कुठली आधी कुठली नंतर?

सुमेधाबाई सहस्रबुद्धे होत्याच तशा नावाप्रमाणे बुद्धिमान. कधी त्या काय शक्कल लढवतील ते सांगता येत नसे. हेच पाहा ना, आपल्या मंडळात त्यांनी मुलींसाठी एका गुणांकनस्पर्धेचे आयोजन केले. नुसतेच सौंदर्य नाही तर कर्तबगारी, कपड्यांची निवड, आरोग्य, गृहकृत्यदक्षता, बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य, कलाकौशल्य, सामान्यज्ञान इत्यादी सर्व गोष्टींचा कस लागणार होता त्या स्पर्धेत. निरनिराळ्या गुणांना वेगवेगळे 'गुण' द्यायचे होते. वगैरे वगैरे. (ज्या क्रमाने मुलींना गुण मिळतील त्या क्रमाने आपल्या चिरंजीवासाठी स्थळे पाहता येतील असा त्यांचा मनोदय होता!)

तशी स्पर्धा सगळी व्यवस्थित पार पडली खरी; मात्र शेवटच्या क्षणी सुमेधाबाईंना जावेच्या ऑपरेशनला तातडीने मुंबईला जावे लागल्याने नेमके त्यांनाच ह्या स्पर्धेला काही उपस्थित राहता आले नाही. आठवडा त्यांचा त्याच्यातच गेला... झाले? सगळेच मुसळ केरात की नाही?

नाही.

सुमेधाबाई असल्या संकटांनी बावरणाऱ्यातल्या नव्हत्या. आल्या आल्या त्यांनी स्पर्धेचे काय झाले त्याची चौकशी सुरू केली! मात्र नेमका निकाल काय लागला होता तो इतक्या दिवसांनी कोणालाच सगळाच्या सगळा आठवेना. (निदान कुणी सांगे तरी ना!) तरीही त्यांनी धीर सोडला नाही. एकेका मुलीकडेच फोन लावले. पण मुली तरी कसल्या खमक्या. एक जण नीट आणि पूर्ण उत्तर देईल तर शपथ! तरी दिवसभर फोनाफोनी करून सुमेधाबाईंनी माहिती जमवलीच.

ती अशी.

तृप्ती तुळपुळेला लेखा लिमये आणि वर्षा वर्तकपेक्षा कमी; पण मृण्मयी मराठेपेक्षा जास्त गुण मिळाले. पल्लवी परांजपेला दीप्ती दामले आणि लेखा लिमयेपेक्षा जास्त गुण मिळाले. रश्मी राजवाडेला पल्लवी परांजपेपेक्षा कमी; पण जान्हवी जाईल आणि चित्रा चितळेपेक्षा जास्त गुण मिळाले. केतकी कान्हेरेला पल्लवी परांजपे, मृण्मयी मराठे आणि तृप्ती तुळपुळेपेक्षा कमी गुण मिळाले. लेखा लिमयेला वर्षा वर्तक आणि दीप्ती दामलेपेक्षा कमी; पण जान्हवी जाईल आणि मृण्मयी मराठेपेक्षा जास्त गुण मिळाले. मृण्मयी मराठेला रश्मी राजवाडे आणि वर्षा वर्तकपेक्षा कमी गुण मिळाले. वर्षा वर्तकला जान्हवी जाईल, मृण्मयी मराठे आणि पल्लवी परांजपेपेक्षा जास्त गुण मिळाले. दीप्ती दामलेला केतकी कान्हेरे आणि तृप्ती तुळपुळेपेक्षा जास्त; पण रश्मी राजवाडेपेक्षा कमी गुण मिळाले. जान्हवी जाईलला केतकी कान्हेरे, तृप्ती तुळपुळे आणि मृण्मयी मराठेपेक्षा जास्त; पण पल्लवी परांजपे आणि दीप्ती दामलेपेक्षा कमी गुण मिळाले. चित्रा चितळेला मृण्मयी मराठेपेक्षा जास्त; पण लेखा लिमये, जान्हवी जाईल आणि तृप्ती तुळपुळेपेक्षा कमी गुण मिळाले.

काहीशी खटपट केल्यावर सुमेधाबाईंना सगळ्या मुलींचा गुणानुक्रम काढणे जड गेले नाही. बघा बरे तुम्हाला येते का सांगता काय क्रमाने सुमेधाबाई स्थळे पाहायला लागल्या असतील ते?