प्र.: तुम्ही आता पूर्ण वेळ दिग्दर्शकाच्या भूमिकेत आलात. मग तिथून हा प्रमुख निर्मात्यापर्यंतचा प्रवास कसा झाला?
उ.: खूप संघर्ष आहे या प्रवासात. म्हणजे फिल्म आणि टेलिव्हिजन या क्षेत्रातच खूप स्ट्रगल आहे. विशेष ओळखी नसतील आणि या क्षेत्राबद्दल माहिती नसेल तर फारच अवघड आहे. आणि त्यात माझे घरगुती प्रश्न. दोन-दोन घरे.. पुणे-मुंबई जाऊन येऊन. त्यामुळे पैशांची अतिशय, कायम चणचण! 'सारे जहांसे अच्छा'मुळे थोडी आर्थिक स्थिरता आली. मग आता पुढे काय करायचं? तर फिल्म. ते माझं उद्दिष्ट पहिल्यापासूनच होतं. टीव्हीचं फारसं मनावर घेतलं नव्हतं. तशी मी एक-दोन सीरियल्स केली डायरेक्टर म्हणून. पण त्यात मन रमत नव्हतं. माझा एक मित्र त्यावेळी संजय लीला भन्सालींकडे काम करत होता. त्याच्या ओळखीने त्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी त्यांच्या देवदासची तयारी सुरू होती. त्यांनी मग मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून घेतलं. मग स्क्रिप्टवर काम करू लागलो. मूळ कादंबरी वाचून काढली. त्यांच्या मनात काय आहे ते बघितलं आणि मग स्क्रिप्ट तयार होऊ लागलं. खूप मिटिंगा व्हायच्या, सारख्या चर्चा व्हायच्या. मग जवळजवळ दोन सव्वा दोन वर्षे त्यांच्या बरोबर काम केलं - ते अगदी स्क्रिप्टपासून ते देवदास थिएटरमध्ये रिलीज होईपर्यंत. तिथेही खूपच शिकायला मिळालं. फिल्म हे माध्यम काय आहे त्याचा पूर्ण अंदाज आला. ओळखी झाल्या. त्या क्षेत्राची पूर्ण माहिती झाली. मोठेमोठे स्टार्स, बिग बजेट फिल्म, म्हणजे ती ५० कोटींची पहिलीच फिल्म होती. अवाढव्य सेट वगैरे.. दिग्दर्शकाची भूमिका काय असते ते संजयजींकडून शिकलो. पण एक मात्र होतं. हे सगळं करत असताना वाचन सुरू होतं. त्यामुळे प्रॅक्टिकल आणि थियरीची सांगड झाली. पूर्वी फिल्मची फक्त थियरी माहीत होती. आता प्रत्यक्षात उतरवता आली. दिवसभर काम करून रात्री वाचन- पण फिक्शन सीरियलपासून मिळालेलं आर्थिक स्थैर्य पुन्हा ढेपाळलं. कारण फिल्ममध्ये फारसे पैसे मिळत नाहीत.
प्र: कमाल आहे.. नियमित नोकरीमुळे येणारं स्थैर्य डावलून मालिकांचं दिग्दर्शन. त्यात येणारं स्थैर्य नाकारून फिल्म. हाताशी आलेलं स्थैर्य सोडून नवं आव्हान स्वीकारण्याची ही वृत्ती...
उ.: ...पण हे क्षेत्रच तसं आहे हो. सारखं वरखाली, उतार चढाव,उतार चढाव,उतार चढाव. त्याला पर्याय नाही. या क्षेत्रात कोणीच कायमचे वर राहू शकत नाही आणि कायम खाली राहू शकत नाही. अगदी टॉपचा डायरेक्टर एखादी फिल्म पडताच भुईसपाट होतो. पुन्हा प्रयत्न करून चांगली फिल्म बनवतो आणि पुन्हा वर येतो. हे क्षेत्रच तसं आहे.
प्र.: पण एका विशिष्ट पातळीवर पोचल्यानंतर अपयशी होणं शक्य आहे का?
उ.: याच्यावरती विचार करताना एका लार्जर पर्स्पेक्टिव मधून विचार करायला पाहिजे.काही मोजकी लोकं आहेत जी आपल्याला कायमच यशस्वी झालेली दिसतात.पण त्यांच्या पाठीमागे या क्षेत्रात शेकडो, हजारो माणसं अशी आहेत की ज्यांच्या बाबतीत आपल्याला काहीच माहीत होत नाही , आयुष्यात असे उतार चढाव कायम होत असतात.
प्र.: आता आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर अशी नावं प्रसिद्ध आहेत...
उ.: आशुतोष गोवारीकरनी किती स्ट्रगल केलंय. त्याच्याही बाबतीत उतार-चढाव आहेतच.
प्र. : त्यांच्या बाबतीत हे वरखाली होणं कदाचित त्यांच्या चित्रपटांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादावर अवलंबून होतं. पण तुम्ही मात्र जाणूनबुजून हातातोंडाशी आलेलं स्थैर्य डावलून पुन्हा नव्या वाटेकडं वळलात हे विशेष. ही सारखं झगडत राहण्याची झुंजार वृत्ती तुमच्यात दिसते असं म्हणायचं आहे.
देवदासनंतर पुढं काय करायचं ठरवलंत?टी.व्ही.कडे पुन्हा कसे आलात?
उ.: देवदासनंतर संजयजींनी 'बाजीराव-मस्तानी' बनवायचं ठरवलं होतं. पण त्याची तयारी सुरू व्हायला वेळ होता. एक फिल्म झाली की ते मधे थोडी विश्रांती घेतात. आणि विशेषतः देवदाससारखा प्रचंड चित्रपट झाल्यावर तर ती विश्रांती फार गरजेची होती. या फिल्ममध्ये इतक्या अडचणी आल्या की विचारू नका. मधेमधे बरेच आर्थिक प्रश्न निर्माण झाले.मोठेमोठे अपघात झाले. सेटला आग लागून काही लाइटबॉइजचा मृत्यू झाला. असे बरेच अडथळे मध्ये येत गेले. त्यामुळे जेव्हा ती फिल्म रिलीज झाली तेव्हा " हुश्श! संपलं बाबा एकदाचं" अशी भावना होती.देवदासचंसुद्धा सगळं पोस्ट-प्रोडक्शन मी पाहिलं. पहिल्या पासूनच माझा स्वतःला एक पोस्ट-प्रोडक्शनची भयंकर आवड आहे. शूटिंगपेक्षाही जास्त! देवदासच्यासुद्धा डबिंग आणि मिक्सिंग या दोन गोष्टींचा इन्चार्ज मी होतो. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे देवदासच्या ऑडिओ कॅसेटवर माझं असिस्टंट डायरेक्टर म्हणून नाव आहे. पूर्ण चित्रपटाच्या काळात जवळजवळ वीस-एक असिस्टंट डायरेक्टर येऊन गेले. त्यातले आम्ही चारपाच जण पहिल्यापासून शेवटपर्यंत कायम राहिलो. तसा काही पायंडा नसताना संजयजींनी आमची नावं त्या कॅसेटवर घालायला लावली. अशी गोष्ट अगोदर माझ्या पाहण्यात नव्हती आणि नंतरही नाही...तर देवदास संपला आणि अजून नवा चित्रपट सुरू होत नाही असा काही वेळ गेला. मी ठरवलं होतं त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी काम करायचं. ओळखीचे लोक होते, सगळा संच तयार होता. त्यांच्या (संजयजींच्या) मनात सलमान खान आणि ऐश्वर्या यांना घेऊन 'बाजीराव मस्तानी' चित्रपट करायचं होतं. त्याचवेळेला त्या दोघांचे प्रॉब्लेम्स सुरू होते. त्यामुळे ऐश्वर्या तयार होत नव्हती सलमानबरोबर काम करायला... वगैरे असे बरेच प्रकार होते. त्यामुळे ते थोडंसं लांबणीवर पडत होतं.मग पुढची फिल्म काय करावी ते अजून नक्की ठरत नव्हतं. त्यामुळे मी मधल्या काळात परत टीव्हीकडे वळलो - विशेषतः कमाईच्या दृष्टीकोनातून. मग मी परत हिंदी सीरियल्स करायला लागलो. 'भूमीपुत्र' नावाची एक सिरियल केली. कधीकधी कोणी एखाद्या मालिकेचा नेहमीचा डायरेक्टर शेड्यूलच्या समस्येमुळे एखादा भाग करू शकत नसेल तर त्याच्या ऐवजी तो भाग मी दिग्दर्शित करत असे. त्याला 'क्रॅश डायरेक्टर' असं म्हणतात.पण अजूनही संजयजींच्या बोलावण्याची वाट पहातच होतो. पण त्याला खूपच उशीर होत गेला. तेव्हा टेलिव्हिजन खूप पुढे आलं होतं. ही २००४मधली गोष्ट आहे.आधीच्या ४-५ वर्षात विशेषतः मराठी वाहिन्या जोमात आल्या होत्या. या माध्यमाची फारशी माहिती होती असं नाही. पण दिग्दर्शन कसं करावं, लोकांना आवडेल अशा रीतीने कथेची मांडणी कशी करावी,त्यातले शॉट कसे घ्यावेत, कथानक जास्तीत जास्त नाट्यपूर्ण कसं बनवावं,त्याचा परिणाम कसा होईल या गोष्टींची कल्पना होती आणि त्याप्रमाणे काम करत होतो. त्यानंतर इथली ई-टीव्हीची ऑफर आली.
प्र.: ती कशी काय? म्हणजे या जागेची जाहिरात आली होती काय?
उ.: इथे माझ्या अगोदर संजय दाबके होते. ते माझे खूप जुने मित्र - पुण्याचे. त्यांचा टेलिव्हिजनचा अभ्यास होता. भारतात टेलिव्हिजन प्रोग्रामिंग शिकलेल्या काही मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे संजय दाबके.त्यांनी माझं नाव इथे सुचवलं होतं. इंटरव्ह्यू झाले आणि मग मी ई-टीव्हीला जॉईन झालो. त्यावेळी मनात होतं - आता परत सगळं क्षेत्र बदलणार. त्यावेळी सकाळपासून रात्रीपर्यंत शूटिंग करत होतो. आता इथे सगळं वातावरण बदलणार.इथे सगळं ऑफिशियल काम. टेबल,खुर्चीवर बसून कारकुनी केल्यासारखं. पण संजय दाबकेंनी मला सांगितलं की हे क्षेत्र खूप वेगळं आहे. त्यामुळे प्रसार-माध्यमाचा एक वेगळा दृष्टिकोन यातून मिळू शकतो.म्हणून म्हटलं की चला, हाही अनुभव घेऊन बघू. आणि त्यांचं म्हणणं खरंच झालं. गेल्या दोन वर्षात या माध्यमाबद्दल खूप शिकायला मिळालं. सर्वसामान्य लोकांना - मासेसना काय आवडतं - शंभर लोकांच्या ग्रूपला काय आवडतं, हजार लोकांच्या ग्रूपला काय आवडतं,दहा हजार लोकांना काय आवडतं, एक लाख लोकांना काय आवडतं, दहा लाख लोकांना काय आवडतं त्याचा एक अंदाज - ज्याला सर्वसामान्य लोकांच्या आवडीचं विहंगावलोकन (बर्डस आय व्ह्यू) म्हणता येईल ते मिळालं.आता मला इथं दोन वर्ष पूर्ण झाली.
प्र. इथलं एकूण काम कसं चालतं?
उ.: टीव्हीमध्ये काही महत्त्वाची डिपार्टमेंटस असतात.मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, अकाउंट,प्रॉडक्शन - जे प्रत्यक्ष कार्यक्रम निर्माण करतं,टेक्निकल अशी वाहिनीसाठी खूप महत्त्वाची डिपार्टमेंट असतात .पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोग्रामिंग डिपार्टमेंट आहे. ते कोणत्याही वाहिनीचं हृदय असतं. बाकीची डिपार्टमेंट त्याला टेकू देतात. कोणता कार्यक्रम करायचा, तो का करायचा आणि तो कोणत्या वेळी दाखवायचा यामागचे तर्कशुद्ध निर्णय प्रोग्रामिंग डिपार्टमेंटचे असतात. कार्यक्रम ठरवणं, त्याचा तपशील ठरवणे, तुम्हाला कोणत्या प्रेक्षकांसमोर तो सादर करायचा आहे ते ठरवणं हे सगळं या डिपार्टमेंटला अभ्यासपूर्वक करावं लागतं. त्याचे निर्णय इतर सर्व डिपार्टमेंटांना मान्य करावे लागतात. मी याच डिपार्टमेंटचा प्रमुख आहे.
प्र.: म्हणजे ई-टीव्ही मराठीवर दाखवले जाणारे सर्व कार्यक्रम तुमच्याच निर्णयावर ठरतात. मग अमुक एक कार्यक्रम करायचा हे तुम्ही कोणत्या निकषावर ठरवता? म्हणजे समजा, जर एखादा निर्माता, लेखक किंवा दिग्दर्शक त्याची कल्पना घेऊन तुमच्याकडे आला तर त्याचा कार्यक्रम करायचा की नाही हे तुम्ही कसे ठरवता?
उ.: कसं असतं की खूप लोक आमच्याकडे कल्पना घेऊन येतात. आमच्याकडेच कशाला? प्रत्येक वाहिनीकडे अनेक निर्माते येत असतात- नव्या कल्पना घेऊन.आणि हे कोणत्याही वाहिनीसाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण वाहिनी म्हणजे प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारी दहा-बारा मंडळी नाहीत. तर बाहेर ही जी कल्पनाशक्तीची गंगा वहात आहे ती या वाहिनीला महत्वाची असते. पण वाहिनीचा निर्णय हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. एखाद्या कार्यक्रमाच्या प्रपोजलचं भवितव्य फक्त त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असू शकत नाही तर वाहिनीच्या गरजेवरपण अवलंबून असतं. समजा माझ्याकडे एक सीरियल आली. ती मला खूप आवडली . मी ती इतरांना वाचायला दिली, त्यांनाही खूप आवडली . आणखी दहा-बारा लोकांनाही आवडली तरी ती प्रसारित होईलच याची खात्री नाही. कारण वाहिनीला त्या पद्धतीच्या कार्यक्रमाची गरज असावी लागते. कोणत्या वेळेत ती प्रसारीत करावी लागेल, तिथे सुरू असणारी मालिका लोकांना किती आवडते, ती काढून ही नवी मालिका घातली तर प्रेक्षकांच्या संख्येवर काय परिणाम होईल याचा सर्वांगीण विचार करावा लागतो.जर त्या वेळेला खूप मेलोड्रामॅटीक सिरियल हवी असेल आणि नवी मालिका खूपच सॉफ्ट, सॉफिस्टेकेटेड असेल तर तिथे ती दाखवता येणार नाही. त्यामुळे वाहिनीच्या गरजेप्रमाणे याचा विचार होतो.
प्र.: यामध्ये वाहिनीच्या गरजेचं गणित जरूर असेल. पण ते नंतरचं झालं... पण प्रसारित होण्याआधीच एखादी नवी मालिका लोकांना आवडेल की नाही ते तुम्ही कसे ठरवता?
उ.: समजा हा आठ वाजताचा स्लॉट आहे. त्यात सुरू असलेल्या मालिकेचे टी.आर.पी. (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट) रेटिंग खूप कमी झाले आहेत. ती बदलायची आहे. मग आमचं रीसर्च डिपार्टमेंट अभ्यास करतं. त्या वेळेअगोदरची मालिका कोणती आहे, नंतरची कोणती आहे, कोणत्या वयोगटातला, कोणत्या लिंगाचा, कोणत्या आर्थिक स्तरातला प्रेक्षक वर्ग ती पाहू शकेल आणि त्याला ती आवडेल अशा वेगवेगळ्या कोनातून त्याचा अभ्यास केला जातो. मग साधारण ढोबळमानानं कशा प्रकारचा कार्यक्रम हवा आहे ते ठरवलं जातं. मग आता आपल्याकडे कोणत्या मालिकांचा, कार्यक्रमांचा प्रस्ताव आहे ते पाहून त्यातून कार्यक्रमाची निवड होते. जर तसा कार्यक्रम प्रस्तावित नसेल तर एखाद्या निर्मात्याकडून तो तयार करवला जातो. एवढे सारे करून सुद्धा तो प्रसारित होण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये काही खासगी शंभर-एक प्रेक्षकांसमोर तो प्रदर्शित केला जातो. पहा आणि तुमची मतं द्या. त्यांच्याकडून प्रतिसाद मागवले जातात. हा सारा डेटा (विदा) आमच्याकडे येतो. त्याचे पृथक्करण करून निष्कर्ष काढला जातो. कथेविषयी, संवादांविषयी, सादरीकरणाविषयी लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याचे विश्लेषण केले जाते. आणि एवढे सगळे करून जर तो त्यांना आवडला नसेल तर तो रद्द करण्यात येतो.
आणि महत्त्वाचं म्हणजे एवढं सारं करूनही प्रसारित होणारा कार्यक्रम किंवा मालिका यशस्वी होईलच याची खात्री नसते.पण हे सारं करावं लागतं कारण त्यावर लावलेले आर्थिक आडाखे मोठे असतात.
प्र.: या साऱ्या जंजाळातून निभाव लागणं कठीण वाटत असलं तरी जर एखाद्या होतकरू लेखकाला किंवा दिग्दर्शकाला आपली कल्पना तुमच्यापर्यंत पोचवायची असेल तर त्याने काय करावं?
उ.: तुम्हाला एक गोष्ट मी मनापासून सांगतोय. या पूर्ण नेटवर्कची जी विचारसरणी आहे ती सांगतो. आम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी तळमळीनं काम करतो. इतकं मोठं व्यासपीठ सुदैवानं आम्हाला मिळालं. त्यात आम्ही काही योगदान देण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच मग भजन स्पर्धेसारखे मराठी मातीतले,अस्सल मराठमोळे कार्यक्रम आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. भजन म्हणजे मराठी मातीत रुजलेली लोककला. त्यामुळे अगदी लहान-लहान खेड्यातल्या लोकांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळते.अशी आमची विचारसरणी असल्यामुळे कुणाला कसल्याही कल्पना पाठवायच्या असतील तर त्यांचं नेहमीच स्वागत आहे.कारण कोणतीही वाहिनी चालते, तरते, वाढते ती केवळ नवनवीन कल्पनांमुळे. कोणती कल्पना कोणाकडून येईल आणि त्या कल्पनेतून आणखी कोणती कल्पना निघेल ते सांगता येणं कठीण आहे.त्यामुळे कुणालाही काही कल्पना सुचवायच्या असल्यास त्या आम्हाला ई-मेलने किंवा पत्राने कळवू शकतात. त्यांचं स्वागत आहे.