारमॉझॉव्ह', 'क्राइम ऍंड पनिशमेंट' या गाजलेल्या कादंबरीचा लेखक दोस्टॉव्हस्की तसेच 'द नेस्ट ऑफ द जेंट्रिज' लिहिणारा तुर्गनेव्ह या दोन लेखकांचे त्याकाळी नुकतेच निधन झाले होते. रशियन साहित्याकारांत  फक्त  टॉलस्टॉयचे श्रेष्ठत्व उरले होते.   टॉलस्टॉयच्या  'वॉर ऍड पीस व 'ऍना कॅरेनिना' या महाकादंबऱ्या प्रकाशित झालेल्या होत्या. जगभरच त्या कादंबऱ्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.  टॉलस्टॉयचा दबदबा जसा जगावर होता तसाच अंतोन चेकॉव्हच्या मनावरही होता. टॉलस्टॉयच्या कादंबऱ्यांतील जीवनाचा भव्य पट, त्यातील व्यक्तींचे व समाजाचे प्रभावी चित्रण याविषयी चेकॉव्हला अतिशय आदर होता. सुरुवातीच्या काळात पैशासाठी चेकॉव्हने भरमसाठ लेखन केले. पहिल्या पाच वर्षात त्याने सुमारे पाचशे कथा लिहिल्याची नोंद आहे.

त्यापैकी काही कथांवर निकोलाय गोगोल व काहींवर फ्रेंच लेखक मोपासाची छाप उमटलेली दिसते. कित्येक कथांवर टॉलस्टॉयचा प्रभावही जाणवतो.  चेकॉव्हच्या 'इस्टरईव्ह' या अप्रतिम काव्यात्मक लघुकथेत जीवनातील विविध रुपांचे दर्शन, काळाचे व्यापक स्वरूप आणि मानसशास्त्रीय विवेचन; तसेच एक उत्तम व्यक्तिचित्रण आले आहे. 'डेथ ऑफ ए क्लर्क' ही त्याची आणखी एक गाजलेली कथा. 'ग्रीफ', 'द एनिमोज', 'ट्रेवेलिंग विथ मेल' अशा अनेक कथांतून निसर्गाचे वर्णन आले आहे.

      चेकॉव्हचे  आयुष्यच नाट्यमय होते याची जाणीव वाचकाला हे पुस्तक वाचताना होते. चेकॉव्हवर  त्याचे कुटुंब अवलंबून होते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याला सुरुवातीला लेखनात प्रसंगी तडजोडी कराव्या लागल्या. त्याचे आयुष्य आणि  त्याच्या साहित्याचा आलेख अशा दोन आघाड्यांवर या पुस्तकाचा समांतर प्रवास होतो. चेकॉव्हने  अनेक लघुकथा लिहिल्या.   तरी द हॅपिनेस, द स्टेपी, द लाइट्स या दीर्घ कथांमुळे त्याच्या कथालेखनाचे दोन कालखंड मानता येतील.  चेकॉव्ह एक उत्तम कथालेखक होता पण त्याशिवाय तो एक दर्जेदार नाटककार होता. हे पुस्तक वाचताना 'द प्रिन्सेस', 'डलसोरी' या महत्त्वाच्या परिणामकारक कथा आणि 'द वुड डीमन' हे  रशियन रंगभूमीवरील सर्वश्रेष्ठ नाटक यांचा परिचय वाचकाला होतो. चेकॉव्हच्या अगदी मोजक्या कथांचे  मराठीत भाषांतर झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाडळकरांचा हा प्रयत्न चेकॉव्हच्या अनेक कथांची ओळख मराठी माणसाला करून देतो. 'द आयलंड ऑफ साखालिन' हे चेकॉव्हचे अतिशय महत्त्वाचे पुस्तक. यामध्ये साखालिन येथील तुरुंग, कैदी व त्यांचे जीवन; याचे अनेकांगी वर्णन चेकॉव्हने केले आहे.   'वॉर्ड नं ६', 'द स्टुडंट', 'रोथशील्डस फिडल', 'द ब्लॅक मॉक' या कथांचे सुंदर रसग्रहण पाडळकरांनी केले आहे. त्याशिवाय 'द मॅन इन द शेल', 'गूजबेरिज', 'अबाउट लव्ह' या कथांचा आस्वाद या पुस्तकात घेतला आहे.चेकॉव्हच्या कथा, नाटके, त्याचे चरित्र, आठवणी, इतर साहित्यिकांशी त्याचा पत्रव्यवहार या सर्वांचा मागोवा घेत पाडळकरांनी मराठी वाचकांची आणि चेकॉव्हची भेट घडवून आणली आहे.

      विजय पाडळकरांनी दिलेल्या चेकॉव्हच्या कथा वाचताना त्याचे व्यक्तिगत जीवन, डॉक्टर होण्यासाठी त्याने घेतलेले परिश्रम आणि त्याचे हलाखीचे दिवस वाचकांना हळवे करतात. केवळ लेखन करून कुटुंबात रममाण होण्याची चेकॉव्हची वृत्ती नव्हती. कॉलऱ्याच्या साथीत मदतीला उभे राहणे, साखालिन येथील मुलांना शैक्षणिक मदत करणे, आपल्या जन्मगावात स्वतःचे ग्रंथ आणि इतरांच्या मदतीने मोठे ग्रंथालय उभारणे, इतर साहित्यिकांना मदत करणे, मार्गदर्शन करणे अशा अनेक कृतीतून एक माणूस म्हणून चेकॉव्हची ओळख होते. टॉलस्टॉय, मॅक्झिम गॉर्की या लेखकांच्या आठवणीतून साकारलेला चेकॉव्ह आपल्याला या पुस्तकातून समजतो.

      टॉलस्टॉय आणि चेकॉव्ह यांची जीवनतत्त्वे आणि मूळ प्रकृतीच भिन्न होती, तरी चेकॉव्हच्या कथांवर टॉलस्टॉयबद्दल त्याला वाटणारे आकर्षण डोकावते. तो स्वतंत्र विचारांचा होता. 'या जगातून काही ठाम अर्थ काढता येत नाही', 'सत्य कुणालाच ठाऊक नसते' ही चेकॉव्हची काही आवडीची आशयसूत्रे होती. जीवनातील नीतिमूल्ये तुडवणाऱ्यांच्या विरुद्ध टॉलस्टॉय लेखनाचे हत्यार उगारे. पण टॉलस्टॉयप्रमाणे चेकॉव्हला लेखनातून असे नैतिकतेचे डोस देणे मान्य नव्हते. वस्तुनिष्ठ भूमिकेचा तो खंदा समर्थक होता. टॉलस्टॉयच्या लेखनाचे विषय भव्य असत, परिघ विस्तृत असे. तर याउलट चेकॉव्हला लहान कथा लिहिण्यात अधिक रस होता. माणसाला जे ठाऊक नाही ते शोधण्याचा प्रयत्न टॉलस्टॉय करत असे तर माणसाला जे माहिती आहे त्याचेच चित्रण चेकॉव्ह वेगळ्या दृष्टिकोनातून करत असे. हे भिन्नत्व  जसे चेकॉव्हला माहिती होते तसेच त्याला टॉलस्टॉयचे श्रेष्ठत्वही मान्य होते. म्हणून एकदा टॉलस्टॉयला भेटायला जाण्याआधी तासभर चेकॉव्ह विविध कपडे चढवून पाहत होता आणि शेवटी खोलीतून आत बाहेर चकरा मारत हा पोषाख घातला तर टॉलस्टॉय काय म्हणतील असे विचार येऊन चेकॉव्ह अस्वस्थ झाला होता..  अशी एक आठवण या पुस्तकात आहे.

      चेकॉव्हने 'माय लाईफ' नावाची एक दीर्घ कथा लिहिली. त्या कथेतील नायकावर टॉलस्टॉयच्या विचारसरणीचा प्रभाव असला तरी चेकॉव्हने मनातून ’टॉलस्टॉयसम’ स्वीकारला नव्हता हेदेखील त्या कथेतून दिसून येते. या कथेचा प्रारंभ टॉलस्टॉयच्या विचारसरणीवर असला तरी अखेर मात्र चेकॉव्हच्या विचारसरणीनुसारच आहे.

      टॉलस्टॉय, चेकॉव्ह आणि तसाच त्याकाळचा आणखी एक प्रभावी साहित्यिक म्हणजे मॅक्झिम गॉर्की. मॅक्झिम गॉर्कीनेच चेकॉव्हच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक अप्रतिम आठवणी लिहून ठेवल्या आहेत. पाडळकरांच्या पुस्तकात गॉर्कीच्या शब्दातून चेकॉव्हचे चित्रण आले आहे. महान साहित्यकारांच्या कथांचे सारांशाने येणारे उल्लेख आणि त्या साहित्यिकांनी एकमेकांविषयी सांगितलेल्या आठवणी हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

      जेव्हा  गॉर्की आणि चेकॉव्हची भेट झाली तेव्हा गॉर्कीचे नाव नव्या दमाचा आश्वासक लेखक म्हणून पुढे येत होते. चेकॉव्हचे साहित्य सर्वमान्य झाले होते आणि त्याच्या मतांना वजन होते. चेकॉव्हने त्याच्या मित्रांना, वाचकांना गॉर्कीच्या कथा वाचण्याची शिफारस केली. चेकॉव्हचे सर्व साहित्य गॉर्कीने वाचले होते. पत्रव्यवहारात गॉर्कीने चेकॉव्हला त्याच्या कथा पाठवल्या होत्या. त्या कथांमधील दोष दाखवण्याची शिफारस गॉर्कीने चेकॉव्हला केली होती. त्यावर चेकॉव्हने त्याला परखड उत्तर दिले होते. त्यांचा पत्रव्यवहार सुरू राहिला.  जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा चेकॉव्ह आणि गॉर्की दोघेही आनंदले होते. गॉर्की ज्या गतीने लिहीत होता त्यामुळे त्याच्या अनेक चुका होत. अनेकदा त्याच्या हातून सामान्य दर्जाचे लेखन होई.  ते पाहून चेकॉव्हला त्याचे सुरुवातीचे दिवस आठवत. “लिखाणात शिस्त आणली पाहिजे” असे तो वारंवार गॉर्कीला सांगत असे.  चेकॉव्हच्या आठवणी लिहिताना एका ठिकाणी गॉर्की  तो लिहितो की, "ज्या कुणाला चेकॉव्हच्या संगतीत राहण्याचे भाग्य मिळाले तो स्वाभाविकपणे साधा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न करी. जगात वावरताना चढवलेले मुखवटे काढून लोक चेकॉव्हच्या समोर येत, आपल्या खऱ्या स्वरूपात वावरत."

      टीकाकारांबद्दल चेकॉव्हचे कधीही फारसे चांगले मत नव्हते. एकदा तो गॉर्कीला म्हणाला," टीकाकार हे काम करणाऱ्या बैलाभोवती गुणगुणत त्याला काम न करू देणाऱ्या माशीसारखे असतात. बैल बिचारा ओझे ओढतो आहे, त्याच्या नसा ताणल्या गेल्या आहेत आणि ही माशी त्याच्या अंगावर बसून गुणगुणत राहते. तिला हाकलण्यासाठी अंग हालवावे लागते, शेपटी हालवावी लागते. माशी कशासाठी गुणगुणते हे तिलाही ठाऊक नसते. स्वतःचे अस्तित्व दर्शवू पाहणारा तो एक अस्वस्थ प्राणी असतो. गेल्या २५ वर्षापासून मी लिहितो आहे आणि माझ्यावरची टीका वाचतो आहे. पण एकाही टीकाकाराने कधी काही महत्त्वाचे लिहिले आहे किंवा चांगला सल्ला दिला आहे असे मला आठवत नाही. अपवाद फक्त एक. स्टॅबेचेव्हस्की एकदा माझ्या कथा वाचून म्हणाला होता, “चेकॉव्ह एक दिवस अती मद्यपानाने मरणार आहे.”

      १९०२च्या फेब्रुवारीत मॅक्झिम गॉर्कीला 'अकादमी ऑफ सायन्सेस ' चे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.  चेकॉव्ह या अकादमीचा मानद सदस्य होता.  गॉर्कीला सदस्यत्व मिळाले याचा चेकॉव्हला खूप आनंद झाला आणि त्याने गॉर्कीचे अभिनंदन केले.   पण गॉर्की हा झारविरोधी गटातील होता. त्यामुळे त्याचे सदस्यत्व झारने व्यक्तिगत अधिकार वापरून  रद्द केले. रशियन सांस्कृतिक जगतात यामुळे खळबळ माजली.  झार सर्वश्रेष्ठ असून त्याच्या निर्णयावर अपील नाही हे समजल्यावर  चेकॉव्ह कमालीचा अस्वस्थ झाला.  या घटनेचा निषेध म्हणून त्याने त्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

      उणेपुरे ४४ वर्षाचे आयुष्य लाभलेला चेकॉव्ह. या  महान लेखकाची शेवटची काही वर्षे आजाराशी झगडण्यात गेली.  स्वत: डॉक्टर असूनही क्षयावर चेकॉव्हने वेळीच उपचार का केला नाही? पत्नी असूनही अखेरच्या काळात तो एकटा का राहिला? त्याचा उपहासगर्भ शेवट, त्याचे कौटुंबिक जीवन; या सर्वांचे रेखाटन पाडळकरांनी केले आहे.  टॉलस्टॉयच्या मृत्यूला चेकॉव्ह घाबरत होता. टॉलस्टॉयविना लेखक हे गुराखी नसणाऱ्या जनावरांच्या कळपासारखे बनतील व साराच गोंधळ माजेल असे त्याला वाटत असे. हे त्याने अनेकांकडे बोलूनही दाखवले होते.  पण तो मृत्यू चेकॉव्हला बघावा लागला नाही. १९०४ साली टॉलस्टॉयच्या ६ वर्षे आधीच आजाराशी झगडत चेकॉव्ह मरण पावला...

      गॉर्की एकदा चेकॉव्हला भेटावयास गेला होता तेव्हा चेकॉव्ह आपल्या बागेत ऊन खात बसला होता. उन्हाचे काही कवडसे जमिनीवर पडले होते. चेकॉव्ह आपल्या हॅटवर त्यापैकी एखादा कवडसा पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होता.  त्यात त्याला यश मिळत नव्हते. तेव्हा एखाद्या लहान मुलासारखा तो स्वतःवरच चिडत होता. गॉर्कीने ही आठवण लिहून ठेवली आहे. आपल्या कथांमध्येही जीवनातील सत्यांचे काही कवडसे पकडण्याचा चेकॉव्ह आयुष्यभर प्रयत्न करत राहिला. त्यात त्याला यशही आले. जगात कशी माणसे आहेत ते दाखवण्याचे काम चेकॉव्ह नेहमी करत आला. विजय पाडळकरांनी त्या कथांच्या कवडशांनी सामान्य माणसाच्या अंधाऱ्या जगात प्रकाश आणला असेच म्हणता येईल.
 

      जीवन जिज्ञासा

      (साभार- 'कवडसे पकडणारा कलावंत', विजय पाडळकर, मॅजेस्टिक प्रकाशन)

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.