जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यान कुठेतरी..

पोएट्री.कॉम वर प्रसिद्ध झालेल्या पॅट्रिशिया एम. स्ट्रायनर यांच्या कवितेचे भाषांतर...

ती एकटीच बसून असते,
तिच्या आवडत्या खुर्चीवर गुरफटून,
विटलेल्या आठवणी आणि
तिला तिच्या जिवंतपणाची जाणीव करून देणारे
एक स्वप्नस्फुल्लिंग
यांच्या दरम्यान कुठेतरी.

कदाचित कुणी शेजारी भेटायला येईल,
धुणीभांडी आणि केरवारे यांच्या दरम्यान कुठेतरी,
एका एकाकी दिवसाचा कचरा झाडून टाकण्यासाठी
अंधार येण्याआधी.

मुले फोन लावतील त्यांच्या चकाचक घरांतून,
व्यवस्थित कापलेली हिरवळ आणि
क्लोरीन - निर्जंतुक केलेल्या स्विमिंगपूलच्या दरम्यान कुठून तरी
हॅलो आणि बाय यांतच भराभर संपणारी पाच मिनीटे,
चिखलाने भरलेल्या पाऊलखुणा आणि विखुरलेली खेळणी 
यांसाठीची तिची ओढ आणखी वाढवत.

ती वाढून घेते - भाकरी आणि पातळ पिठलं -
एका पोचे पडलेल्या ताटात
सहा खुर्च्यांच्या टेबलवर.
ती आज तिच्या दिवंगत पतीच्या जागेवर बसेल
तिचा सर्वात मोठा मुलगा आणि
सर्वात लहान मुलगी यांच्या दरम्यान कुठेतरी
तिच्या आयुष्याचे उर्वरित तुकडे
चघळण्याचा प्रयत्न करत.

१ - स्वैर भाषांतर.