अभिजात म्हणजे काय?

मला नेहमी प्रश्न पडतो अभिजात म्हणजे काय? त्याचे निकष नेमके काय? ते कोणी ठरविले? समाजानिहाय अभिजात आवडी-निवडी वेगळ्या असतात काय? उदाहरण द्यायचे झाले तर किशोरी अमोणकर यांचे गायन आवडणे ही अभिजात आवड झाली, पण आनंद शिंदेची गाणी ऐकणे ही आवड अभिजात नाही का?  गझल ऐकणे अभिजात, पण लावणी ऐकायला फडात बसणे अभिजात नाही का? जी गोष्ट एका मोठ्या समुदायाला आवडते तिला खालच्या दर्जाची किंवा अभिरुचिहीन कसे ठरविता येईल? शास्त्रीय संगीत केवळ काही लोकांना आवडते म्हणून ते अभिजात असेल आणि ते लोकही त्याला सोपे न करता त्यांच्यापुरतेच मर्यादित ठेवत असतील, तर अभिजात आवडीचे वर्तुळ विस्तारणार कसे? तसे नसेल तर अभिजात आवडी-निवडी या मर्यादित समुदायापुरत्याच असतात का?  लोकसंगीत ऐकले तर ती आवड अभिजात समजली जात नाही, पण त्याच लोकसंगीताची चाल, ठेका उचलून एखाद्या गाण्यात वापरला की ते गाणे अभिजात कसे होते?
दुसरा मुद्दा. अभिरुची प्रत्येक कलेनिहाय वेगवेगळी असते का? म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकणारा वाचनात मात्र सुहास शिरवळकर वाचत असेल तर त्याला अभिरुचिहीन ठरवायचे का? किंवा चित्रकलेच्या बाबतीत अमूर्त चित्रकला आवडत ( वा कळत) नसेल पण त्याची इतर कलांतील अभिरुची उच्च असेल तर केवळ चित्रकलेच्या मुद्द्यावरून त्याला अभिरुचिहीन ठरवायचे का? की अभिरुची ही नैतिकतेसारखी समाज वा कालसापेक्ष आहे? म्हणजे समाज किंवा काळ बदलला की अभिरुची बदलते? तुम्हाला काय वाटते?