मला जे जे हवे असते, तिला ते ते नको असते
तिला जे जे हवे असते, मला ते ते नको असते
अशी व्यक्ती कशी आयुष्यभरची बायको बनते?
मला ते खेळ प्यारे अन जगाच्या बातम्या प्याऱ्या
तिला सासूसुनांच्या छद्मकपटी मालिका साऱ्या
रिमोटाने तिच्यामाझ्या किती घालायच्या वाऱ्या?
अशी व्यक्ती कशी ...
मला मित्रांसवे भंकस कराया जायचे असते
तिला माझ्यासवे काहीतरी बोलायचे असते
(खरेतर ते कधीही तातडीचे फारसे नसते)
अशी व्यक्ती कशी ...
तिला दिवसातल्या सगळ्याच गोष्टींचे रडू येते
तिचे ते पाहुनी रडणे मला थोडे हसू येते
तरीही मी जवळ घेतो तशी ती दूर का जाते?
अशी व्यक्ती कशी ...
- माफी