स्वप्नांच्या जादूनगरीत-२

वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी? 

सहल ठरवण्याच्या ४ ते ६ महिने आधी डील्स तपासावीत. ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात. तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे, राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते. याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल.

 उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५-४० डि. से.च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम. तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो, तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा. उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते. आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता,

दोन्ही दिवशी तास-दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली.

डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे ५-६ दिवसांची सहल योजावी लागते. पर्यटकांनी कमीतकमी ४ दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत. त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते. या पार्कांत येणार्‍या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास १ तासाहून अधिक काळही लागू शकतो. यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट "पार्क हॉपर" पासेस मिळतात. ४ दिवसांच्या वर राहणार्‍यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो. हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो. तसेच येथे काही पार्कांत "फास्टपासेस" मिळतात. फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. हे पास फुकट मिळतात व ते घेतले की हव्या असणार्‍या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो.

 

कोठे राहावे?

डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम. येथे असणार्‍या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते. प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत, एक दोन लहान किराणा दुकाने, स्विमिंग पूल इ. सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत. या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे, ती पार्क करणे, तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात. विमानाने प्रवास न करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये-जा करणेच सोयिस्कर ठरते.

काय पाहावे आणि करावे?

या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत. प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे, झुले, झोपाळे, रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत. प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो.

मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही. त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला. व्यक्तिश: माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली. सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम. एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे.

प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे:

१. मॅजिक किंगडम: येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते. एकदा दुपारी आणि एकदा रात्री. या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत. रात्रीची विशेष. बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक, रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते.

२. एमजीएम स्टुडियो: येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो. यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात. अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती, संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा.

३. एपकॉट: येथेही रात्री "रिफ्लेक्शन ऑफ द अर्थ" हा प्रकाश-रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची? त्यात वेगळेपणा काय असणार? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये. प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्‍या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे.

४. ऍनिमल किंगडम: लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी, सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य-गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे.

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.