![]() |
राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी." आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले. |