वारकरी

वार्‍या तुझ्या घराच्या, हे नित्यकाम झाले
माझ्या प्रदक्षिणांनी ते तीर्थधाम झाले


नजरानजर घडावी, एकांतभेट व्हावी
तृष्णेत मीलनाच्या, जगणे हराम झाले


देवे कशास तुजला हे रूप-रंग दिधले
पाहून संत-साधूही बेलगाम झाले


तुज रूपगर्विता वा मी अप्सरा म्हणावे
सार्‍या विशेषणांना तव एक नाम झाले


का पाहुनी सभोती, हसतेस प्रेमभारे
वैरी तुझे अशाने सारे गुलाम झाले


भेटीत मुग्ध तू अन् मज शब्दही फुटेना
घटका भरून गेली, नुसते प्रणाम झाले