तुला धाडते रे तुला धाडते!

निखिल आणि वृषाली हे युगुल म्हणजे अगदी समसमासंयोग होता. दोघेही अतिशय बुद्धिमान. प्रत्येक गोष्टींत त्यांची एकमेकाला अशी साथ असायची की शरीरे दोन पण मन एकच आहे असे पाहणाऱ्याला वाटावे.

परवा ह्याचेच प्रत्यंतर आले.

झाले काय, की कंपनीत वरिष्ठांच्या बैठकीत निखिलला त्याने बनवलेल्या एका उपकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे होते. तो एक निखिलने लावलेला शोधच होता म्हणा ना. कंपनीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील. ते उपकरण घरी आणून निखिल जवळ जवळ रात्रभर त्याची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करत होता. सर्वप्रकारे ते यशस्वी व्हायलाच पाहिजे, ह्याचा ताण त्याच्या मनावर आला होता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीत पोहोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले, सकाळी गडबडीत उपकरणाचा एक महत्त्वाचा भागच बरोबर घ्यायचा राहून गेला होता.

बापरे! आता काय करायचे? संध्याकाळच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी आता काय दाखवणार? आणि दिवसभर तर मिटिंगांमागून मिटिंगा. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ... काय करावे बरे? असा विचार त्याच्या मनात येत आहे तेवढ्यात फोन घणघणला. फोनवर वृषाली होती.

"अगं मी आताच फोन करणार होतो."

"काही आवश्यकता नाही. माझ्या केव्हाच लक्षात आलीय तुझी अडचण!" - वृषाली म्हणाली, "आज तुला दिवसभर मिटिंगा त्यामुळे तुला हालता येणार नाही आणि मला दिवसभर कॉंफरन्स कॉल्स, त्यामुळे मलाही फार तर दहा मिनिटे बाहेर जाता येईल. पण काऽऽऽही काळजी करू नकोस. एक मस्त युक्ती सुचली ती केलीय. तुमच्या कंपनीच्या बसच्या फेऱ्या असतात ना वीस वीस मिनिटांनी? त्यांच्या बरोबर पाठवला आहे मी उपकरणाचा भाग!"

"अगं काय वेडीबिडी आहेस की काय? असा कुणाबरोबरही कसा पाठवलास?"

"अरे एका पेटीत कुलूपबंद करून पाठवलाय!"

"अग पण किल्ली?" निखिल भीतीने म्हणाला.

"अरे वारेवा शास्त्रज्ञ! अरे, किल्ली कशी पाठवीन त्यांच्याबरोबर ? तू शांत हो बघू. हे बघ, मला एक सांग, तुझ्य ऑफीसच्या बसच्या उलटसुलट फेऱ्या आज नेहमीप्रमाणेच चालू राहतील ना?"

"हो." -निखिल म्हणाला.

"मग आपण ...  .... .... अशी अशी युक्ती करायची. असे केले, म्हणजे कुलुपबंद पेटीतून वस्तू पाठवता येईल पण कुलुपाची किल्ली पाठवायला नको! म्हणजे मी पाठवलेली वस्तू फक्त तुलाच मिळेल."

आपल्या प्रियपत्नीने केलेली / सांगितलेली युक्ती पाहून तर निखिल आनंदाने वेडाच झाला. अर्थात "शेवटी बायको कुणाची! " असे म्हणून अर्थात त्याने स्वतःची पाठ थोपटून घेतलीच म्हणा! शेवटी सगळे सुफळ संपूर्ण झाले.

असो.

तर प्रश्न असा आहे की, निखिल/वृषालीने अशी काय युक्ती केली की किल्ली न पाठवता (आणि हो, कुलुपे न फोडता!) संध्याकाळच्या प्रात्यक्षिकाच्या वेळेच्या आत निखिलला उपकरणाचा भाग अतिशय दक्षतापूर्वक मिळाला असेल?

बघा बरे तुम्हाला काही उलगडा होतोय का?