अधीर प्रेमाचे सुनीत

      होते स्वप्न मनांत वर्ष इतकी, तस्सा मिळे 'सोबती'.
शाळेपासुन मी किती कटवले 'वासू' - अगाऊच ते!
'चिठ्ठ्या, ओळख, पाठलाग, सलगी....' शी! सारखे तेच ते!
      कित्ती हा परि भीत भीत मरतो, वेडे करी हो अती!

      होता ओळख, 'शेकहँड' करण्या भ्याला किती! बापरे!
झाले वर्ष. अजून मीच करते आरंभ बोलायला.
चाले लांबुन, हात बांधुन, कधी दृष्टी न दे दृष्टिला,
      अन् घ्याया मम नांव बीव -- सतरा वेळा घसा खाकरे!

      आजूबाजुस नाहि कोणि बघुनी देण्यास प्रोत्साहन,
काही 'सूचक' बोलता हळुच मी, मेलाच तो लाजुनी!
"कारे तंगवसी, विचार नं मला, दुष्टा!" - म्हणे मी मनीं
      त्या शब्दाकरिता 'अधीर' अगदी झालेय मी आतुन!!

      अय्या खर्रच तो विचारिल तशी येईल मज्जा किती!
"नाही" ताडदिशी म्हणून झणि ज्या, होईन मी चालती!!

पुणे १९८४