पुस्तक परीक्षणांत सुसूत्रता

पुस्तक परीक्षण / आस्वाद / समीक्षा याबाबतीत काही सुसूत्रता असावी अशी सूचना करावीशी वाटते. परीक्षण कुणी लिहावे यावर अर्थातच बंधन नाही. पण एखादे परीक्षण लिहिल्यावर ते पुस्तक वाचलेल्या मनोगतींनी त्या परीक्षणावर आपले मत (मान्य / थोडेसे मान्य / अमान्य) असे व्यक्त करावे, आणि काही एक विशिष्ट संख्येने मनोगतींनी असे केल्यावर त्या मतांचा एक छोटा अहवाल (तिन्ही प्रकारांत किती किती लोकांनी आपले मत घातले आहे) त्या परीक्षणासोबत ठेवावा. तसेच त्या परीक्षणावर परीक्षण कुणी लिहिल्यास तेही त्यासोबत जोडावे. याने त्या परीक्षणाला जास्त वस्तुनिष्ठता येईल असे वाटते.

हे सुचवण्यामागे दोन उद्देश आहेत.

एक म्हणजे परीक्षण लिहिणारी व्यक्ती ही जरी 'निरपेक्ष' भूमिकेतून ते परीक्षण करण्याचा आव आणत असली तरी ते परीक्षण बऱ्यापैका  'सापेक्ष' भूमिकेतूनच होते असे वाटते. ('राब' या कादंबरीने मी भारून गेलो होतो आणि आहे; त्यामुळे त्यावर लिहिताना कितपत वस्तुनिष्ठ रहायला जमले आहे याबद्दल मलाच प्रामाणिक शंका आहे) त्यावर "२ मान्य, ३ थोडेसे मान्य, ५ अमान्य" असा किंवा तत्सम शिक्का बसल्यास ते अधिक निरपेक्ष होण्याच्या दिशेने जाऊ शकेल.

दुसरे, कुठल्याही पुस्तकावर एकच परीक्षण लिहायला हवे असा अलिखित दंडक बऱ्याच वेळेला अजाणता पडलेला दिसतो. तो जर मोडता आला, दुसऱ्या कुणी अजून चार जागा टिपल्या, वा ते परीक्षण किती उथळ आहे हे वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवले तर वाचनानंद अधिक डोळस होऊ शकेल असे वाटते.

अर्थात यात प्रतिक्रियेसाठी 'मान्य', 'थोडेसे मान्य' आणि 'अमान्य' या तीनच श्रेणी असाव्यात असे अजिबात नाही. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून हे सुचवले. फक्त ते 'मान्य/अमान्य' असे तुकडापाड नसावे असे मात्र नक्की वाटते.

एकंदरीत पुस्तक-परीक्षण जितके निरपेक्ष करता येईल तेवढे करावे, म्हणजे 'बसवलेल्या' गणपतींचा धोका मनोगतवरून तरी टळेल अशी सदिच्छा आहे.

सर्वांचे अभिप्राय अर्थातच या सूचनेला अधिक अर्थपूर्ण करतील.