स्वप्नांच्या जादूनगरीत-३

आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:

डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत.

डाऊनटाऊन डिस्नी: या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स, फास्टफूड उपाहारगृहे, खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत. येथे गायन-नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात. सुप्रसिद्ध सूर्य-सर्कस (Cirque du Soleil ) येथे पाहता येते. संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता, बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

प्लेजर आयलंड: सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील. संगीत-गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते.

बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून : ही दोन जलोद्याने (वॉटर पार्क्स) डिस्नी परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत.

डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते.

युनिवर्सल पार्क्स: येथे दोन पार्क्स आहेत: युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क. ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते. इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी.

सीवर्ल्ड, ओरलॅंडो: प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स, पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स, माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील, गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस, उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात. शामू या किलर व्हेलचे, सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. डिस्नी वर्ल्डची सफर करणार्‍या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये. हे पार्क एका दिवसात पाहून होते. "ट्रिपल ए"चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात.

फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे,  सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच बुश गार्डन्स (Busch Gardens) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत.
---
या डिस्नीनगरीबद्दल एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे येथील सेवादात्यांकडून आणि सेवकवर्गाकडून पर्यटकांना मिळणारी वागणूक. लाखोंच्या गर्दीला सांभाळून हसतमुखपणे आणि अदबीने पर्यटकांच्या प्रत्येक प्रश्नाला, शंकांना सविस्तर उत्तरे देणारा, त्यांना तत्परतेने मदत करणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा डिस्नीचा कर्मचारीवर्ग प्रत्येक पर्यटकाला राजपुत्र नाहीतर राजकन्या असल्याचे सतत जाणवून देतो.

वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे उद्घाटन १९७१ साली करण्यात आले - वॉल्ट डिस्नी यांच्या मृत्यूच्या सुमारे ५ वर्षांनंतर! संपूर्ण दुनियेला स्वप्न विकणारा हा मनुष्य त्याने स्वत: स्वप्नात पाहिलेली जादूनगरी सत्यात उतरताना पाहण्यास हयात नव्हता. परंतु लहान-मोठे, तरुण-म्हातारे सर्वांना वेड लावेल अशा स्वप्ननगरीच्या निर्मितीतून त्यांनी आपले नाव चिरंतन केले.

लहानांना वेड लावणार्‍या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्‍या या जादूमय स्वप्ननगरीत वर्षातील ३६५ दिवस दिवाळी असते.  आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीतील आनंदाचे क्षण प्रकाश, रोषणाई, फटाके यांच्या सोबतीने या स्वप्ननगरीत काढायची संधी पर्यटकांना लवकरच चालून येवो ही दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!

 प्रियाली

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.