सोहळा

दोन क्षणांचं अंतर
जाणिवांना समांतर
जीव लागता लागेना
आणि थांबेना नंतर

वाटा फुटतात जेंव्हा
होते एक वाट माझी
सोडलेल्या वाटेसाठी
तगमग का जिवाची?

झोपलेल्या पाण्यावर
बिंब नितळ पालथे
तरी अस्वस्थ कायसे
त्याच्या आतून हालते

भय स्वतःचेच आता
प्रश्न एकेक सलतो
डोळ्या देववेना डोळा
जीव धुरात जळतो

नीरवातला ओंकार
शांत स्तब्ध सूर निळा
थंड बर्फाळला वारा
सुरू होताना सोहळा

काही कुरळ्या लहरी
शुभ्र पक्षी मुके मुके
शुभ्र वसन हिमाचे
मग सारे धुके धुके...

--अदिती
(११.१०२००७,
भाद्रपद अमावास्या शके १९२९)