ऍबी ग्रेंजचे 'प्रकरण' ! (३)

"हा मटका कदाचित बसेल कदाचित बसायचाही नाही. पण आपण दुसऱ्यांदा इथे का आलो होतो याचं हॉपकिन्सला पटेल असं कारण तर दिलं पाहिजे ना. अर्थात त्याला इतक्यातच आपल्या विश्वासात घेण्याचा माझा काहीही विचार नाही. मला वाटतं आता आपल्याला पॉलमॉलजवळ जायला हवं. माझ्या आठवणीप्रमाणे ऍडलेड - साउदम्प्टन मार्गावर फेऱ्या करणाऱ्या शिपिंग कंपनीचं ऑफिस तिथेच आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अशा फेऱ्या मारणारी अजून एक कंपनी आहे पण आधी आपण मोठ्या माशासाठी गळ टाकून पाहू."
होम्सचं कार्डं पाहून शिपिंग कंपनीचा मॅनेजर धावतच बाहेर आला. आणि त्याच्याकडून हवी असलेली माहिती मिळवायला होम्सला मुळीच वेळ लागला नाही. पंचाण्णव सालच्या जून महिन्यात त्यांची फक्त एक बोट मायदेशी आली होती. रॉक ऑफ जिब्राल्टर हे तिचं नाव. ही त्यांच्या ताफ्यातली सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट आगबोट होती. त्या बोटीवरच्या प्रवाशांची यादी पाहिल्यावर ऍडलेडच्या मिस फ्रेझर आणि त्यांची दासी या दोघी याच बोटीतून इंग्लंडला आल्याची नोंद सापडली. सध्या ती बोट ऑस्ट्रेलियाला परत निघालेली होती. आता साधारण सुवेझ कालव्याच्या आसपास कुठेतरी असावी. फर्स्ट ऑफिसर मि. जॅक क्रोकर याचा अपवाद वगळल्यास तिचा सगळा खलाशीवर्ग आजही तोच होता. जॅक क्रोकरला त्यांच्याच बेस रॉक या बोटीचा कॅप्टन म्हणून बढती देण्यात आलेली होती. बेस रॉक दोन दिवसांनंतर साउदम्प्टनहून सुटणार होती. जॅक सायडेनहॅममधे राहत असे पण तो त्याच दिवशी सकाळी काही कामासाठी ऑफिसमध्ये येणार होता अशीही माहिती मिळाली.
होम्सला जॅकला भेटायची काही विशेष इच्छा नव्हती असं दिसलं. पण त्याच्या रेकॉर्ड बद्दल आणि एकूणच स्वभावाबद्दल मात्र होम्सने चौकशी केली.
जॅकचं रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ट होतं. त्याच्या जवळपासही फिरकू शकेल असा दुसरा कोणीही ऑफिसर त्यांच्या पदरी नव्हता. त्याचा स्वभाव अतिशय उमदा होता. तो कामाला अगदी चोख आणि अगदी विश्वासार्ह होता. पण कामाव्यतिरिक्त इतर वेळी तो एक गरम डोक्याचा , चटकन संतापणारा, काहीसा अविचारी तरीही निष्ठावंत आणि सहृदय माणूस म्हणून प्रसिद्ध होता. ही सगळी माहिती घेऊन होम्स ऍडलेड -साउदम्प्टन कंपनीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. मग आम्ही स्कॉटलंड यार्डकडे जायला घोडागाडीत बसलो. पण आम्ही तिथे पोचल्यावरही कपाळाला आठ्या घालून आपल्याच विचारात गढलेल्या अवस्थेत तो तसाच बसून राहिला. शेवटी त्याने ती गाडी चेरिंगक्रॉसजवळच्या पोस्ट ऑफिसकडे वळवायला सांगितली. तिथून एक तार पाठवल्यावर अखेरीस आम्ही बेकर स्ट्रीटवर परत आलो.
आम्ही घरात येत असताना तो मला म्हणाला," वॉटसन, एकदा ते वॉरन्ट निघाल्यावर जगातली कुठलीही शक्ती त्याला वाचवू शकली नसती. माझ्याच्याने ते झालं नाही. माझ्या आयुष्यात आजवर एकदोनदा असे प्रसंग आले आहेत जेव्हा मला असं तीव्रतेने वाटलं होतं की गुन्हेगाराने गुन्हा करून केलं नसेल एवढं नुकसान मी गुन्हेगाराला शोधून काढल्यामुळे केलं आहे. पण आता मी शहाणा झालोय. माझ्या सदसद्विवेकबुद्धीपेक्षा इंग्लंडच्या कायद्यासमोर युक्तिवाद करणं परवडलं. आता प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी आपण जरा आणखी खोलात शिरू या."
संध्याकाळी स्टॅनले हॉपकिन्स आमच्याकडे येऊन गेला. त्याचं काही फार चांगलं चाललं होतं असं काही मला वाटलं नाही.
"मि. होम्स, तुम्ही खरोखरच जादूगार आहात. मला कधीकधी असं वाटतं की तुमच्याकडे एखादी जादूची छडी बिडी आहे. चोरीला गेलेली चीजवस्तू त्या तळ्याच्या तळाशी आहे हे तुम्हाला कसं काय माहीत?"
"मला नव्हतं माहीत."
"पण तुम्हीच मला त्या तळ्यात शोध घ्यायला सांगितलात ना?
"तुम्हाला त्या वस्तू सापडल्या का मग?"
"हो सापडल्या!"
"मी तुमच्या उपयोगी पडू शकलो याबद्दल मला खूप समाधान वाटतंय."
"नाही नाही. तुम्ही मला मदत नाही काही केलीत उलट सगळंच प्रकरण आणखी अवघड करून ठेवलंयत. चोरी केल्यावर चोरीचा माल तळ्यात टाकून पळून जाणारे हे कुठले चोर म्हणायचे?"
"त्यांचं वागणं विचित्र आहे खरं. मला असं वाटतंय की जर चोरीचा नुसताच देखावा करण्यासाठी म्हणून त्या वस्तू चोरल्या असतील तर अर्थातच चोरांना त्या नको होतील आणि कुठल्यातरी मार्गाने चोर त्यांची विल्हेवाट लावू पाहतील. "
"पण तुम्हाला असं का वाटलं?"
"मला असं वाटलं खरं. असं बघा,चोर जेव्हा फ्रेंच खिडकीतून आत आले तेव्हा त्यांनी ते तळं आणि त्याच्या अगदी मधोमध असणारा तो खळगा पाहिलेला होता. चोरीचा माल लपवायला त्यांना याहून चांगली जागा सुचली असती का?"
"आहा! चोरलेला माल लपवायची जागा! ही कल्पना चांगली आहे. त्या चांदीच्या थाळ्या हातातून घेऊन राजरोसपणे जायची त्यांना भिती वाटली असणार. म्हणून त्यांनी ती चांदीची भांडी तळ्यात टाकली अशा उद्देशाने की प्रकरण जरा स्थिरस्थावर झालं की गुपचुप येऊन ती भांडी घेऊन जाता येईल. तुमच्या चोरीच्या नाटकापेक्षा हा तर्क कितीतरी जास्त सयुक्तिक वाटतो की नाही?"
"खरं आहे. तुम्ही फारच चांगला तर्क मांडलाय. मला हे मान्य करायलाच हवं की माझी कल्पनाशक्ती जरा स्वैर भटकली पण त्यामुळेच आपल्याला चोरीला गेलेला मालही सापडला."
"तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. तुम्ही मोठीच मदत केली आहे मला. पण एका ठिकाणी मात्र मी अगदी सपशेल आपटलो आहे."
"आपटला आहात? "
"हो. आज सकाळीच न्यू यॉर्कमध्ये रँडल गँगला पकडलंय."
"अरे बापरे! मि. हॉपकिन्स, याचा अर्थ असा की काल रात्री केंटमधे त्या लोकांनी एका माणसाचा खून केला या आपल्या तर्काला आता अगदी सुरुंग लागला म्हणायचा "
"हो ना ! हा म्हणजे अगदीच अनर्थ झालाय. अर्थात अशा तीन तीन चोरांच्या आणखी बऱ्याच टोळ्या असू शकतील.किंवा पोलिसांना अज्ञात अशी ही अगदी नवी टोळी सुद्धा असू शकेल."
"हो असं असणं अगदी सहज शक्य आहे. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही?"
"या सगळ्याच्या मुळाशी पोचल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही मला काही क्लू देऊ शकाल का?"
"तो तर मी तुम्हाला आधीच दिलाय की! ते चोरीचं नाटक..."
"हो पण कशासाठी?"
"हा प्रश्न आहे खरा. पण जर या शंकेमध्ये काही तथ्य असेल तर आपल्या हुशारीच्या बळावर तुम्ही ते नक्की शोधून काढाल याबद्दल मला अगदी खात्री वाटते.
तुम्ही जेवायला थांबणार नाही म्हणताय? हरकत नाही, मात्र या केससंदर्भात काय काय होतंय ते आम्हाला दोघांना अगदी जरूर कळवा बरं का...बराय...."
आमची जेवणं झाली आणि नंतरची आवराआवरी झाल्यावर होम्स पुन्हा या केसबद्दल विचार करण्यात गढून गेला. आपला पाइप पेटवून आपले पाय शेकोटीच्या अगदी जवळ ठेवून तो बसला होता. अचानक त्याने आपल्या घड्याळात पाहिलं आणि तो म्हणाला,
"वॉटसन, काहीतरी घडणारेय.."
"कधी?"
" आता काही मिनिटात... मगाशी मी हॉपकिन्सशी फारच वाईट वागलो असं तुला वाटत असेल ना?"
"माझा तुझ्यावर विश्वास आहे."
"वा! अगदी परिस्थितीजन्य उत्तर आहे. आता असं बघ, मला जे काही माहिती आहे ते अधिकृत नाही. त्याला जे माहितिये ते मात्र अधिकृत आहे. मी याचा स्वतःच्या पद्धतीने न्यायनिवाडा करू शकतो. त्याला मात्र अशी सवलत नाही. त्याला आपली सगळी माहिती सरकारला जाहीर करावीच लागेल नाहीतर त्याने कर्तव्यात कसूर केल्यासारखं होईल. म्हणून जोवर माझं मन या सगळ्याबद्दल पक्कं होत नाही तोवर त्याला या सगळ्या त्रासात पाडायचं नाही असं मी ठरवलंय."
"पण हे सगळं कधी होणार?"
"ती वेळ आता अगदी येऊन ठेपली आहे. एका अत्यंत नाट्यपूर्ण अशा केसच्या शेवटच्या अंकाचा आता तू साक्षीदार होणार आहेस."
तितक्यात जिन्यावर पावलं वाजली. आमचं दार उघडलं आणि आजवर आम्ही पाहिलेला मानवजातीचा सगळ्यात उजवा नमुना ठरावा असा एक माणूस आत आला. तो तरुण होता. उंचीने ताडमाड होता. त्याच्या मिशीचे केस सोनेरी होते. डोळे निळे होते. उष्ण कटिबंधातल्या सूर्यप्रकाशामुळे रापून त्याची त्वचा खरपूस तांबडी झाली होती. त्याच्या ठामपणे पडणाऱ्या पावलांमधून त्याच्या विशाल देहात ठासून भरलेला सळसळता उत्साह आणि तत्पर अशी कार्यशक्ती दिसून येत होती. खोलीत येऊन त्याने दार लावून घेतलं. एखाद्या अनावर होऊ पाहणाऱ्या भावनेला आळा घालण्याच्या प्रयत्नात असल्यासारखा धापा टाकत आणि  मुठी वळत तो आमच्याकडे पाहत उभा राहिला.
"कॅप्टन क्रोकर, बस. तुला माझी तार मिळालेली दिसतेय."
तो एका खुर्चीत टेकला आणि प्रश्नार्थक नजरेने त्याने आम्हा दोघांकडे आळीपाळीने बघायला सुरुवात केली.
"मला तुमची तार मिळाली. तुम्ही सांगितलेल्या वेळेला मी इथे हजर झालो आहे. तुम्ही आज आमच्या कंपनीच्या ऑफिसात येऊन गेलात हेही मला ठाऊक आहे. आता या प्रकारापासून पळून जाण्यात काही अर्थ नाही. तेव्हा काय वाईट बातमी असेल ती लवकर देऊन टाका. काय करणारात तुम्ही माझं? मला अटक करणारात? अहो, मांजर जसं उंदराशी खेळतं तसं माझ्याशी खेळू नका. बोला लवकर बोला."
"त्याला एक सिगार दे. कॅप्टन क्रोकर, तुझा राग तिच्यावर काढ आणि आपला संताप आटोक्याबाहेर जाऊ देऊ नकोस. तू जर एखादा मामुली गुन्हेगार असतास तर मी तुझ्याबरोबर इथे सिगारेट ओढत बसलो नसतो हे नीट लक्षात ठेव. माझ्याशी सरळ वागलास तर ते तुझ्या हिताचं ठरेल. माझ्याशी छक्केपंजे खेळलास तर मात्र तुझी धडगत नाही."
"काय करून हवंय तुम्हाला माझ्याकडून?"
"काल रात्री ऍबी ग्रेंजमधे काय काय झालं ते मला खरं खरं सांग. एका शब्दाचाही फेरफार न करता.  मला या प्रकरणाची इतकी सखोल माहिती आहे की तू सत्यापासून जरा जरी भरकटलास तरी मी ही शिट्टी वाजवून पोलिसांना बोलवीन आणि तसं झालं तर हे सगळं माझ्या हाताबाहेर जाईल."
क्रोकरने क्षण दोन क्षण विचार केला. मग उन्हाने रापलेल्या आपल्या हाताची मूठ आपल्या मांडीवर आपटत तो म्हणाला, "मी हा जुगार खेळीन." त्याचा आवाज चढला होता. "एक सच्चा गोरा माणूस म्हणून तुम्ही आपल्या शब्दाला जागाल असं समजून मी तुम्हाला सगळं सांगतो. पण त्याआधी मला एवढंच म्हणायचं आहे की मी जे काही केलं त्याबद्दल मला यत्किंचितही खंत वाटत नाही किंवा पश्चात्तापही होत नाही. मला कशाचीही भिती वाटत नाही  वेळ पडल्यास मी पुन्हा अगदी असाच वागेन आणि त्या गोष्टीचा मला अभिमानच वाटेल. मेरी साठी - मेरी फ्रेझरसाठी हो मेरी फ्रेझरच. तिचं ते शापित नाव मी उच्चारूच शकत नाही.  मेरीसाठी त्या नराधमाला मी त्याच्या प्रत्येक जन्मात असाच यमसदनाला पाठवीन.   तिच्या एका स्मितहास्यासाठी मी आनंदाने मरण पत्करीन. पण तिलाच इतक्या मोठ्या संकटात लोटायला मी कारण झालो या विचाराने माझ्या काळजाचं अगदी पाणी पाणी होतं. पण मी तरी दुसरं काय करू शकत होतो? मी तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो आणि मग तुम्हीच मला सांगा की मी काय करायला हवं होतं..."
"तुम्हाला यातलं बरंच काही माहीत आहे त्यामुळे तुम्हाला हेही माहीत असेल की रॉक ऑफ जिब्राल्टर वर मी फर्स्ट ऑफिसरच्या हुद्द्यावर काम करत असताना ती आमच्या बोटीने प्रवास करत होती. तेव्हाच आमची पहिली भेट झाली. तिला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझी अशी खात्री झाली की तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीवर मी प्रेम करू शकणार नाही. प्रवासाचा एकेक दिवस पुढे पुढे सरकत गेला तसा मी तिच्यावर आणखी जास्त प्रेम करू लागलो. तिची पावलं ज्या डेकवरून फिरली त्या डेकला रात्रीच्या अंधारात खाली वाकून मी अनेकदा कुरवाळलं आहे. पण आमच्यात काही आणाभाका झाल्या नव्हत्या. तिला तर याची काही कल्पनासुद्धा नव्हती. एक चांगला मित्र म्हणून ती अगदी निर्मळपणे माझ्याशी वागत बोलत असे. हे सगळं प्रेमप्रकरण अगदी एकतर्फी होतं याबद्दलही मला अजिबात खंत नाही. तिचा प्रवास संपला तेव्हा ती अगदी मुक्त होती आणि मी मात्र स्वतःला तिच्या बंधनात कायमचा बांधून बसलो होतो."
"मी इंग्लंडला परत आलो तेव्हा मला तिचं लग्न झाल्याचं कळलं.  तिला हव्या त्या माणसाशी लग्न करायला ती स्वतंत्र होती. शिवाय संपत्ती, हुद्दा आणि सुखसमृद्धी या गोष्टींसाठीच तिचा जन्म झाला होता. या सगळ्या वैभवाला तिच्याहून लायक अजून कोणी असू शकत नाही हे माहीत असल्यामुळे तिच्या लग्नाबद्दल ऐकून मला अजिबात दुःख झालं नाही. तिला तिच्या भाग्याने सुस्थळी पाठवलंय आणि एका भणंग खलाश्याशी लग्न करण्यापेक्षा हे कितीतरी पटीने अधिक योग्य आहे अशी माझी खात्री होती. मी मेरीवर असं निःस्वार्थीपणानेच प्रेम केलंय."
"त्यानंतर तिची माझी कधी भेट होईल असं मला वाटलं पण नव्हतं. पण माझी मागची सफर संपल्यावर मला बढती मिळाली. नवी बोट सुटायला अजून दोन महिने अवकाश होता. मी माझ्या बोटीवरच्या लोकांबरोबर सायडेनहॅमला मुक्काम टाकला होता. तिथेच एक दिवस माझी आणि तिच्या मोलकरणीची- थेरेसाची गाठ पडली. थेरेसाकडून मला तिच्याबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल सगळी हकीगत समजली. तुम्हाला सांगतो मि होम्स, संतापाने माझं डोकंच फिरलं. तिच्या पायातला पायपोस होण्याची सुद्धा ज्याची लायकी नाही अशा त्या दारूबाज कुत्र्याची तिच्या अंगावर हात टाकण्याची हिंमतच कशी झाली? त्यानंतर माझी आणि थेरेसाची पुन्हा एकदा भेट झाली. त्यानंतर मी दोनदा मेरीला भेटलो. पण आमच्या भेटी तिथेच थांबणार होत्या. पण माझा निघायचा दिवस आठवड्यावर येऊन ठेपल्यावर मात्र मेरीला एकदा भेटून यायचंच असा मी निश्चय केला. थेरेसाचं मेरीवर अतिशय प्रेम आहे आणि माझ्याइतकाच त्या नरराक्षसाबद्दल तिला द्वेष वाटतो. त्यामुळे थेरेसाकडून मला त्या घराबद्दल बरीच माहिती मिळाली. तळमजल्यावरच्या आपल्या खोलीत मेरी रात्री उशीरापर्यंत वाचत बसलेली असते हे मला ठाऊक होतं. काल रात्री मी गुपचूप तिच्या खिडकीपाशी गेलो आणि खिडकीचं दार वाजवलं. तिने मला आत घ्यायला नकार दिला पण आता तीही मनोमन माझ्यावर प्रेम करतेय हे मी ओळखून होतो. इतक्या बर्फाळ रात्री तिने मला उघड्यावर राहू दिलं नसतं. तिने हळू आवाजात मला पुढच्या बाजूला मोठ्या खिडकीजवळ यायला सांगितलं. मी त्या फ्रेंच खिडकीजवळ गेलो तर ती उघडी होती. मी तिथून आत जेवणघरात शिरलो. मेरीवर माझं जिवापाड प्रेम होतं आणि तिच्या होणाऱ्या छळाबद्दल तिच्या स्वतःच्या तोंडून ऐकल्यावर तर मी मनातल्या मनात त्या सैतानाला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. जंटलमन, आम्ही दोघंही खिडकीच्या अगदी जवळ उभे होतो आणि देवाशपथ सांगतो, आम्ही कुठल्याही प्रकाराने सभ्यपणाला सोडण्यासारखं काहीही केलं नव्हतं. तितक्यात एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखा तो एकदम त्या खोलीत आला. मेरीला त्याने अतिशय अर्वाच्य अशी शिवी हासडली आणि हातातल्या काठीने तिच्या चेहऱ्यावर जोराचा प्रहार केला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी तिथे जवळच पडलेला पोकर उचलला आणि मग आमचं तुंबळ युद्धच झालं. ही पाहा त्याने केलेल्या वाराची माझ्या हातावर खूण आहे. त्याने पहिला वार केल्यावर मात्र मी मागे हटलो नाही. एखाद्या कुजक्या सडक्या भोपळ्यासारखा मी त्याला चेचून टाकला. कारण तो किंवा मी कोणीतरी एकजण दुसऱ्याचा जीव घेणार हे उघड होतं. मला माझ्या प्राणांची पर्वा नव्हती पण मेरीला असल्या पिसाळलेल्या पाशवी माणसाच्या तावडीत मी कसा काय सोडू शकणार होतो? मला सांगा यात माझं काही चुकलं का? तुम्ही दोघं जर माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतंत?"
काठीचा फटका लागल्यावर मेरीने किंकाळी फोडली होती. ती ऐकून थेरेसा खाली आली. धक्क्याने मेरी अर्धमेली झाली होती. मी टेबलावर असलेली वाइनची बाटली उघडली आणि त्यातली थोडी वाइन तिला प्यायला लावली. मग मी स्वतःही थोडी वाइन प्यायलो. थेरेसा मात्र बर्फासारखी थंड होती. ही सगळी कथा रचण्यामागे माझ्याइतकाच तिचाही हात आहे. हे सगळं दरवडेखोरांचं काम आहे असा देखावा निर्माण करायचं आम्ही ठरवलं आणि त्यासाठी मी घंटेला बांधलेला दोर कापत असतानाच थेरेसाने ती सगळी कथा पुन्हापुन्हा सांगून मेरीकडून अगदी तोंडपाठ करून घेतली.  मग मी मेरीला खुर्चीला बांधलं आणि दोरीचं दुसरं टोक ओढून तोडून घेतलं कारण दोराचं कापलेलं टोक पाहिलं असतं तर कोणालातरी संशय आला असता. मग चोरी झाली आहे असं भासवण्यासाठी मी तिथल्या काही चांदीच्या थाळ्या घेऊन तिथून बाहेर पडलो आणि मी गेल्यावर साधारण पंधरा मिनिटांनी चोरी झाली असा आरडाओरडा करायला मी त्यांना सांगितलं. ती भांडी तळ्यात सोडल्यावर मी घाईघाईने सायडेनहॅम गाठलं तेव्हा माझी खात्री झाली होती की आज मी खरोखरच काहीतरी चांगलं काम केलंय.
असं आहे सगळं. मला खुशाल फासावर चढवा पण मी एकही शब्द न बदलता संपूर्ण सत्य तुमच्यापुढे ठेवलं आहे."
काही क्षण होम्स धुराची वेटोळी सोडत राहिला. मग त्याने उठून आमच्या पाहुण्याबरोबर हस्तांदोलन केलं.
"तुम्ही खरं सांगताय यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण मला संपूर्णपणे नवीन असं काहीच तुम्ही सांगितलं नाहीये. त्या फळीवर चढून घंटेचा तो दोर तोडणारा माणूस एक तर डोंबारी असू शकतो किंवा खलाशी. आणि त्या दोरीला मारलेल्या गाठी तर एका खलाश्याशिवाय दुसरं कोणीच मारू शकलं नसतं. बाईसाहेबांचा खलाश्यांशी संपर्क फक्त त्यांच्या प्रवासादरम्यानच आला असणार. आणि  त्या माणसाला वाचवण्यासाठी ज्या प्रकारे त्यांचे प्रयत्न चालले होते त्यावरून तो त्यांच्या माणसांपैकी असायला हवा आणि त्या माणसावर बाईंचं खरोखरीच प्रेम असणार हे सगळं ओळखल्यावर मला तुझ्यापर्यंत पोचायला अजिबात वेळ लागला नाही. "
"मला वाटलं आमचं नाटक पोलिसांना सहज फसवेल."
"पोलिस त्याला फसलेच आहेत आणि माझ्या मते खरं काय आहे हे ते कधीच ओळखू शकणार नाहीत. कॅप्टन क्रोकर, मला माहीत आहे की तू अतिशय लोकविलक्षण परिस्थितीमध्ये हे कृत्य केलं आहेस. कोर्टात तुझा जीव वाचवण्यासाठी केलेला खून म्हणून तुला दोषमुक्त केलं जाईल किंवा नाही हे मला माहीत नाही. पण त्याची चिंता ब्रिटिश ज्यूरीने करावी.
ते जाऊ दे. सध्या तरी मला तुझ्याबद्दल खूपच वाईट वाटतंय. त्यामुळे येत्या चोवीस तासांच्या आत तू जर इथून नाहीसा झालास तर कोणीही तुझ्या वाटेत आडवं येऊ शकणार नाही अशी खात्री बाळग हा माझा शब्द आहे."
"पण त्याच्या नंतर हे सगळं उघडकीला येईल का?"
"अर्थात! हे सगळं उघडकीला येणारच..."
त्याचा चेहरा संतापाने अगदी लालबुंद झाला.
"असं काही तुम्ही मला सुचवूच कसे शकता? मी इथून गेल्यावर मेरी कायद्याच्या कचाट्यात सापडेल हे कळण्याइतका कायदा मलाही कळतो साहेब. मी तिला एकटीला हे सगळं भोगायला सोडून स्वतः पळून जाईन असं तुम्हाला वाटलंच कसं? मि. होम्स, माझं काय वाटेल ते झालं तरी मला त्याची पर्वा नाही. पण मेरीला मात्र यातून वाचवा हो..."
होम्सने दुसऱ्यांदा आपला हात हस्तांदोलनासाठी त्याच्या पुढे धरला.
"मी तुझी परीक्षा घेत होतो. पण दर वेळी तू एखाद्या बंद्या रुपयासारखा खणखणीत वाजतोस. माझ्या शिरावर फार मोठी जबाबदारी आहे. पण मी हॉपकिन्सला मोठा क्लू दिला आहे. आता तो क्लू समजून घेणं जर त्याच्या कुवतीबाहेरचं असेल तर मी तरी काय करणार?
तर कॅप्टन क्रोकर, आपण आता अगदी कायद्याला धरून जाऊ या. तू आरोपी आहेस. वॉटसन तू ज्यूरी मेंबर आहेस आणि  या कामासाठी तुझ्यापेक्षा जास्त लायक माणूस मी तरी पाहिलेला नाही. मी आहे न्यायाधीश. तर 'ज्यूरीतील सभ्य गृहस्था', तुझ्या मते आरोपी दोषी आहे का नाही?"
"माय लॉर्ड, आरोपी निर्दोष आहे." मी म्हणालो.
"पंचामुखी परमेश्वर असं म्हणतातच ना! जर तू दुसऱ्या एखाद्या गुन्ह्यात अडकून पकडला गेला नाहीस तर माझ्याकडून तुला पूर्ण अभय आहे. एक वर्षानंतर तू बाईंना भेट आणि तुम्हा दोघांच्या एकत्रित, उज्ज्वल आणि सुखी भविष्यकाळामध्ये आम्ही दिलेल्या आजच्या निर्णयाचं सार्थक होऊ दे."

--अदिती
(समाप्त)  
 

१: पाचामुखी परमेश्वर अशा म्हणीमध्ये इथे केवळ एकच पंच आहे हे पाहून असा स्वैर बदल करण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे.