पश्चात्तप्त प्रेमाचे सुनीत

     'त्या'ची वाचुन पेपरात परवा फोटोसवे बातमी
दुःखाची कळ अंतरात उठली अन् आठवे तो दिन--
"नाही" त्यास म्हणून मी परतले तेंव्हा विनाकारण
     वाटे, कायमची मुकून बसले का त्यास तोर्‍यात मी ?

     लाभे मागुनही कुणा न जगि, ते मी भाग्य नाकारले
आता जागुन रात्र रात्र सुचते काही न त्याच्याविण
जेंव्हा गात्र नि गात्र तप्त बनते वाचून हे कात्रण,
     तेंव्हा काय गमावलेय कळते एका नकारामुळे!


     'फोटो' पाहत राहण्याविण दुजा रस्ताच आता नसे?
"'पश्चात्ताप' म्हणे चुकीस पुरती शिक्षा असे ना खरी?
जाते मी मग, शोक व्यक्त करते जाऊन त्याच्या घरी!
     घासू नाक? रडू? कपाळ बडवू? "सॉरी" म्हणू क्षीणसे?



     की त्याचा पकडून हात, हलके हासून मी गोजिरे,
त्याला 'लॉटरि' लागल्यावरून मी 'काँग्रॅट्स' देऊ बरे?


बोस्टन २००१