ऍबी ग्रेंजचे 'प्रकरण' ! (२)

होम्सच्या मुद्रेवरून कुतूहलाचे भाव नाहीसे झाले होते. रहस्याचा भेद झाल्यामुळे या केसमधला सगळा रस त्याच्या दृष्टीने संपला होता. अजून गुन्हेगारांना अटक व्हायची होती पण असल्या भुरट्यांच्या मागे होम्सने धावाधाव करावी एवढी त्यांची लायकी तरी होती का? एखाद्या प्रथितयश आणि विशेषज्ञ डॉक्टरला समजा कांजिण्यांवर उपचार करण्यासाठी बोलावलं तर त्याच्या चेहऱ्यावर जे भाव दिसतील तेच भाव मला होम्सच्या चेहऱ्यावर दिसत होते. आणि तरीही, ऍबी ग्रेंजमधल्या त्या जेवणघरात पसरलेल्या गूढ शांततेने अखेरीस माझ्या मित्राचे लक्ष वेधून घेतलेच. जेवणघर खूप मोठं आणि उंच होतं. त्याचं छत आणि भिंती ओक लाकडाच्या होत्या आणि त्यांच्यावर ओळीने हरणांची शिंगं आणि जुन्या काळातली शस्त्रं लावलेली होती. दारापासून दूरच्या टोकाला बाईसाहेबांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती मोठी फ्रेंच पद्धतीची खिडकी होती. त्या खिडकीच्या उजव्या हाताला असलेल्या तीन लहान खिडक्यांमधून थंडीतला कोवळा सूर्यप्रकाश आत येत होता. तिच्या डाव्या हाताला एक मोठी शेकोटी पेटवायची जागा - फायरप्लेस होती. तिच्या वरच्या भागात एक सुरेख ओक लाकडाचं आवरण - मँटलपीस  पार छतापर्यंत जाऊन भिडलेलं होतं. तिच्या शेजारीच एक भरीव ओक लाकडाची हातांची खुर्ची होती. तिच्या तळाशी इंग्रजी एक्स अक्षराप्रमाणे पट्ट्या ठोकलेल्या होत्या. त्या खुर्चीभोवती एक काळपट लाल रंगाची दोरी गुंडाळलेली होती आणि सर्व बाजूंनी त्या एक्स सारख्या पट्ट्यांना ती बांधून टाकलेली होती. बाईसाहेबांची सुटका करताना ती दोरी खुर्चीच्या काठांवरून सरकवलेली दिसत होती पण तिला बांधलेल्या गाठी अजूनही तशाच होत्या. पण हे सगळं आमच्या लक्षात यायच्या आधी शेकोटीसमोर अंथरलेल्या व्याघ्रजिनाने आमचं लक्ष वेधून घेतलं. त्या व्याघ्रजिनावर एका उंच आणि बळकट शरीरयष्टीच्या माणसाचा मृतदेह पडलेला होता. तो साधारण चाळिशीच्या आसपास असावा. तो पाठीवर पडलेला होता. त्याच्या लहानशा दाढीतून त्याचे पांढरेशुभ्र दात चकाकत होते. त्याने हातात एक मोठी ब्लॅकथॉर्न लाकडाची काठी धरलेली होती आणि त्याचे हात त्याच्या डोक्यावर उगारलेल्या अवस्थेत होते.  त्याचा चेहरा देखणा होता पण कशाबद्दल तरी वाटणाऱ्या विलक्षण द्वेषभावनेतून तो चेहरा आक्रसलेला होता आणि त्यामुळे त्याला एखाद्या सैतानाची कळा आली होती.  हा गोंधळ कानावर आला तेव्हा तो आपल्या खोलीत झोपलेला असणार कारण त्याने एक नक्षीदार नाइट शर्ट घातला होता आणि त्याची अनवाणी पावलं त्याच्या पँटमधून बाहेर डोकावत होती. त्याच्या डोक्याला प्रचंड प्रमाणात इजा झाली होती आणि त्या प्रहाराच्या खुणा सगळ्या खोलीभर पसरलेल्या होत्या. त्याच्या शेजारी तो पोकर - शेकोटीमध्ये निखारे सारण्याचा दांडू पडलेला होता. त्या प्रहाराचा परिणाम  होऊन तो वाकला होता. होम्सने त्या पोकरची आणि त्या माणसाची तपासणी करायला सुरुवात केली. "हा रँडलबुवा बराच शक्तिमान दिसतोय" इति होम्स.
"हो. उपलब्ध माहितीप्रमाणे तो अगदी रानटी आहे."
"त्याला पकडायला तुम्हाला काहीच त्रास पडणार नाही"
"अजिबात नाही. आम्ही त्याच्या मागावर आहोतच. मध्यंतरी अशी आवई उठली होती की ते लोक अमेरिकेला पळून गेलेत. पण आता ते पुन्हा इकडे आलेयत हे आम्हाला कळल्यावर ते कसे निसटून जातील ते मी बघतोच. आम्ही सगळ्या बंदरांवर इशारे दिले आहेत आणि संध्याकाळपर्यंत त्यांना पकडून देणाऱ्याला बक्षीस पण जाहीर होईल. अर्थात, बाईसाहेब त्यांचं अचूक वर्णन करतील आणि त्यावरून त्यांची ओळख पटणं अगदीच सोपं आहे हे त्यांना माहीत असूनही ते असं का वागले हे मात्र आपल्या लक्षात येत नाही बुवा."
"अगदी बरोबर. त्यांनी बाईसाहेबांचंही तोंड बंद करायला हवं होतं."
"बाई शुद्धीवर आल्या आहेत हे त्यांच्या लक्षात बहुधा आलं नसावं." मी म्हणालो.
"शक्य आहे. त्या निश्चेष्ट होत्या म्हणूनच त्यांचा जीव वाचला असावा. पण हॉपकिन्स, सरसाहेबांचं काय? त्यांच्याबद्दल बऱ्याच विचित्र गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. "
"शुद्धीत असताना ते खूपच सज्जन माणसासारखे वागत असत. पण दारूच्या अंमलाखाली किंवा अर्ध्या अंमलाखाली म्हणा हवं तर कारण ते पूर्ण झिंगण्याइतकी पीत नसत, तर दारूच्या अंमलाखाली ते खरोखरीच एखाद्या सैतानासारखे वागायचे. त्या अवस्थेत ते नक्की काय करतील याची मुळीच शाश्वती नसे. माझ्या कानावर तर असंही आलंय की त्यांची संपत्ती आणि त्यांचा हुद्दा या दोन गोष्टीदेखील त्यांना पोलिस कोठडीपासून वाचवू शकल्या नव्हत्या. बाईसाहेबांच्या कुत्र्यावर पेट्रोल ओतून त्यांनी त्याला पेटवून दिलं होतं. ते प्रकरण दाबून ठेवायला त्यांना बरेच कष्ट पडले. शिवाय त्यांनी थेरेसाच्या अंगावर डिकँटर - दारू गाळायचं भांडं फेकून मारलं होतं. तेही प्रकरण बरंच जड गेलं त्यांना. तुमच्या आमच्यात म्हणून सांगतो पण त्यांच्यानंतर इथे राहणं जास्त सुसह्य ठरणार आहे. काय झालं मि. होम्स?"
होम्स अतिशय एकाग्रतेने त्या खुर्चीला बांधलेल्या गाठींचं निरीक्षण करत होता. त्या दरवडेखोरांनी दोरी  जोर लावून ओढल्यामुळे तुटलेल्या भागाचीही होम्सने काळजीपूर्वक तपासणी केली.
"ही खाली ओढताना घंटा अगदी जोरात वाजली असणार." होम्स म्हणाला.
"भटारखाना इथे मागेच आहे. पण कोणालाच ही घंटा ऐकू गेली नाही."
"पण हे चोरांना कसं कळलं की ती कोणालाच ऐकू जाणार नाही? इतक्या जोरात तो दोर ओढण्याइतके ते बेडर होते का?"
"तेच तर ना. मलाही अगदी हाच प्रश्न पडलाय. त्यांना या घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दल खडा न् खडा माहिती असणार. अगदी खात्रीने. मध्यरात्रीच्या तोंडाला नोकरमंडळी झोपेत असणार आणि घंटेचा आवाज कोणालाच ऐकू जाणार नाही हे त्यांना पक्कं ठाऊक असणार. याचा अर्थ त्यांनी एखाद्या नोकराशी संधान बांधलं असणार. पण घरात आठ नोकर आहेत आणि ते सगळेच विश्वासातले आहेत."
"असं असेल तर घरमालकाने जिच्या डोक्यात डिकँटर घातला तिचा संशय घ्यायला जागा आहे. पण तसं असेल तर तिने आपल्या मालकिणीला दगा दिला असं म्हटल्यासारखं ठरेल ना. पण ही तशी क्षुल्लक बाब आहे. शिवाय रँडलला पकडल्यावर खरंखोटं काय ते कळेलच तुम्हाला. बाईसाहेबांची गोष्ट मात्र सगळ्या तपशिलांनी अगदी परिपूर्ण आहे. " बोलता बोलता त्याने पुढे होऊन ती फ्रेंच खिडकी उघडली आणि बाहेर नजर टाकली.
"बाहेर काही ठसे वगैरे दिसत नाहीयेत पण इथली जमीन इतकी घट्ट आहे की तशी काही आशा करण्यातही अर्थ नाही. या मेणबत्त्या मात्र कोणीतरी पेटवलेल्या दिसतायत."
"हो. चोरांनी पळून जाताना प्रकाश हवा म्हणून बाईसाहेबांच्या झोपण्याच्या खोलीतली मेणबत्तीच वापरली."
"अच्छा! आणि चोरीला काय काय गेलं?"
"फारसं काही नाही. चांदीची अर्धा डझन ताटं गेली फक्त. बाईसाहेबांना असं वाटतंय की सर युस्टास यांच्या मृत्यूचा धक्का त्या चोरांनाही बसला. म्हणूनच त्यांनी फार काही नेलं नाही."
"बरोबर आहे त्यांचं म्हणणं. पण तशाही परिस्थितीत त्यांनी वाइन मात्र प्यायली."
"हो. त्यांचं डोकं ताळ्यावर यावं म्हणून..."
"अगदी बरोबर. इथे टेबलाच्या कडेला ठेवलेल्या या तीन ग्लासांना कोणी हात तर नाही ना लावलेला?"
"नाही. शिवाय ती वाइनची बाटली पण आहे बघा."
"हम्म. बघू तरी. अरेच्या! हे असं कसं झालं?"
 ते तीनही ग्लास एकमेकांशेजारी ठेवलेले होते. त्यांच्यावर वाइनचे ओघळ आलेले होते आणि त्यातल्या एका ग्लासात वाइनचा साका होता. शेजारीच एक वाइनची बाटली होती. साधारण पाऊण भरलेली. तिच्या शेजारी तिचं बूच होतं. बुचाला खोलवर वाइनचे डाग पडले होते. ते बूच आणि ती धुळीने माखलेली बाटली बघून असं जाणवत होतं की ती वाइन बरीच उंची आणि खास दर्जाची असणार.
होम्सच्या चेहऱ्यावरचे कंटाळलेले भाव क्षणात नाहीसे झाले होते. त्याच्या खोल आणि विलक्षण बोलक्या डोळ्यांमध्ये एक जबर कुतूहल दाटलेलं होतं. त्याने ते बूच आपल्या हातात घेतलं आणि त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली.
"त्यांनी हे बूच कसं काढलं?" होम्सने विचारलं.
हॉपकिन्सने शेजारच्या एका अर्धवट उघडलेल्या ड्रॉव्हरकडे बोट दाखवलं. तिथे काही नॅपकिन्स आणि एक कॉर्कस्क्रू होता.
"त्यांनी हा स्क्रू वापरला असं लेडी ब्रॅकेन्स्टॉल म्हणाल्या का?"
"नाही. त्या तर बेशुद्धावस्थेत होत्या ना..."
"खरं आहे. प्रत्यक्षात ही बाटली या स्क्रू ने उघडलेली नाही. ती उघडण्यासाठी एका पॉकेट स्क्रू चा वापर केला गेलेला आहे. बहुधा एखाद्या पेन नाईफ मध्ये असतो तसा. त्याची लांबी दीड इंचापेक्षा जास्त नसणार. जर तुम्ही या बुचाचं नीट निरीक्षण केलंत तर तुमच्या असं लक्षात येईल की हे बूच बाहेर निघण्यापूर्वी तीन वेळा यात स्क्रू खुपसला गेला पण तो एकदाही घट्ट बसला नाही. जर हा स्क्रू वापरला असता तर तो एका वारातच घट्ट बसला असता. या चोराकडे अनेक आकारांच्या सुऱ्यांचा एक संच असणार. "
"क्या बात है!!!" हॉपकिन्स म्हणाला.
"पण या ग्लासांबद्दल मात्र माझा गोंधळ झाला आहे. लेडी ब्रॅकेन्स्टॉल यांनी त्या चोरांना यातून वाइन पिताना पाहिलं असं त्या नक्की म्हणाल्या ना?"
"अगदी नक्की."
"मग प्रश्नच मिटला. यावर आणखी काय बोलणार? पण हे तीन ग्लास मोठे विचित्र आहेत हे तुम्हीही मान्य कराल मि. हॉपकिन्स. जाऊ दे. माझ्या निरीक्षणशक्तीमुळे मला उगाचच साध्या साध्या गोष्टींमध्येही काहीतरी काळंबेरं वाटायला लागतं. कदाचित त्या ग्लासांबद्दल काही शंका यावी असं काही नसेलच. बराय मि हॉपकिन्स. मला वाटतं माझं इथलं काम संपलं आहे आणि तुमची केसही एखाद्या सुतासारखी सरळ आहे. तुम्ही रँडल्सना अटक केलीत की मला कळवायला विसरू नका. या केसबद्दल पुढे जे काही होईल ते जाणून घ्यायला मला आवडेल. हीही केस तुम्ही यशस्विरीत्या सोडवलीत याबद्दल तुमचं अभिनंदन करायची संधी आम्हाला लौकर द्या. भेटू मग. ग़ुड मॉर्निंग. चल वॉटसन, आपल्या घरी कामं पडलीयेत. "
आमच्या परतीच्या प्रवासात होम्सच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटत होतं की त्याने असं काहीतरी पाहिलंय ज्याचा अर्थ त्याला लागत नाहीये. थोड्या थोड्या वेळाने तो असं दाखवायचा प्रयत्न करत होता की सगळं प्रकरण अगदी आरशासारखं लख्ख आहे. मग त्याचा चेहरा निवळायचा. पण मधूनच त्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या, भुवया एकमेकींना चिकटायच्या आणि डोळे शून्यात बघायला लागायचे. त्याचे विचार पुन्हा पुन्हा ऍबी ग्रेंजमधल्या जेवणघराकडे आणि काल रात्री तिथे घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांकडे धावत होते हे ओळखायला मला मुळीच कष्ट पडले नाहीत. अचानक, एका स्टेशनावर गाडी थांबलेली असताना त्याने गाडीतून खाली उडीच मारली आणि बरोबर मलापण ओढून घेतलं.
"वॉटसन, माझ्या असल्या वागण्याबद्दल मला क्षमा कर पण ही केस मी तशीच सोडू शकत नाही. माझं मन आणि जाणीवेचा एकेक बिंदू मला ओरडून सांगतोय की काहीतरी चुकतंय. बाईसाहेबांची कहाणी अगदी परिपूर्ण आहे. मोलकरणीचं वर्णन झाल्या प्रकाराला पुष्टी देणारंच आहे. त्यात मला न पटणारं असं जर काही असेल तर ते म्हणजे ते तीन वाइनचे ग्लास. पण मी जर या जुळवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नसता, अधिक डोळसपणे तपासणी केली असती , माझा मूर्खपणा मला नडू दिला नसता आणि घाईने  हालचाल केली असती तर मला काहीतरी अजून ठोस नसतं का सापडलं? आता मला इथेच बसून चिझलहर्स्टकडे जाणाऱ्या पुढच्या गाडीची वाट पाहणं भाग आहे. चल आपण या बाकावर बसू या. चिझलहर्स्टला गेलो की मी सगळे पुरावे तुझ्यासमोर मांडीन. मग तुला पटेल की बाईसाहेबांची सगळी गोष्ट खोटी आहे. या केसचा विचार करताना आपण त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाला भुलून चालणार नाही."  एका वळणावरून अदृश्य होणाऱ्या गाडीच्या शेवटच्या डब्याकडे बघत होम्स मला म्हणाला.
"थंड डोक्याने विचार केला तर  पुरेसे संशयास्पद वाटणारे बरेच मुद्दे या केसमध्ये आहेत. दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा रँडल्सनी चिझलहर्स्टमधे दरोडा घातला तेव्हा मोठीच खळबळ उडाली असणार. त्यांच्याबद्दल बरंच काही पेपरमध्येही छापून आलं होतं. त्यामुळे चोरीचं खोटं वर्णन करायचं असेल तर त्यांचंच नाव डोळ्यासमोर येणं सहज शक्य आहे. अर्थात हे चोर - लुटारू जास्त गाजावाजा न करता आपलं काम उरकण्याच्या मागे असतात आणि विशेषतः एक कामगिरी संपल्यावर पुढच्या ठिकाणी हात मारण्यापूर्वी ते अजिबात आवाज न करता लपून राहणंच पसंत करतात. शिवाय चोरी करण्याच्या दृष्टीने ती वेळ बरीच लौकरची होती. त्यातून असं बघ, एखाद्या स्त्रीला मारहाण केली तर ती ओरडेल हे नैसर्गिकच आहे त्यामुळे तिला गप्प बसवण्यासाठी चोर मारहाण करतील, तिघं जण एका माणसाला सहज भारी पडत असतानाही ते त्याचा खून करतील आणि एवढं सगळं झाल्यावरही घरातल्या अनेक अमूल्य चीजवस्तू सोडून देऊन अगदी मामुली काहीतरी चोरून तिथून पोबारा करतील हे पटायला जरा जडच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वाइनची बाटली न संपवता तशीच ठेवून तिथून पोबारा का करतील? मला सांग हे सगळं तुला पटतंय का?"
"या सगळ्या गोष्टींकडे एकदम पाहिलं तर त्या विचित्र वाटतात पण एकेक गोष्ट बघितली तर ती शक्य वाटते. पण मला जाणवलेली सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्यांनी त्या बाईंना खुर्चीला का बांधून ठेवावं?"
"हम्म. मला नाही ती तितकी विचित्र वाटत. असं बघ , त्यांच्याकडे दोनच मार्ग होते. एकतर बाईंनाही मारून टाकणं नाहीतर बाईंनी चोरीच्या कामात अडथळा आणू नये किंवा कोणाचं लक्ष वेधून घेऊ नये अशा पद्धतीने त्यांना जखडून ठेवणं. पण एवढं सगळं असूनही बाईंच्या बोलण्यात काहीतरी त्रुटी आहे हे मी तुला मगाशीच दाखवून दिलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते तीन वाइन ग्लास."
"त्यांचं काय एवढं?"
"ते तीन ग्लास तू डोळ्यापुढे आणू शकतोस?"
"अगदी स्पष्टपणे."
"आपल्याला असं सांगितलं गेलं की तीन माणसांनी त्यातून वाइन प्यायली. पण हे  शक्य आहे असं तुला वाटतंय का?"
"का नाही? तीनही ग्लासांमध्ये वाइन होती."
"अगदी बरोबर. पण साका मात्र त्यातल्या एकाच ग्लासात होता हे तुझ्या लक्षात आलंच असेल. त्याचा काय अर्थ लागतोय तुला?"
"साका असलेला ग्लास सगळ्यात शेवटी भरला असणार."
"साफ चूक. त्या बाटलीमध्ये बराच साका होता आणि तरीही दोन ग्लासांमध्ये तो आला नाही पण नेमका एकाच ग्लासात तो मोठ्या प्रमाणावर होता. हे असं होण्यामागे फक्त दोनच कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे दोन ग्लास भरल्यानंतर कोणीतरी ती बाटली जोरजोराने हालवली आणि मग तो तिसरा ग्लास भरला. पण हे असं होणं अवघड आहे. माझी खात्री होत चालली आहे की माझा अंदाज खरा ठरणार आहे. "
"मग तुझ्या मते काय झालं असेल?"
"मला असं वाटतंय की वाइन प्यायला फक्त दोनच ग्लास वापरले गेले. आणि मग तिथे तीन माणसं होती असा भास निर्माण करण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या दोन ग्लासांमधले द्रव्य तिसऱ्या ग्लासात ओतले. जर हे खरं असेल तर सगळाच साका तिसऱ्या ग्लासात येईल. हो की नाही? मी म्हणतो हे सगळं असंच घडलं असणार. आणि जर हे असंच घडलं असेल तर ही केस साधीसुधी नाही वॉटसन. एका क्षणात सगळी परिस्थितीच बदलते. कारण याचा अर्थ अस होतो की लेडी ब्रॅकेन्स्टॉल आणि त्यांची मोलकरीण आपल्याशी धडधडीतपणे खोटं बोलल्या आहेत. खऱ्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याजोगं काहीतरी सबळ कारण त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच, त्यांच्या मदतीशिवाय ही केस आपण उभी करायला हवी. आता आपलं हेच काम आहे. आणि ही पाहा चिझलहर्स्टकडे जाणारी गाडी आलीसुद्धा."
"आम्हाला परत आलेलं पाहून ऍबी ग्रेंजच्या मंडळींना बरंच आश्चर्य वाटलेलं दिसलं. पण स्टॅनले हॉपकिन्स लंडनला रिपोर्ट करायला गेलाय हे कळताच होम्सने मात्र त्या जेवणघराचा ताबा घेतला. जेवणघराचं दार आतून लावून घेऊन सुमारे दोन तास तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्या खोलीची तपासणी करत होता. या तपासणीत त्याला खूप कष्ट पडत असत पण त्यातून निघालेल्या निष्कर्षांच्या पक्क्या पायावरच त्याचे सगळे तर्क बेतलेले असत. एखाद्या शिष्याने भक्तिभावाने आणि एकाग्रतेने आपल्या गुरुचं निरीक्षण करावं ना, तसा मी एका कोपऱ्यात बसून त्याच्या सर्व हालचाली पाहत होतो. खिडकी, खिडकीचे पडदे, जाजम, खुर्ची, घंटेचा दोर या सगळ्याची अगदी बारकाईने तपासणी करून त्याने  त्या गोष्टी जागेवर ठेवल्या. ते प्रेत तिथून हालवण्यात आलं होतं तेवढं सोडल्यास बाकी सगळ्याच गोष्टी सकाळी आम्ही जश्या बघितल्या होत्या अगदी तश्याच स्थितीत होत्या. शेवटी होम्स मँटलपीसवर चढलेला बघून मी आश्चर्याने थक्कच झालो. मँटलपीसच्याही वर, विजेच्या तारेला त्या लाल दोराचा काही भाग अजून लटकत होता. त्या दोराकडे एकटक पाहत होम्स बराच वेळ तसाच उभा होता. मग त्या दोराचं अजून जवळून निरीक्षण करावं म्हणून भिंतीतल्या एका लाकडी फळीवर एक गुडघा टेकवून तो उभा राहिला. आता त्याचा हात त्या तुटक्या दोराच्या खूप जवळ आला. पण त्या दोरापेक्षा त्या फळीनेच त्याचं लक्ष जास्त वेधून घेतलेलं दिसलं. शेवटी एक समाधानाचा सुस्कारा सोडून तो खाली उतरला.
"वॉटसन, एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी केस आपल्या हाताला लागली आहे. आपल्या आजवरच्या केसेसपेक्षा वेगळी.  पण या केसमध्ये मी जो काही मंदपणा केला आहे तो अक्षम्य आहे. ही बहुधा माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरावी. आता मला असं वाटतंय की काही हरवलेले दुवे वगळले तर सगळी साखळी आपल्या हातात आली आहे. "
" तुला खुनी माणसांचा तपास लागला?"
"खुनी माणसं नाही. खुनी माणूस. वॉटसन, अतिशय क्रूर असा खुनी माणूस. त्याच्या अंगात सिंहाचं बळ आहे. जरा बघ तो पोकर कसा वाकलाय ते. सहा फूट तीन इंच उंचीचा, एखाद्या खारीसारखा चपळ. त्याची बोटं अतिशय कौशल्याने चालतात. आणि डोकं तर विलक्षण वेगाने चालतं. हे सगळं कथानक त्याच्याच डोक्यातून निघालेलं आहे. यावेळी आपली गाठ एका लोकविलक्षण अशा माणसाशी पडलेली आहे. खरं म्हणजे त्या घंटेच्या दोरीवर त्याने सोडलेला माग पाहून तर आपल्या मनात शंकेला जागाच राहायला नको."
"माग? कुठे आहे माग?"
"वॉटसन, तुला जर ती घंटेची दोरी तोडायला सांगितली असती तर ती कुठे तुटली असती? जिथे ती तारेला जोडली आहे तिथे. हो ना? मग ही दोरी त्या वरच्या टोकापासून तीन इंचांवर का तुटावी?"
"कारण ती ओढली होती?"
"अगदी बरोबर. दोरीचं हे टोक जोराने ओढून तोडलंय. पण दुसरं टोक मात्र चाकूने तोडण्याइतका तो धूर्त आहे. तुला इथून दिसायचं नाही पण तू जर मॅंटलपीसवर चढून पाहिलंस तर तुला असं दिसेल की दोरीचं तिथलं टोक चाकूने सरळ कापलेलं आहे. ओढाओढीच्या कुठल्याच खुणा तिथे नाहीत. काय झालं असेल याची कल्पना करणं अगदी सोपं आहे. त्याला दोरी हवी होती. पण ती ओढली तर घंटेचा आवाज होईल या भितीने तो ती ओढू शकत नव्हता. मग त्याने काय केलं? तो मँटलपीसवर चढला. तरी त्याचा हात पुरेना तेव्हा त्याने फळीवर आपला गुडघा टेकवला. तिथे धुळीत त्याच्या गुडघ्याचा ठसा आहे. मग चाकूने ती दोरी कापून घेतली. दोरीचं तुटलेलं टोक माझा हात पुरत होता तिथपासून सुमारे तीन इंच उंचावर होतं त्यावरून मी असा हिशोब केला की तो माझ्यापेक्षा तीन इंच उंच असणार. त्या मोडलेल्या खुर्चीवरचा तो डाग जरा नीट पाहा बरं. कसला डाग आहे तो?"
"रक्त!!!"
"बरोबर बोललास. हा डाग रक्ताचाच आहे. काही शंकाच नाही. आणि या डागामुळे बाईसाहेबांची सगळी गोष्ट खोटी ठरते. ज्या अर्थी या खुर्चीवर रक्ताचा डाग आहे त्या अर्थी खून झाल्यानंतर त्यांना या खुर्चीवर बसवण्यात आलंय. त्यांच्या काळ्या गाऊनवरही असाच एक डाग असणार. आपली सुरुवात जरी पराभवाने झाली असली तरी शेवट विजयश्रीतच होणार आहे. आता मला त्या मोलकरणीला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण तिच्याकडून आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला खूपच काळजीपूर्वक पावलं टाकायला हवीत."
थेरेसा आतल्या गाठीची, संशयी स्वभावाची आणि खडूस होती. गोड बोलून आणि ती म्हणेल त्याला बिनशर्त मान्यता देऊन तिला बोलायला प्रवृत्त करायला होम्सला बराच वेळ लागला. आपल्या दिवंगत  मालकाबद्दल तिला वाटणारा तिरस्कार लपवायचा तिने जरासुद्धा प्रयत्न केला नाही.
"साहेब, मालकांनी मला डिकॅन्टर फेकून मारला ही गोष्ट खरी आहे. ते माझ्या मालकिणीला अर्वाच्य शिव्या देत होते. मी त्यांना बजावलं की बाईसाहेबांचा भाऊ जर इथे असता तर असलं काही बोलायची त्यांची हिंमतच झाली नसती. मी असं म्हटल्यावर त्यांनी मला  डिकँटर फेकून मारला. माझ्या मालकिणीला वाचवण्यासाठी असले डझ्झनभर डिकँटर्स मी हसत हसत खाल्ले असते. मालक माझ्या मालकिणीचा छळ करत होते आणि त्या इतक्या मानी आहेत की त्यांनी हूं का चूं नाही केलं कधी. मालकांनी केलेल्या छळाबद्दल त्यांनी मलासुद्धा काही सांगितलं नाही. त्यांच्या हातांवर तुम्ही जे जखमांचे व्रण पाहिलेत त्यांबद्दलही त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. पण त्या जखमा हॅट पिनने भोसकल्यामुळे झालेल्या आहेत हे मला माहीत आहे. तो नीच सैतान... गेलेल्या माणसाबद्दल असं बोलल्याबद्दल देवाने मला क्षमा करावी पण तो माणूस उलट्या काळजाचा शुद्ध सैतान होता. अठरा महिन्यांपूर्वी आमची त्याच्याशी ओळख झाली तेव्हा तो आमच्याशी इतकं गोड गोड बोलला. आम्हाला हे अठरा महिने अठरा वर्षांसारखे वाटतात. माझ्या मालकिणीने आयुष्यात पहिल्यांदाच घराबाहेर पाऊल टाकलं होतं. ती पहिल्यांदाच लंडनला आली होती. एखाद्या लंडनकराच्या दिखाऊ सभ्यतेने, आपल्या सरदारी पदवीने आणि गडगंज पैशाने त्याने माझ्या मालकिणीला आपल्या जाळ्यात ओढलं. आपल्या चुकांची कुठल्याही बाईला भोगावी लागू नयेत अशी फळं तिने भोगलेली आहेत. ते कधी बरं भेटले आम्हाला? हा आम्ही जूनमध्ये लंडनला आलो. त्यांची भेट जुलै मध्ये झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये त्यांचं लग्न झालं. त्या आता खाली आल्या आहेत आणि तुम्ही त्यांना भेटू शकता पण तुम्ही त्यांना खूप जास्त प्रश्न विचारू नका कारण त्यांनी असह्य अशा यातना भोगलेल्या आहेत."
लेडी ब्रॅकेन्स्टॉल सकाळच्याच कोचावर बसल्या होत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर सकाळपेक्षा जरा टवटवी होती. थेरेसा आमच्याबरोबरच आत आली. आणि तिने आपल्या मालकिणीच्या कपाळावर झालेल्या जखमेवर औषध लावायला सुरुवात केली.
"तुम्ही माझी पुन्हा उलटतपासणी घेण्यासाठी आला नसाल अशी मी आशा करते." बाईसाहेब आम्हाला म्हणाल्या.
"नाही" होम्स अतिशय हळुवार स्वरात त्यांना म्हणाला. " मी तुम्हाला विनाकारण कसलाही त्रास देणार नाही लेडी ब्रॅकेन्स्टॉल. माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला कमीत कमी त्रास व्हावा. मला माहीत आहे तुम्ही आजवर खूप काही सोसलंय. माझी अशी विनंती आहे की मला आपला मित्र समजून आपण माझ्यावर विश्वास ठेवलात तर आपल्या विश्वासाला तडा जाईल असं काही मी होऊ देणार नाही."
"मी काय करावं अशी आपली इच्छा आहे?"
"मला खरं काय ते सांगा."
"मि. होम्स!!!"
"लेडी ब्रॅकेन्स्टॉल, अशा दचकू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. आजवरच्या माझ्या लौकिकाला स्मरून मी पैजेवर तुम्हाला सांगू शकतो की तुमची सगळी कहाणी ही तद्दन खोटी आहे."
बाईसाहेब आणि मोलकरीण दोघींचे चेहरे पांढरे फटक पडले होते आणि त्यांच्या डोळ्यात भीती दाटली होती. आश्चर्याने त्या दोघीही होम्सकडे बघत होत्या. 
"तुम्ही अतिशय उद्दाम आहात. तुम्हाला असं म्हणायचंय का की बाईसाहेब खोटं बोलतायत?" थेरेसा जवळजवळ किंचाळलीच.
होम्स त्याच्या खुर्चीतून उठून उभा राहिला.
"तुम्ही मला काहीच सांगणार नाही आहात तर"
"मी यापूर्वीच तुम्हाला सगळं सांगितलं आहे"
"लेडी ब्रॅकेन्स्टॉल, पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला असं नाही का वाटत की स्पष्टपणा केव्हाही हितकारकच असतो?"
क्षणभरच त्यांच्या सुंदर चेहऱ्यावर संभ्रमाचे भाव उमटले. पण त्या लगेच सावरल्या. कसल्या तरी अज्ञात शक्तीने तो संभ्रम पुसून टाकला. आणि अतिशय ठामपणे त्या म्हणाल्या,"मला जे जे माहितेय ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय."
होम्सने आपली हॅट उचलली आणि आपले खांदे उडवत तो म्हणाला, "क्षमा असावी".
त्यानंतर एक शब्दही न बोलता आम्ही त्या घरातून बाहेर पडलो आणि बागेतल्या तळ्याकडे आपला मोर्चा वळवला. ते तळं गोठलं होतं पण तळ्यात राहणाऱ्या एका हंसासाठी त्याच्या मध्यभागात बर्फातच एक खड्डा केला होता. त्या खड्ड्याकडे होम्स काही क्षण एकटक बघत राहिला आणि मग काहीही न बोलता फाटकाकडे चालायला त्याने सुरुवात केली. फाटकापाशी पोहोचल्यावर त्याने घाईघाईने एका कागदावर काहीतरी खरडलं आणि तो कागद स्टॅनले हॉपकिन्सकडे देण्यासाठी म्हणून दारवानाजवळ दिला.

--अदिती
(क्रमशः)