गृहीत प्रेमाचे सुनीत

     'झाले लग्न तिचे' असे समजता फाटे टरारा उर!
वर्षे बाविस, लोक पाहत अम्हा तिन्ही त्रिकाळी सवे!
कॉलेजात, स्टडीत, कँटिनमधे, रस्त्यामधेही सवे!
     ह्या वर्षी तर सारखा मम घरी होता तिचा वावर.


     जोडी पाहुन आमची जळति जे, ते बोलती हे मनी,
"केंव्हाही असतेच एकमत हां, ह्यांचे बघावे तिथे!"
'ती' माझी नि तिचाच 'मी' - 'गृहित' हे होते मुळी हो जिथे,
     एका आठवड्यात 'कोण कुठचा' जातो तिला घेउनी??


     "केंव्हा रे तुमचे?" म्हणे कुणि कि ती लाजे बिजे छानसे.
'झाले लग्नहि आमचे' - कितिकदा ऐशी उठे आवई.
आईबाप तिचे मला चिडवती हो, 'जावई जावई'!
     त्यांना जाब विचारता चिडुन मी, ते बोलले हे असे --



     "काही गोष्टि अश्या 'गृहीत' धरुनी ती ही असे चालली.
तू रे मागणि घातलीसच कुठे, 'त्या'ने जशी घातली?"


मुंबई १९८४