जहागीरदारांना भेटायचं ठरवलं तेव्हा डोळ्यासमोर एक पन्नाशी ओलांडलेली व्यक्ती नजरेसमोर होती. पण प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा एक उमदा, हसतमुख आणि काहीसा अबोल तरूण समोर आला. पण जसजशी मुलाखत पुढे सरकत गेली तसा हा अबोलपणाचा मुखवटा गळून पडला आणि "मुलाखत कसली? – आपल्या मित्राशी केलेल्या गप्पाच या!" असं वाटू लागलं.त्यांच्या आयुष्यात आलेली वळणं पाहून तर थक्कच व्हायला होतं. "हे क्षेत्रच असं आहे हो. यात माणूस नेहमी वरखाली होतच राहणार," हे त्यांचं मनमोकळं मत! या उतारचढावांवर वाटचाल करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमात शिरकाव करू पाहणाऱ्यांनी तशी मानसिक तयारी करूनच यात उतरलं पाहिजे – हे सतीचं वाण आहे – हे त्यांच्या मुलाखतीमुळं जाणवलं.
तर अशी ही – म्हटली तर मुलाखत! नाहीतर साध्या गप्पाच.
****
प्र. : जहागीरदारसाहेब,आपली वैयक्तिक माहिती...
उ. : माझं पूर्ण नाव - सुहास वसंत जहागीरदार. माझा जन्म कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर एक जमखंडी म्हणून जुने संस्थान आहे तिथे १९६७ मध्ये झाला. ते माझं आजोळ. वडील पशुसंवर्धन खात्यात – राज्य सरकारच्या नोकरीत – होते. आमचं मूळ गाव सोलापूर! कसं होतं... की सोलापुरात आजी आजोबा होते, घर होतं . पण वडील फिरतीच्या नोकरीवर- त्यामुळे दर तीन वर्षांनी बदली होत असे. पण नंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. जवळपास गेली वीस-बावीस वर्षे आता पुण्यात स्थायिक आहोत.माझं लग्न (अर्थातच) झालेलं आहे आणि मला एक – एकच मुलगा आहे.
प्र.: आपले शिक्षण या मनोरंजन क्षेत्राशी संबंधित होते की नंतर या क्षेत्राकडे वळलात?
उ.: नाही. मी गरवारे मधून (पुण्याचे गरवारे महाविद्यालय) सायन्स ग्रॅज्युअट झालो. त्या वेळपासून किंवा अगदी शाळेपासूनच या क्षेत्राची आवड होती. सिनेमा-टीव्ही या क्षेत्राचे प्रचंड आकर्षण. म्हणजे त्यावेळी टीव्ही फारसा नव्हता. पण चित्रपटाचं भयंकर आकर्षण होतं. तसं ते सगळ्यांनाच असतं. म्हणजे कॉलेज बुडवून चित्रपट बघायचे, तासनतास सिनेमावर चर्चा वगैरे... कदाचित मला जरा जास्त आकर्षण असावं! तर असं सगळं चलायचं – त्यावेळी मनानं घेतलं की याच क्षेत्रात काही करायचं. बऱ्याच जणांना त्यावेळी तसं वाटत असतं.
प्र. : खरं आहे. पण तुमचा ओढा मुळात स्टेजकडे होता की चित्रपटाकडे?
उ.: खरा ओढा चित्रपटांकडेच होता. बिमल रॉय,गुरु दत्त, राज कपूर, सत्यजीत रे – सगळ्यांचे खूप सिनेमे पाहिले- अगदी भारावूनच गेलो होतो. आम्ही मुलामुलांनी मिळून एक ग्रूप तयार केला होता. सगळ्यांनाच ही आवड होती. मग आम्ही नाटकं करायचो - गणेशोत्सवात वगैरे. नवख्या तरुण मुलांना त्यावेळी थेट चित्रपटात काम करण्यासारखी परिस्थिती नव्हती. म्हणून ती दुधाची तहान गणपतीत नाटके करून ताकावर भागवली. मग कुणी नाटकं, एकांकिका लिहायचा, कुणी त्यात काम करायचे, कुणी नेपथ्य, संगीत, प्रकाश – पण नेहमीच डायरेक्टर एकच असायचा – तो म्हणजे मी! - (हसतात). मला फोटोग्राफीचीसुद्धा आवड होती. पण पांढरपेशा, मध्यमवर्गीय कुटुंबात असल्याने काय करायचं ते कळत नव्हतं. या क्षेत्राची काहीच पार्श्वभूमी नव्हती.,ओळखी नव्हत्या. त्यातून मग.. पण मला पुण्याच्या ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीची खूप मदत झाली. तिथे जाऊन तासनतास फोटोग्राफीवरची पुस्तकं वाचायचो. मराठीत फारसं नाही ना त्यावर! त्यामुळे हळुहळू फिल्म आणि फोटोग्राफीबद्दल 'थियरॉटिकल' माहिती होत गेली. काय आहे – कुणाची ओळखपाळख नाही, वातावरण नाही – तरीही फक्त आवड आहे, काहीतरी करायचंय अशा परिस्थितीत तेवढंच करता येण्यासारखं होतं.
प्र.: पण त्यासाठी नक्की काय वाचायचं – याची जाणीव तुम्हाला होती असं दिसतं. कारण त्या वयात शक्यतो कथा, कादंबऱ्या असल्या मनोरंजक वाचनाकडे सर्वसामान्यांचा ओढा असतो...
उ.: ते तर वाचायचोच. आणि जाणीवपूर्वक वाचनाबद्दल म्हणाल तर ते तसं सोपं आहे हो. ब्रिटिश काऊन्सिलच्या लायब्ररीत त्यावर एक स्वतंत्र विभागच आहे. तिथं जायचं, हवं ते पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. आवड असल्यामुळे तीही मनोरंजकच वाटत होती.
प्र.: मग माहिती म्हणजे - कॅमऱ्याचे वगैरे प्रकार?
उ.: कॅमेऱ्याचे प्रकार हा टेक्निकल भाग झाला. त्यातला थिओरॉटिकल भाग समजून घेण्यावर माझा भर होता. म्हणजे काय झालं माझा एक मित्र होता आर्टस्कूलमध्ये- पुण्याचं अभिनव कॉलेज - आता तो मस्कतला असतो. तर त्यालाही फोटोग्राफीची फार आवड होती. त्याचे भाऊजी होते त्यावेळी दुबईला. त्यांनी एक कॅमेरा पाठवला होता- निकॉन एफ २ एस एच - एस एल आर म्हणून. एकदम मस्त होता तो. अजूनही एक उत्कृष्ट कॅमेरा म्हणून तो ओळखला जातो. तो घेऊन आम्ही निरनिराळे प्रयोग करून फोटो काढायचो. पुस्तकं वाचायची – एक्सपोजर म्हणजे काय? – फोकस कसा लावायचा? डेप्थ ऑफ फील्ड काय असतं? – आणि मग त्याप्रमाणे प्रयोग करून फोटो काढायचे. स्टिल आणि सिनेमॅटोग्राफीचं तंत्र तसं सारखच असतं. म्हणजे त्यावेळी तरी होतं. १५ वर्षांपूर्वी - आता त्या तंत्रांमध्ये बराच फरक पडलाय. तर अशी ही थियरॉटिकल तयारी झाली.
प्र.: पण तरीही पार्श्वभूमी नसताना एवढ्याच बळावर त्याच क्षेत्रात पुढे इतकी प्रगती करणे म्हणजे विशेष आहे...
उ.: त्याचं काय झालं - त्यावेळी कॉलेजात नुकतंच नवीन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग वगैरे सुरू झालं होतं. शेवटच्या वर्षाला. मग इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन वगैरे विषयही होते - ऐच्छिक म्हणून. आमची ती बहुतेक पहिलीच बॅच असावी. मी मात्र त्यावेळी ऐच्छिक विषय म्हणून सिनेमॅटोग्राफी हा विषय निवडला.
प्र.: एकदम सिनेमॅटोग्राफी? बापरे! त्या विषयाला प्राध्यापक तरी होते का?
उ.: होते. पण तेही तसे नवीनच होते. आम्हाला दांडेकर म्हणून एक सर हा विषय शिकवत असत. त्यांना मी भरपूर प्रश्न विचारत असे. मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो म्हणा ना! तर आम्हाला एक प्रोजेक्ट असायचा शेवटच्या वर्षाला. मी त्यावेळी एक प्रोजेक्टर तयार केला होता – स्लाईड प्रोजेक्टर – त्याचं भरपूर कौतुक झालं. तर या विषयातली एवढीच अधिकृत शैक्षणिक वाटचाल म्हणता येईल. मग ग्रॅज्युएट झालो.
मी पुण्याचा..त्यामुळं पुढची पायरी म्हणजे अर्थातच - पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट!
प्र. : पण अशा वेगळ्या वाटेवर जाण्यासाठी घरच्यांचा विरोध होता का?
उ.: तसा घरातून विरोध नव्हता. पण तरी साशंकता - चित्रपटात करियर करायचं म्हणजे नक्की काय? त्या क्षेत्रात आयुष्य सुरळीत काढता येईल का? घरचेच काय पण शेजारीपाजारी, पाहुणेमंडळी हेच विचारत. त्यामुळे मलाही धाडस करण्यापूर्वी विचार करायला लागला. मग मी मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये काही कोर्स करून ठेवले. म्हणजे अगदी जमलंच नाही तर ऐनवेळी गोंधळ नको. कारण फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळणं फार अवघड होतं. आताही आहे. पण आता बरेच ऑप्शन्स आहेत. फारसे ऑप्शन नव्हते त्यावेळी. सिनेमॅटोग्राफीसाठी पूर्ण भारतातून फक्त दहा जणांची निवड व्हायची. अगोदर रुटीन ऑब्जेक्टीव्ह स्वरूपाची एक चाळणी परीक्षा अखिल भारतीय पातळीवर व्हायची. त्यातले ९०% च्या वर मार्क मिळवणारे निवडले जायचे. मग त्यांच्यासाठी १५ दिवसांचा ओरीएंटेशन कोर्स - तोंडओळख करून देणारा अभ्यासक्रम असायचा. त्यात जागतिक दर्जाच्या फिल्म दाखवतात. सगळेजण एकत्र रहातात - एकत्र शिकतात - एकत्र परीक्षा देतात. मला वाटते ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. तर या अंतिम परीक्षेत निवडलल्यांची एक तोंडी परीक्षा - इंटरव्ह्यू ! ती घ्यायला चित्रपट क्षेत्रातील अत्यंत नामांकित व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलावतात. आमच्या वेळी मल्याळम मधले दर्जेदार सिनेमॅटोग्राफर आणि डायरेक्टर आहेत – 'शाजी करून' नावाचे – त्यांना बोलावलं होतं. इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. पण फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं.
मग आता पुन्हा वर्षभर थांबायचं, पुन्हा परीक्षा या चक्रातून जायचं. आता ते शक्य वाटत नव्हतं. मग मी एफटीआयआय चा नाद सोडून दिला. सरळ मार्केटिंगमध्ये नोकरीला लागलो.
माझं लग्न बरंच लवकर झालं. सव्विसाव्या वर्षी! .. नाही.. सव्विसाव्या वर्षी मला मुलगा झाला....(आठवत)...नाही .. बरोबर - लग्नच झालं. मी अधूनमधून बायकोशी या क्षेत्राबद्दल असलेल्या माझ्या ओढीबद्दल बोलतच होतो. मग एका साताऱ्याच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. बऱ्यापैकी पगार होता. भारतभर नोकरीच्या निमितानं फिरत असे. "आता मार्गाला लागलाय" असं लोक म्हणू लागले अशा अशा स्टेजपर्यंत आलो. पण...! माझी बदली झाली. बदली म्हणजे कंपनीनं पुण्याचं मार्केटिंग हेड ऑफिस बंद करून साताऱ्यात नेलं. मला साताऱ्याला बोलावलं. मग मी विचार केला, केलं तर आताच नाहीतर कधीच होणार नाही. बायकोशी बोललो आणि नोकरी सोडली. खरंतर ती त्यावेळी प्रेग्नंट होती. पण तरीही सोडली नोकरी. “मागे फक्त मार्केटिंगचे पाठबळ होतं... आता काय करायचं?” असा विचार करत असतानाच - जाता येता 'बालचित्रवाणी' ची पाटी पहात असे - तिथं घुसलो. तिथं कोणीच ओळखीचे नव्हते. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना सांगितलं की असं-असं मला यात काही करायचं आहे. मग त्यांनी माझी मागची-पुढची माहिती घेतली. माझं मार्केटिंग बॅकग्राउंड होतं. त्यांचं एक खासगी प्रॉडक्शन हाउस होतं. ते म्हणाले,"इथं तर काही काम नाही. पण माझ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग कराल तर नोकरी आहे." मी बर म्हणालो. त्यांच्या फर्मच्या नावानं माझी व्हिजिटंग कार्ड छापून घेतली आणि फिरू लागलो.
प्र.: (हसत) हे म्हणजे आपल्या नोकरीसाठी दुसऱ्याचा व्यवसाय चालवण्यासारखं झालं...
उ.: हो ना.. मग इंडस्ट्रियल एरियात फिरू लागलो. बजाज वगैरे... त्यावेळी यातलं काहीच माहीत नव्हतं. लोक प्रश्न विचारायचे.. मी वाचून माहिती करून घ्यायचो-व्हीएचेस, यूमॅटिक, बीटाकॅम वगैरे काहीच माहित नव्हतं. वाचत गेलो तशी माहिती वाढली.मग काही कामं मिळाली. जाहिराती . एक मोठं काम म्हणजे 'इफको' - ती खतांची कंपनी आहे ना.. त्यांची डॉक्युमेंटरीसदृश जाहिरात. म्हणजे खतांचा योग्य वापर कसा करावा, कोणती खते वापरावीत अशी.. हळूहळू ओळखी वाढत गेल्या, माहिती मिळत गेली. पुण्यात या क्षेत्रातल्या साऱ्यांची ओळख झाली- अजूनही ते माझे मित्र आहेत. आता याही क्षेत्रात बऱ्यापैकी जम बसला. पण तेच तेच करून प्रगती होत नव्हती. पुढे काय करायचं असा प्रश्न पडला. मग एके दिवशी पेपरमध्ये कळले की सिद्धार्थ काक पुण्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांचा 'सुरभी' हा दूरदर्शनवरचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. इथून-तिथून माहिती काढली. तेव्हा ते - पुण्यात अमीर हॉटेल म्हणून आहे - तिथे उतरल्याचं कळलं. त्यांचा फोन नंबर मिळवून त्यांच्याशी बोललो. जाऊन भेटलो. ते पुण्यात जयंत नारळीकरांना भेटायला आले होते. 'सुरभी'त 'ज्ञान-विज्ञान' नावाचा एक विभाग सुरू करण्याचं घाटत होतं. त्यांनी मला स्थानिक पातळीवर 'सुरभी'चा समन्वयक (लोकल कोऑर्डिनेटर) म्हणून काम करण्याची संधी दिली. मी ते काम करू लागलो. हळुहळू तो पूर्ण विभागच माझ्या ताब्यात आला. म्हणजे पत्रं यायची, त्यांची उत्तरं शूट करून मी थेट 'सुरभी'ला पाठवू लागलो. फक्त टेक्निकल काम सोडून सगळं काम मीच करू लागलो. मग एडिटिंग करू लागलो. हळूहळू मी 'सुरभी'चाच होऊन गेलो - तिथे मग मी टीम डायरेक्टर बनलो. म्हणजे -आजूबाजूच्या स्टोरीज करायला लागलो. मग पूर्ण भारतभर फिरून वेगवेगळ्या स्टोरीज करू लागलो. खूप शिकायला मिळालं - टेलिव्हिजन म्हणजे काय? - फिल्मस कशा बनतात- त्याची ट्रीटमेंट कशी असते- तिचं महत्व काय? स्टोरीज लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या?- अगदी खोलात जाऊन शिकायला मिळालं.
त्याचं काय असतं... सर्वात चॅलेंजिंग काय असेल तर ते आम्हाला एखादी स्टोरी करायला द्यायचे - म्हणजे गंगोत्रीमध्ये एक साधू आहे...फक्त एका कागदभराची माहिती. तिथे जाऊन त्या साधूबरोबर लहानशी माहितीकथा तयार करायची. रीसर्च टीमने माहिती गोळा केलेली असते. कोऑर्डिनेशन टीम स्थानिक व्यवस्था बघते. पण प्रत्यक्ष लोकेशनवर परिस्थिती खूप वेगळी असते. विषयाची मांडणी, हाताळणी कशी करायची? या साऱ्या गोष्टी प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच प्रत्यक्ष पाहून ठरवाव्या लागत. टीम डायरेक्टर म्हणजे सर्वेसर्वा. सारे निर्णय त्याचेच. तिथे गेल्यावर निर्णय घेऊन त्याप्रमाणे करायचं. निर्णय योग्य किंवा अयोग्य असेल पण मग त्याच्या फळाची जबाबदारीसुद्धा डायरेक्टरचीच! त्यामुळे मानसिक तयारी होऊन जाते...ती त्या काळात झाली.
प्र.: तुम्ही 'सुरभी' किती दिवस करत होता?
उ.: 'सुरभी'त मी वर्ष - दीड वर्ष होतो. पण सिद्धार्थ काक आणि त्यांच्या टीम बरोबर पुढे दोन-तीन वर्षं मी काम केलं. नंतर दूरदर्शन साठी 'भूमी' म्हणून एक पर्यावरणविषयक कार्यक्रम मालिका त्यांनी केली. हे साधारण १९९८-९९ सालाच्या आसपास. पण त्यात बऱ्याच मर्यादा होत्या. त्याचवेळी नव्या नव्या वाहिन्या जोमात येत होत्या. आतापर्यंतचे सारे कार्यक्रम 'वास्तव' (नॉन-फिक्शन) स्वरूपाचे होते. १९९९-२०००च्या सुमारास नव्या वाहिन्यांना इतर 'कल्पनाधारित' (फिक्शन) कार्यक्रम हवे होते.
'सुरभी'चे क्रिएटिव्ह डायरेक्टर - अभिलाष भट्टाचार्य झी हिंदीवर एक मालिका करत होते - 'सारे जहांसे अच्छा'. त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला पोस्ट-प्रॉडक्शनची जबाबदारी माझ्याकडे होती - एडिटिंग. डबिंग वगैरे.. भट्टाचार्य एडिटिंग करायला मलाच बसवायचे. तिथे खूप अनुभव मिळाला. राज कपूर म्हणायचे "७५% फिल्म एडिटिंग टेबलवर बनते." खरंच आहे ते!. - मग मी त्या मालिकेचा पूर्ण दिग्दर्शक झालो. दीड दोन वर्षे मी तिचं दिग्दर्शन केलं. तिची थीम 'सामान्यांमधला असामान्य' - असामान्य काम करणारा माणूस अशी होती. पण 'सुरभी'पेक्षा ट्रीटमेंटमध्ये खूपच फरक पडत होता. आताच्या काळात तर फारच फरक पडला आहे. झी हिंदीच्या निमित्ताने परत भारतभर फिरलो. गल्फमध्येही जाऊन आलो. पूर्वीचा अनुभव जमेला असलयामुळे डायरेक्टर म्हणून काम करणे फारसे अवघड गेले नाही. आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो होतो त्यामध्ये.
प्र.: शाळा कॉलेजत नाटकांचे दिग्दर्शन करणे आणि टीव्हीवरचे नॉन फिक्शन / फिक्शन शोज डायरेक्ट करणे यात काय फरक वाटतो तुम्हाला?
उ.: फरक तसा प्रामुख्यानं तंत्राचा आहे. बाकी जी दृष्टी आहे ती तुमच्या मनात असावी लागते. तंत्र शिकता येतं पण दॄष्टी मात्र असायला हवी. अगदी लहानपणापासून वाचन, लोकांबरोबरच्या अनुभवातून ती दृष्टी घडावी लगते. मग पुढे अनुभवाने नवीन तंत्रही अंगवळणी पडत जातं - लो अंगल शॉट लावला तर त्याचा प्रेक्षकांवर काय परिणाम होतो - टॉप अंगलचा इफेक्ट काय होतो - हे तांत्रिक आहे. ते अनुभवातून लक्षात आलं होतं.
प्र. : एकंदर या क्षेत्रात वेळाकाळाचं बंधन नसतं. त्यामुळे कौटुंबिक जीवनात काही फरक पडला का?उ.: नाही. तसं होणार हे गृहीतच धरलेलं होतं. मी माझं कुटुंब पुण्यात ठेवलं होतं. आणि मी मुंबईत राहात होतो. आठवड्याला शनिवार-रविवार नाहीतर जशी सुट्टी मिळेल तसा पुण्याला जात येत होतो. त्यामुळे घरात फारसा फरक पडला नाही. रात्रंदिवस काम करायला लागणं हे तर या क्षेत्राच्या पाचवीलाच पूजलेलं आहे. मी सलग ७२-७२ तास काम केलं आहे. मुंबईत असताना 'मॅरिड बॅचलर' सारखाच जगत होतो. त्यामुळे माझ्या बाहेर राहण्याचा घरच्यांना फारसा त्रास झाला नाही. मला एकच मुलगा आहे. त्याला ते फारसं जाणवलं नसावं असं वाटतं.