डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांनी लिहिलेल्या "छंदोरचना" ह्या अत्यंत मौलिक ग्रंथातील खालील वेचक छंदविचार केवळ वाचकांनाच नव्हे तर कवींनाही उपयोगी ठरू शकतील. सर्वांनी लाभ घ्यावा.
मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते.
छंद अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. अर्थात, या पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिकपद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे. कोणत्याही नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणे छंद वा वृत्त म्हणतात, जसे पृथ्वी छंद, वैतालीय छंद, गीतिवृत्त इत्यादि. परंतु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यात आला आहे तसा छंद या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा.
जाती जातिरचनेत लगत्वभेद आहे. समरचनेतही अक्षरांची संख्या नि लगक्रम ही अभिन्न नसतात. तथापि लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची संख्या सारखी भरते. मात्रांची संख्या हे एकच काही या पद्यप्रकाराचे लक्षण नाही. या मात्रासंख्याकजातीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक वा पंचमात्रक आवर्तने असतात. या मात्रासंख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राछंद म्हणतात; परंतु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासंख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेले जाती हे नाव निश्चित करावे हे योग्य होय.
वृत्त छंद आणि जाती यांव्यतिरिक्त हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. वृत्तात अक्षरांच्या संख्येचे बंधन असते इतकेच नव्हे त्यांचा लगक्रमही निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त म्हणावे.
यतिविचार पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. हा यती ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या "जिह्वेष्टविश्रामस्थानाला"ही यती म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती, निदान पदसमाप्ती तरी व्हावी. तसे न झाल्यास जो कर्णकटू दोष होतो त्याला यतिभंग म्हणतात.
यती मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असे दिसते.पिङ्गल आणि जयदेव हे यती मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे, तर यती हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निश्चित मानीत नसते एवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण 'यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषत:'असे परंपराप्राप्त वचन आहे.चरणान्ती यती हा निरपवादपणे असलाच पाहिजे. कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्या अनुरोधाने पडतात.
किती सुंदर अमुच्या बंग- ल्याप्रती!
मोगरी, चमेली, कुंद
लाविली चहुकडे सुंद राकृती
गुंजतात गुंगं भृंग
तो तयांचा गुंग वी मती
यासारखी हास्योत्पादक पद्ये सोडली तर चरणान्ती शब्दसमाप्ती न होण्याचा प्रश्नच संभवत नाही. परंतु
वती मी, वरावे मला चांगलीला
हे हास्योत्पादक नाही, हास्यास्पद आहे.
अक्षरविचार अक्षर म्हणजे एकावेळी तोंडातून बाहेर पडणारा ध्वनी होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह एक लागो वा अनेक लागोत. अक्षराचे अधिष्ठान स्वरावर असते, मग त्यात आरंभी वा अंती व्यंजनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखनाकडे पाहून आपण यांत रा ज न् अशी तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो, पण हे चूक आहे. वस्तुतः रा ज न् दोन अक्षरे आहेत.शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरे होणार. रा हे अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे. तर जन् हे अक्षर व्यंजनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत्त म्हणतात आणि व्यजनान्त अक्षराला संवृत्त म्हणतात.
स्वराच्या ऱ्हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेच विवृत अक्षर उच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर उच्चारायला लागणारा काळ ऱ्हस्व स्वर उच्चारायला लागणाऱ्या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल संकेत आहे. ऱ्हस्व स्वर उच्चारायला एक मात्रेचा वेळ लागतो असे म्हटले तर दीर्घ स्वराच्या दोन मात्र होतात. ऱ्हस्वस्वरान्त अक्षराला लघू आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरू म्हणतात. आधुनिक मराठीत अ, इ, उ हे तीन स्वर ऱ्हस्व आणि आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे. लघुगुरूसाठी अनुक्रमे ( ̮ ) आणि ( ̱ ) चिन्हे आहेत.
गणविचार गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठराविक कालांत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे सदैव एकाच अक्षरसंख्येचे आणि लगक्रमाचे कसे असतील ? "अच्युतं केशवं रामनारायणम् या चरणांत ( ̱ ̮ ̱ ) असे त्र्यक्षरी गण चार पडतात, तर "धुनोतु नो मनोमलं कलिन्दनंदिनी सदा" या चरणांत ( ̮ ̱ ̮ ̱ ) असे चतुरक्षरी गण चार पडतात.
पिङ्गलोक्त त्रिक वृत्ताचे लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची संख्या आणि लगक्रम ही सांगण्याच्या ज्या अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत त्यापैकी पिङ्गलाच्या पद्धतीत त्यक्षरी, त्रिकांची योजना आहे. ही पद्धती अधिक रूढ झाल्यामुळे गण हे त्र्यक्षरीच असले पाहिजेत हा समज रूढ झाला आहे.
'यमाताराजभनसलगम्' या सूत्राने पिङ्गलाने सांगितलेल्या गणांची नावे आणि स्वरूपे बांधून टाकली आहेत. कोणतीही तीन अक्षरे क्रमाने घेतली असता त्या त्या त्र्यक्षरी शब्दाचे जे लगत्वरूप होते ते त्यातील आद्याक्षराने निर्दिष्ट होणाऱ्या गणांचे स्वरूप होय.
यमाचा ( ̮ ̱ ̱ )
मानावा ( ̱ ̱ ̱ )
ताराप ( ̱ ̱ ̮ )
राधिका ( ̱ ̮ ̱ )
जनास ( ̮ ̱ ̮ )
भास्कर ( ̱ ̮ ̮ )
नमन ( ̮ ̮ ̮ )
समरा ( ̮ ̮ ̱ )
ही य, म, त, र, ज, भ, न आणि स या गणांची रूपे आहेत.ल हे अक्षर लघुदर्शक ( ̮ ) असून ग ( ̱ ) हे अक्षर गुरूदर्शक आहे.