ते नयन बोलले काहितरी ...

अमेरिकेत मराठी मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना नेत्रा कधी जात नसे. पण ह्यावेळी मंडळाने खास स्पर्धेचा कार्यक्रम ठेवला होता, आणि कुणा ओळखीच्यांच्या मुलीचे भावगीत गायन त्यात व्हायचे होते. त्यांनी सप्रेम आग्रह केला होता त्यामुळे नेत्रा कार्यक्रमाला आली होती. अर्थात तीच तीच गाणी ऐकून ती कंटाळली आणि बाहेर ओसरीवर कॉफी प्यायला म्हणून आली तो काय समोर नयना!!!

नेत्राचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. नयनाच ना ती? हो. हो. दुसऱ्या कुणाचे असे निळे डोळे असणेच शक्य नव्हते. अमेरिकेत इतकी वर्ष एका शहरात राहून आपण एका बालमैत्रिणीला पार विसरून गेलो हे समजून नेत्रा पार ओशाळली. काही असो आता नयनाला गाठलेच पाहिजे.

कॉफीचा कप सावरत मधल्या गर्दीतून  वाट काढत (हो कंटाळणारी नेत्रा काही एकटीच नव्हती ) ती नयनापर्यंत पोहोचली आणि दोघी बाहेर पायऱ्यांवर बसल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर नेत्राला कळले नयना अमेरिकेत दुसऱ्या शहरात होती आणि इथे फक्त एक दोन दिवसांसाठी आलेली होती.  नयनाला तीन मुली होत्या असे तिच्या बोलण्यात आले.

"केवढ्या आहेत मुली तुझ्या?" नेत्राने न चुकता प्रश्न विचारला (नेत्राचा मुलगा या वर्षी हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला होता ना. )

"अं?... चल आपण एक गंमत करू. तूच ओळख माझ्या मुलींची वये! " नयना म्हणाली. (नेत्राला शाळेतले गणिताच्या स्पर्धांचे दिवस आठवले. )

"ठीक आहे. सांग बरे शोधसूत्रे! " (मनोगतची कोडी सोडवून नेत्रा चांगली तयार झाली होती! )

त्याच वेळी आतून "... तू छत्तिस नखरेवाली.... " हे गाणे कुणीतरी म्हणू लागला!

"सांगू? अगदी नेमके गाणे सुरू झाले आहे बघ! माझ्या मुलींच्या वयांचा गुणाकार छत्तीस होतो! " नयना हसत हसत म्हणाली.

नेत्राने बराच विचार केला. मनात आकडेमोड केली. दोन तीन मिनिटे गेली. आतले गाणे संपले.

"काय सापडले का उत्तर? " नयनाने विचारले.

"नाही गं. आणखी शोधसूत्र द्यावे लागणार तुला. " नेत्रा उत्तरली.

तेवढ्यात आतून "चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी... " हे गीतरामायणातले गाणे कुणीतरी म्हणू लागला.

नयनाला पुन्हा हसू आवरेना. "वा वा. काय गाणी लागतायत. ठीक आहे. दुसरे शोधसूत्र. त्यांच्या वयाची बेरीज आजच्या तिथीएवढी आहे! "

'तिथी?' नेत्रा क्षणभर चक्रावलीच; पण लगेच सावरली. तिथी कळायला तिला क्षणाचाही वेळ लागला नाही, कारण मराठी संस्कृती सातासमुद्रापलीकडे जपण्याचा वसा घेतलेल्या मंडळाने समोरच्या भित्तिपत्रकावर तारखेसोबत तिथीही छापलेली दिसत होती. (एरवी नयनाला तरी तिथी एवढ्या पटकन कुठून कळली असती )तरीही थोडावेळ विचार करून ती थांबली. तोवर नयना आत जाऊन  पुन्हा दोघींसाठी कॉफी घेऊन आली. तोवर गाणे संपले होते.

"काय कळले का उत्तर? " नयनाने विचारले.

"अं? नाही गं.   आता आणखी एकच शोधसूत्र दे.   मग ओळखते की नाही बघ! " नेत्रा म्हणाली.

"आता शेवटचेच शोधसूत्र हां. " नयना म्हणाली. "माझ्या मोठ्या मुलीचे डोळे अगदी माझ्यासारखे निळे आहेत! "

त्याच क्षणी नेत्राचे डोळे चमकले  आणि  तिने नयनाच्या मुलींची वये बिनचूक ओळखून दाखवली.

"कशी ओळखलीस वये? सांग बरे. " नयनाने विचारले.

नेत्रा काही सांगणार तोच ".. ते नयन  बोलले काहितरी.... " हे गाणे नेत्राच्या ओळखीच्यांची कन्यका आतून गाऊ लागली. तशा दोघी एकमेकांकडे पाहून सूचक हसल्या आणि चटकन उठून आत  गेल्या.

तर नयनाच्या मुलींची वये काय होती आणि नेत्राने ती कशी ओळखली ते तुम्हाला ओळखता येते का बघा बरे!

(सर्व पात्रे प्रसंग वगैरे काल्पनिक. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

(मूळ कोडे जालावरून साभार. मी फक्त गोष्टीत गुंफले. )