व्योमक्षेमं वहाम्यहम

आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस!
       नुकतंच एक बघितलं, " छोट्याशा सुट्टीत". परत एक बाऊन्सर! मग ठरवलं, आपल्याला जे समजलंय ते लिहून मनोगतावर द्यायचं पाठवून. कोणीतरी असेलच की ज्ञानी. तोच करेल निरुपण.
       उत्तरा या अल्ट्रामॉडर्न नटीबरोबर कार्तिक हा गरीब बिच्चारा कुक (बोटीवरचा स्वैपाकी) लग्नाशिवायच रहात असतो. तो बोटीवर जेंव्हा काम नसेल तेंव्हा घरी तिची सर्व कामे तसेच चहा, कॉफी वगैरे करत असतो. एकदाच भजी केलेली आठवतात. अबोल व गरीब स्वभावाचा असल्यामुळे उत्तराचा वरचढपणा, स्वच्छंदी वागणे, हिशोबी स्वभाव वगैरे सर्व सहन करत असतो. सायरस हा उत्तराचा बालमित्र अमेरिकेहून येणार असे उत्तराच्या चित्कारण्यावरुन कळते. उत्तरा तिच्या स्टायलीत खूष होते. प्रत्यक्षांत सायरस 'व्योम' ला पण घेऊन येतो. सायरस पारशी असल्यामुळे इंग्रजीतच बोलतो. सायरस आणि उत्तराला काय करु आणि काय नको असे झालेले असते. त्यामुळे ती दोघं  'च्यो च्वीट' असं म्हणून एकमेकांचे सारखे गालगुच्चे घेत असतात. कार्तिक हा लग्नाचा नवरा नसल्यामुळे त्याच्या उपस्थितीतच सगळी मजा मजा चालू असते. पहिल्या भेटीचा जोष उतरल्यानंतर सायरस अचानक मी व्योमशी लग्न करणार आहे असे सांगून उपस्थित मॉडर्न लोकांना धक्का देतो, उत्तराला तर चक्क ठसका लागतो! पण क्षणार्धात सावरुन (आपण मॉडर्न असल्याचे आठवताच)  सर्वजण त्या गोssड (प्रेक्षकांच्या मते नव्हे) झिपऱ्या व्योमचे लाड करु लागतात. व्योम नुसताच लाजत असतो तर सायरसची स्थिती तर "औषध व्योमगे मजला" अशी झालेली असते. नाटकाच्याच संबंधात आहे म्हणून सांगतो, लहानपणी ' तो शंकर तुम्हा सुखकर होवो' ही नांदी ऐकल्यावर मला भलतीच शंका आली होती, पण आजोबांना विचारण्याची हिंमत नव्हती.
    अचानक उत्तरा आणि सायरस गांवाला जायचे ठरवतात. उत्तरा ही स्त्रीच असल्यामुळे व्योम निर्धास्त असावा. पण तरी तो 'बोअर' व्हायला लागतो. घरांत फक्त कार्तिकच! मग काय करणार ? तो कार्तिकशी गप्पा मारु लागतो. कार्तिकही त्याची आस्थेने चौकशी करतो. नाटक संपेपर्यंत या दोन जोड्यांमधे किती परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स होऊ शकतील याचा मी मनातल्या मनात आढावा घेतला. पण बहुतेक कार्तिक व्योमकडे केवळ पितृप्रेमानेच बघत असावा असे पुढील संभाषणावरुन वाटले.
उत्तरा व सायरस परत येतात. पण दोघांच्या दारु पार्ट्या व पिऊन आऊट होणे यामुळे कार्तिक व व्योम समदु:खी होतात. उत्तरा ही जरुरीपेक्षा जास्तच उन्मादात वावरत असते. सायरस व्योमशी भांडायला लागतो. प्रेक्षकांना फार टेन्शन येऊ नये म्हणून मधेमधे उत्तराच्या विनोदी मुलाखती होतात. उत्तरा स्त्रीमुक्ती व व्यवहार यांचा तोल चांगलाच सांभाळत असते. तिला एक मोलकरणीचा रोल मिळालेला असतो हे कळते पण त्याची प्रॅक्टिस ती नाटक चालू असतानाच मधेमधे का करत असते ते शेवटपर्यंत कळले नाही.
एकंदरीत नाटककाराला काय संदेश द्यायचा असेल ? सुखी होण्याचे रुढ मार्ग टाळून आडवाटेला गेलेली ही मंडळी परत मुख्य प्रवाहात येऊ पहात असतात का ? की कार्तिकच्या म्हणण्याप्रमाणे  जीवन हे आपण समजतो त्यापेक्षा वेगळंच असतं आणि ते प्रत्येकाने आपल्या अनुभवातून शोधायचं असतं ?  का ही येणाऱ्या युगाची चाहूल आहे ?
         आमच्यासारख्या मतिमंद प्रेक्षकांच्या आवाक्याबाहेरचं आहे हे सगळं.