भाग्यश्री

इंटरनेट वर मी वर्ल्ड व्हिजन नावच्या एका संस्थेची वेबसाइट बघतोय. ही संस्था गरीब देशातील मुलांसाठी पैसे गोळा करते. "स्पॉन्सर अ चाइल्ड" ही त्यांची योजना मला खूपच आवडते. म्हणजे अमुक एक मुलासाठी आपण काही रक्कम देणगी म्हणून द्यायची. पण ते पैसे त्या मुलाला थेट न मिळता, त्याच्या मुहल्ल्या च्या भल्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात एकाएकी परोपकाराची भावना जागृत होते. आणि जोषातच मी कुणातरी बालकाला "स्पॉन्सर" करण्याचा निर्णय घेतो.

थोडावेळ ती वेबसाइट सर्फ केल्यावर मला असं कळतं की आपण आपल्याला हव्या त्या प्रदेशातील बालक निवडू शकतो देणगी देण्यासाठी. ह्यावर अचानक माझा देशाभिमान जागृत होतो. पैसे द्यायचेच तर निदान भारतातल्या मुलासाठी तरी द्यावेत, असा विचार करून मी अधिक गरजवंत दिसणाऱ्या आफ्रिकन मुलांच्या फोटोंना बाजूला सारतो आणि भारतीय मुलांकडे वळतो.

भारतातील मुलांचे फोटो बघताना, माझ्या असं लक्षात येतं की दक्षिण भारतीय मुलांची संख्या अधिक आहे. मग अचानक माझा भाषाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत होतो. त्या सुनामीग्रस्त दक्षिण भारतीय मुलांना मी बाजूला सारतो आणि मराठी मुलांचा शोध घ्यायला लागतो. मुलांची भाषा तिथे लिहिलेली नसते, पण शहर मात्र लिहिलेलं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं शहर आणि त्यातल्या त्यात मराठी वाटेल असं नाव असलेल्या बालकासाठी देणगी द्यायचं मी निश्चित करतो.

शोध घेता घेता, एक इटुकल्या पिटुकल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर येतो. "भाग्यश्री" नाव असतं तिचं. पुण्याची मुलगी आणि नावावरून मराठी वाटतेय आणि काही महिन्यांचीच आहे, एवढ्या भांडवलावर, मी तिला "स्पॉन्सर" करण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात वेबसाइट च्या तळाला "वर्ल्ड व्हिजन ही ख्रिश्चन संस्था आहे" अशी टीप दिसते. अचानक माझा हिंदू धर्माभिमान जागृत होतो. पैसे सरळ वनवासी कल्याण आश्रमाला द्यावेत का असा एक विचार मनात येतो. मनाची चलबिचल होते. पण पुन्हा तो भाग्यश्रीचा हसरा फोटो मला लाइन वर आणतो.

तरीही पैसे भरण्याच्या आधी मी भरलेल्या पैशांवर आयकरातील ८०जी सवलत मिळेल की नाही ह्याची खात्री करून घेतो. आता तर माझा निर्णय अधिकच पक्का होतो. देशाभिमान, भाषाभिमान यांची गोंजारणी, आयकरात सवलत आणि कुणा गरजूला मदत केल्याचं पुण्य, ह्यापेक्षा आणखी काय हवं? मी भराभर माझं नाव, पत्ता, देणगीची रक्कम, भरतो आणि "स्पॉन्सर भाग्यश्री" वर क्लिक करतो. आपण एक अतिशय परोपकारी काम केल्याच्या जाणीवेनं माझा ऊर भरून येतो.

पुढच्याच स्क्रीन वर पैशाच्या भराण्याबाबत माहिती भरायची असते. ते करता करता माझ्या असं लक्षात येतं की माझं क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरायची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. थोड्या दिवसांनी प्रयत्न करा, अशी सूचनासुद्धा स्क्रीन वर येते. तेवढ्यात बायको भजी आणि चहा घेऊन येते. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री, सगळेच चहाच्या कपात विरघळून जातात......

........माझ्या नावाचं जाडजूड पाकीट पत्रपेटी मध्ये पाहून मला आश्चर्यच वाटतं. कुतूहलाने मी ते पाकीट उघडतो. त्यात वर्ल्ड व्हिजन ने मला पाठवलेलं आभारप्रदर्शनाचं पत्र असतं, मी भाग्यश्री ला "स्पॉन्सर" केल्याबद्दल. सोबत तिचा एक छानसा हसरा फोटो. मी चक्रावूनच जातो. पैसे न भरता हे पत्र कसं काय आलं असावं? पुन्हा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती डोकं वर काढायला लगतात. भाग्यश्रीचा हसरा फोटो मनाला टोचणी लावतो. तातडीने मी वर्ल्ड व्हिजन ची वेबसाइट उघडतो. पण आता तिथे स्पॉन्सर करण्यासाठी तिचा फोटो नसतो.

पत्रातून त्यांचा फोन नंबर समजतो. मी फोन लावतो पण त्यांचं कार्यालय आता बंद झालेलं असतं. आता काय करावं? असा विचार करता करताच मी ती कागदपत्र आणि तिचा फोटो पाकिटात टाकतो. टी. व्ही. वर क्रिकेटचा सामना सुरू होतो. ते पाकीट मी कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवतो आणि सचिनची फटकेबाजी बघायला टी. व्ही. समोर बसतो. दुसऱ्याच चेंडूवर सचिन बाद. सचिनला, त्याच्या जाहिरातींना आणि भारतीय संघाला दिलेल्या शिव्यांमध्ये पुन्हा एकदा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री विरून जातात......

...........मी माझा इ-मेल उघडतो. वर्ल्ड व्हिजन कडून मला एक इ-मेल आलेला असतो. विषय - "Your ID 1047587" मजकूर,

"Its very unfortunate that your sponsor child, Bhagyashree had high fever and fell sick. Failing to recover from her sickness, the girl passed away last week"

(अतिशय दुःखपूर्वक असे सांगावे लागत आहे, की आपण स्पॉन्सर केलेली बालिका, भाग्यश्री हिला ताप येऊन ती आजारी पडली. ह्या आजारपणातून बरी होऊ न शकल्याने गेल्याच आठवड्यात मरण पावली.)

माझ्या मेंदूला झिणझिण्या येतात. डोळ्यासमोर भाग्यश्रीचा चेहरा येतो. डोळ्याच्या कडा क्षणभर पाणावतात. फोन खणखणतो. पालीकडून मित्र मला "फुटबॉल खेळायला येतोस का?" म्हणून विचारतो. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती हे सगळे, फुटबॉल ला मारलेल्या लाँग किक सारखे दूरवर जाऊन पडतात.

पण भाग्यश्री मात्र कपाटात ठेवलेल्या त्या पाकिटातील फोटोमधून माझ्याकडे बघून हसत असते. तशीच. कायमची.