![]() |
राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी." आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले. |
आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते. सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली. सोबत नौबती झडल्या, आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली. सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती. देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता.
समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते. त्यांचेही आगमन होऊ लागले. राजेसाहेब आणि युवराज, युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती. अल्लाउद्दीन आणि जास्मीन, ब्युटी आणि बीस्ट, स्नोव्हाईट (हिमगौरी) आणि तिचा राजकुमार, स्लीपिंग ब्युटी (झोपलेली राजकन्या) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले. समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले.
राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला. सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले. "राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही, राज्याचे प्रजाजन सुखी राहोत, सर्वांचे कल्याण होवो." अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली. यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे, सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले. |
![]() |
परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले, "आता काय करूया? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर, डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर, कपबशीत बसून गिरक्या घेऊया, पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया, जंगल सफारीला भेट देऊया, मिकी माऊसच्या घराची सफर करूया, बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया?"
तशी ती खुदकन हसत म्हणाली, "मम्मा, तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस.""असणारच!" मी तिला चिडवले, "स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी.... मीही राजकन्याच आहे." स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातीलओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात.
* * *
![]() |
प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते. काहीजण या मुलाला दडपून टाकतात, काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत:तील या मुलाची निरागसता, खेळकरपणा, उत्साह जपत राहतात, आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत:सह इतरांनाही आनंदी करतात. वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता. शाळेतून निघणार्या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे. |
पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून. परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही. जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा "मिकी माऊस"चा जन्म झाला.
उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, कार्टूनिस्ट, पटकथा लेखक, व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची, वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू, निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड, डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर. स्लीपिंग ब्युटी, अल्लाउद्दीन, सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३०,००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला.
करमणूकीचे आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. या स्थळाचे विशेष म्हणजे,
ही चार प्रमुख थीम पार्क्स, दोन वॉटर पार्क्स, गोल्फची मैदाने, क्रीडासंकुल, मोटारींचा रेसकोर्स, डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे, राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे.
मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल. या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्या पर्यटकांना, सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे.