बाराच्या आत वसतिगृहात

भारनियमनाचे ते दिवस. केव्हा कधी कुठे अंधार होईल ते सांगता यायचा नाही. त्यात हा पाऊस. हे सगळे कमी म्हणून की काय, रस्त्यावर पाईपलाईन साठी खोल खणून ठेवलेले.

अर्थात मंदा म्हात्रे, चपला चित्रे, शीघ्रा श्रीध आणि द्रुता दिघे जेव्हा सिनेमा पाहायला वसतिगृहातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांना ह्याची कल्पना होतीच त्यासाठीच तर त्यांनी न विसरता आपल्या बरोबर एक चांगली प्रखर विजेरी घेतली होती. वेळेत परत वसतिगृहात येण्याला तर पर्याय नव्हता. रेक्टर सौदामिनी सुळे म्हणजे साक्षात सौदामिनी. बारा वाजता वसतिगृहाचा एकदा दरवाजा लावून घेतला की घेतला. त्यानंतर तो उघडायला लावण्याची कल्पना करण्याचेही धाडस ह्या चौघींना झाले नसते.

सिनेमा तसा बरा होता. तो साधारणपणे सव्वाअकरापर्यंत संपला, आणि ह्या चौघी वसतिगृहाकडे निघाल्या.

पण....

वसतिगृहापाशी पोहोचतात तो काय! सगळीकडे अंधार गुडुप आणि रस्ता पाईपलाईनच्या खोदकामासाठी पूर्ण बंद केलेला! केवळ दोऱ्यांनी बांधलेल्या फळ्यांच्या पुलाचा वापर करून वसतिगृहाच्या दारापर्यंत जाणे शक्य होते. पण त्या पुलावरून एकावेळी जास्तीत जास्त दोघा व्यक्तींनाच जाता आले असते. नाहीतर त्या पुलाचीही काही शाश्वती नव्हती. शिवाय मिट्ट काळोख म्हणजे पलीकडे नेलेली विजेरी पुढच्या व्यक्तीसाठी पुन्हा मागे आणणे भागच होते. बरे, खड्डा एवढा मोठा आणि खोल की विजेरी इकडून तिकडे फेकण्या बिकण्याची शक्यता केव्हाच बाद झालेली होती.

ह्यांच्यातल्या प्रत्येकीला तो पूल ओलांडायला वेगवेगळा वेळ लागला असता. शिवाय दोघींनी एकदम जायचे म्हणजे दोघींतल्या कमी गतीच्या व्यक्तीच्या वेगानेच जावे लागणार! एकेकटीचा विचार केला तर मंदा म्हात्रेला एकटीला तो पूल ओलांडायला १० मिनिटे लागली असती. चपला चित्रेला एकटीला तोच पूल ५ मिनिटात ओलांडता आला असता. शीघ्रा श्रीध एकटी तो पूल २ मिनिटात पार करू शकली असती, तर द्रुता दिघे एकटी केवळ १ मिनिटात पुलावरून पलीकडे गेली असती.

चौघींनी वेळाचा अंदाज घेतला. वसतिगृहाचा दरवाजा बंद होण्यास केवळ १७ मिनिटे बाकी होती.

अर्थात चौघीही अतिशय हुशार होत्या आणि संकटकाळी त्यांची बुद्धिमत्ता अधिकच प्रखर झालेली होती. त्यामुळे त्यांनी झटकन एक योजना आखली, राबवली आणि वसतिगृहाचा दरवाजा बंद होण्याच्या नेमक्या आधी त्या आत पोहोचल्या देखील!

ओळखा पाहू दरवाजा बंद व्हायच्या नेमक्या आत (बाराच्या आत वसतिगृहात!) पोहोचण्यासाठी चौघींनी काय शक्कल लढवली असेल!