गोप-नीय प्रेमाचे सुनीत

      आहे 'स्त्री-सहवास' फार लिहिला माझ्या कपाळावर.
जेथे टाकिन पाय मी, मज तिथे वेढा मुलींचा असे!
टाळ्या मागत, देत कोपरखळ्या वा गालगुच्चे तसे
      वाटे, 'एकच भाव हा; पण किती शैलीमधे अंतर!'

      भेटे चोरुन एक आणि दुसरी ओढून नेई घरी,
बोले पाच फुटांवरुन तिसरी, चौथी बसे खेटुनी,
गप्पा मारि कुणी निरर्थक, करी गंभीर चर्चा कुणी,
      कोणी सोज्वळ, वा 'तयार' कुणि, ही आगाउ, ती लाजरी!


       गट्टी मात्र करायला मजसवे प्रत्येक ती आतुर!
ऐश्या प्रेमळ घोळक्यास बघुनी जो ही करी चौकशी,
"साल्या, तू तर गोकुळात असशी! लाडू कधी वाटशी?"
       प्रेमाचा दिसतो न त्यास वरुनी, हा 'गोपनीय' स्तर --



कोणा मी किति 'गोकुळात' दिसलो, ही बोच आहे मनी,
      जी ती 'गोपि'च भेटते, न दिसते कोठे कुणी 'रुक्मिणी' !!