शोधू मी कुठे कशी प्रिया तुला?

सौमित्र आणि बकुलचे ते शेवटचे वर्ष होते. बकुल घरी आणि सौमित्र वसतिगृहात राहात होता. आज काही करून सौमित्रकडे जाऊन धडकायचे आणि त्याला चकित करायचे असा चंगच बकुलने बांधला होता. त्याप्रमाणे ती त्या वसतिगृहाशी पोहोचली तो काय!

तिला वाटले तितके त्याच्या खोलीवर जाऊन धडकणे सोपे नव्हते. वसतिगृहाच्या दरवाजापाशी रखवालदाराची चौकी होती! येणाऱ्या पाहुण्यांनी रहिवाश्यांच्या खोलीच्या क्रमांकाचे बटन चौकीत येऊन दाबावे लागे. मग आतून जो रहिवासी असेल तो येऊन पाहुण्याला आत नेऊ शकत असे.

झालं. सगळंच ओम फस की! तिला सौमित्रचे सग्गळे सग्गळे माहित होते ... फक्त खोलीक्रमांक सोडून!

आता काय करावे बरे! समोर वसतिगृहाचा नकाशा होता. वसतिगृहात पन्नास (५०) खोल्या होत्या. त्यांच्या दोन रांगा केलेल्या होत्या. पहिल्या रांगेत १ ते २० आणि दुसऱ्या रांगेत २१ ते ५० अशा खोल्या होत्या.

तेवढ्यात आतून एक हीरो बाहेर आला. हा बकुलच्या डिपार्टमेंटमध्ये 'पडीक' असायचा. बकुल गोंधळलेली पाहून तो पुढे आलाच!

"काय सौमित्रकडे वाटतं!" तो चोंबडेपणे म्हणाला.

चोंबडा तर चोंबडा ह्याला विचारून तर पाहूया, असा विचार करून बकुल म्हणाली, "हो. पण त्याचा खोलीक्रमांक मला कळेल का?"

"हा हा हा ..." चोंबडा रंगात आला. "कळेल. पण तुम्ही मला प्रश्न विचारा. मी फक्त हो किंवा नाही एवढेच सांगीन."

"ठीक आहे. बकुलने विचार केला चोंबडा असला तरी काय हरकत आहे विचारायला? शिवाय ती जात्याच गणितात तयार असल्याने तिला आत्मविश्वास होताच. तिने त्याला असे प्रश्न विचारले.-

१. क्रमांक एकच्या रांगेत त्याची खोली आहे का?

२. खोलीचा क्रमांक सम आहे का?

३. खोलीचा क्रमांक पूर्ण वर्ग आहे का?

ह्या सगळ्या प्रश्नांना त्याने हो किंवा नाही यातली उत्तरे दिली. तिने विचार केला. तरीही तिला एक शंका आलीच. तिने त्याला विचारले,

४. खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?

त्याचेही उत्तर त्याने दिले, आणि चोंबडा निघून गेला. ते ऐकून तिने लगेच विचार करून एका क्रमांकाचे बटन दाबले.

हाय! पण पलीकडून आलेला आवाज सौमित्रचा नव्हताच. म्हणजे चोंबड्याने तिला फसवले होते तर. आता काय करावे बरे? ती अगदी काकुळतीला आली.

तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहून रखवालदारला तिची दया आली. तो म्हणाला, "अहो ताई 'त्या'च्यावर जाऊ नका. एक नंबरचा खोटारडा आहे तो. जे जे विचारावे त्याला खोटी उत्तरे देतो." रखवालदाराने चोंबड्याविषयी अधिक माहिती दिली.

"असे आहे होय!" बकुलचा चेहरा फुललाच. कारण रखवालदाराने दिलेल्या माहितीचा वापर केल्याने तिला क्षणार्धात खोलीक्रमांकाचा नीट उलगडा झाला, आणि तो नंबर तिने दाबला. आणि काय! अवघा आनंदी आनंद!

तिचा सौमित्र तिला मिळाला.

पुढे ते काय बोलले त्याच्याशी आपल्याला काय करायचय? तर अशा प्रकारे, सौमित्रला बकुलने कसे शोधून काढले असावे? त्याचा खोलीक्रमांक किती असावा? थोडक्यात आपल्या प्रियाला बकुलने 'कुठे आणि कसे शोधून काढले, ते सांगता येते का बघा बरे तुम्हाला!