ऍबी ग्रेंजचे 'प्रकरण' ! (१)

१८९७ सालच्या हिवाळ्यातली गोष्ट आहे. हाडं गोठवणाऱ्या, बर्फाळ थंडीत, भल्या पहाटे कोणीतरी मला हालवून जागं करत होतं. मी डोळे उघडले तर माझ्या समोर होम्स उभा होता. त्याने हातात धरलेल्या मेणबत्तीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. त्याच्याकडे पाहताच एका नजरेत मला कळून चुकलं की काहीतरी गडबड आहे.
"वॉटसन, लौकर चल. " त्याचा स्वर आतुर होता. "खेळाला सुरुवात झाली आहे. एक शब्दही बोलू नकोस. पटकन कपडे बदल. आपल्याला जायचं आहे."
दहाच मिनिटात आम्ही एका घोडागाडीतून चेरिंग क्रॉस स्टेशनच्या दिशेने निघालो. थंडीमुळे सर्दटलेल्या पहाटेच्या, धुक्यात लपलेल्या पाऊलखुणा मधूनमधून दिसत होत्या. घाईघाईने कामावर निघालेला एखादा कामकरी माणूस दुरूनच दृष्टिपथात येत होता आणि लंडन शहराच्या सुप्रसिद्ध धुक्यामध्ये तितक्याच त्वरेने नाहीसा होत होता.  होम्सने आपल्याभोवती आपला जाड कोट घट्ट ओढून घेतला होता आणि मीही तेच करत होतो. वारं खूप बोचरं होतं आणि आम्हाला काही खायलाही सवड मिळाली नव्हती. त्यामुळे आमची तोंडं बंद होती. स्टेशनवर पोचल्यावर आम्ही गरम चहा घेतला आणि केंटकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. वाफाळता चहा पोटात गेल्यावर मात्र आमच्या जिवात जरा जीव आला आणि होम्सचं बोलणं ऐकायला मी सरसावून बसलो. होम्सने आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली आणि ती मला मोठ्याने वाचून दाखवली.
"ऍबी ग्रेंज, मार्सहॅम, केंट,
३:३० ए.एम्.
मि. होम्स,
                एका अतिशय वैशिष्ट्यपूर्ण केससंदर्भात मला आपल्या मदतीची अगदी तातडीने गरज आहे. ही केस खास तुमच्या पठडीतील वाटते आहे. एका बाईसाहेबांची सुटका करण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी जशाच्या तशा ठेवण्याचा मी शक्य तितका प्रयत्न करतो. पण आपण शक्य तितक्या त्वरेने इथे येऊ शकलात तर खूप बरं होईल कारण आम्हाला सर युस्टास यांना तिथे फार काळ ठेवता येणार नाही.
आपला नम्र,
स्टॅनले हॉपकिन्स.
"आतापर्यंत हॉपकिन्सने मला सात वेळा मदतीसाठी बोलावलंय आणि त्याचं बोलावणं एकदाही निरर्थक ठरलेलं नाही. "
होम्स म्हणाला. "त्याच्या सातही केसेसनी तुझ्या संग्रहात स्थान पटकावलेलं आहे. केसेस निवडण्यातलं तुझं कौशल्य मोठं  आहे. पण त्या केसेसच्या कथा होताना त्यातला अचूकतेवर आधारित आणि शास्त्रीय प्रयोग कसे करावेत याचं प्रात्यक्षिक ठरेल असा जो गाभा असतो तो कुठेतरी हरवून जातो. प्रत्येक केसकडे केस म्हणून न बघता कथा म्हणून बघण्याचा तुझा दृष्टिकोन सनसनाटी घटनाक्रम आणि चमत्कृतींना  त्यातल्या विशुद्ध वैज्ञानिक तत्त्वांवर कुरघोडी करण्यास भाग पाडतो. मी असं म्हणत नाही की त्यात सनसनाटी घटना अजिबात असूच शकत नाहीत पण त्यातल्या वैज्ञानिक तपशिलांच्या सूक्ष्म सखोल वर्णनाइतक्या त्या घटना वाचकांच्या उपयोगाला नक्कीच येणार नाहीत ना. त्यामुळे हे सगळं मला फारसं पटत नाही."
"त्या केसेसबद्दल तू स्वतःच का नाही लिहीत मग?" मी जरासं चिडून, कडवट स्वरात विचारलं.
"नक्कीच लिहीन माय डियर वॉटसन, नक्कीच लिहीन. सध्या मला अजिबात वेळ नाही. पण तपास ही एक कला आहे आणि त्या कलेबद्दल सांगोपांग अशी माहिती देणारं पुस्तक लिहिण्यात माझ्या आयुष्याचा वानप्रस्थाश्रम मी खर्ची घालणार आहे.
आपली सध्याची केस ही खुनाची केस दिसतेय."
"याचा अर्थ तुला असं वाटतंय का की सर युस्टास मरण पावलेत?"
"हो. तसं म्हणायला हरकत नाही. या लिखाणावरून असं वाटतंय की हॉपकिन्स बराच वैतागलेला असावा. तो काही फारसा भावनाप्रधान नाही.माझा असा अंदाज आहे की रक्तपात झालेला आहे आणि आपल्याला त्या मृतदेहाची तपासणी करायची आहे. जर एखादी साधी आत्महत्येची वगैरे केस असती तर त्याने मला बोलावणं पाठवलं नसतं. 'बाईसाहेबांची सुटका' असं सूचित करते आही की ही घटना घडली तेव्हा त्या बहुधा आपल्या खोलीत कोंडलेल्या होत्या.
वॉटसन, ही मोठ्या घरची गोष्ट दिसतेय . करकरीत कागद, E.B. चा मोनोग्राम, तलवारींचा छाप, नक्षीदार पत्ता.... आपला हा मित्र त्याच्या लौकिकाला साजेसं काम करेल आणि आपली सकाळ चांगली जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नसावी. हा खून रात्री बारा वाजण्यापूर्वी झालेला आहे."
"हे तुला कसं कळलं?"
"रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक आणि वेळेचा अंदाज या दोन गोष्टींवरून. सगळ्यात आधी स्थानिक पोलिसांच पथक बोलावलं गेलं असणार. मग त्यांनी स्कॉटलंड यार्डला कळवलं असणार. मग हॉपकिन्स तिथे गेला असणार आणि त्यानंतर त्याने मला बोलावणं पाठवलं असणार. या सगळ्यात एका रात्रीचा वेळ जाईल . हे बघ चिझलहर्स्ट स्टेशन आलंसुद्धा. आपल्या शंकांची उत्तरं मिळायला आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही."
गावाकडच्या अरुंद रस्त्यावरून सुमारे दोन मैलांच्या रपेटीनंतर आम्ही एका बागेच्या फाटकापाशी पोहोचलो. एका म्हाताऱ्या गड्याने ते दार उघडलं. त्याच्या ओढलेल्या चेहऱ्यावर काहीतरी भयंकर घडून गेल्याचे भाव होते आतल्या रस्त्याच्या दुतर्फा विस्तीर्ण उद्याने आणि जुने एल्मचे वृक्ष होते. त्या उद्यानांच्या मधोमध एक बैठं पण विस्तीर्ण असं घर होतं. त्याच्या दरवाज्यातले खांब थेट एखाद्या एखाद्या पॅलाडिओ ची आठवण करून देणारे होते. घराचा मधला भाग अतिशय जुनाट आणि आयव्हीने वेढलेला होता पण वरच्या मजल्यावर मोठ्या खिडक्या होत्या आणि त्यातून आतल्या नव्या युगाच्या खुणा दिसत होत्या. घराची एक बाजू बहुधा संपूर्णपणे नव्याने बांधून काढली असावी. घराच्या दारातच आमचा तरुण इन्स्पेक्टर मित्र आतुर चेहऱ्याने आम्हाला सामोरा आला.
"मि. होम्स, डॉ.  वॉटसन, तुम्ही दोघे इथे आलात हे फार उत्तम झालं. पण जर माझ्या हातात गोष्टी असत्या तर मी तुम्हाला इतकं घाईघाईने इथे बोलावलंच नसतं. कारण शुद्धीवर आल्यानंतर बाईसाहेबांनी आम्हाला घडलेल्या घटनांबद्दल इतकं नेमकेपणाने सगळं सांगितलं की आम्हाला करण्याजोगं फारसं काहीच उरलेलं नाही. तुम्हाला त्या लुईसहॅमच्या दरवडेखोरांची टोळी ठाऊकच असेल ना?"
"ते तिघं रँडल्स ना?"
"हो तेच. बाप आणि दोघं मुलगे. हे त्यांचंच काम आहे याबद्दल काही शंकाच नाही. दोनच आठवड्यांपूर्वी सायडनहॅमला त्यांनी दरोडा घातला होता. तिथे त्यांना पाहणाऱ्या साक्षीदारांनी त्यांचं अगदी तपशीलवार वर्णन केलंय. त्यानंतर लगेचच इतक्या जवळ पुन्हा हात मारणं जरा धाडसाचंच म्हटलं पाहिजे. पण हे अगदी त्यांचंच काम आहे. या वेळी एका माणसाचा खून करण्यापर्यंत मजल गेली आहे त्यांची."
"म्हणजे सर युस्टास मरण पावलेत तर?"
"हो. त्यांच्याच पोकरने त्यांच्या डोक्यावर वार झाला आहे."
"आता येताना ड्रायव्हर म्हणाला की त्यांचं नाव सर युस्टास ब्रॅकन्स्टॉल असं आहे."
"हो. केंटमधल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक. लेडी ब्रॅकन्स्टॉल वर आहेत. त्यांच्यावर फारच भयंकर प्रसंग गुदरला आहे. मी इथे पोचलो तेव्हा त्या अगदी अर्धमेल्या अवस्थेत होत्या. मला वाटतं, तुम्ही एकदा त्यांची भेट घेऊन त्यांची कहाणी ऐका. मग आपण मिळून जेवणघराची तपासणी करू."
लेडी ब्रॅकन्स्टॉल यांच व्यक्तिमत्त्व खरोखरीच अलौकिक असं होतं. त्या विलक्षण रेखीव होत्या आणि त्यांच्यात स्त्रीत्वाचे सर्व गुण अगदी ठळकपणाने  एकवटलेले होते. त्यांचे केस सोनेरी होते आणि डोळे निळे होते. आता जरी त्यांचा चेहरा ओढलेला आणि फिकुटलेला दिसत असला तरी त्यांचा वर्ण आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाला साजेल असाच तेजस्वी असणार हे सहज कळत होतं. त्यांना झालेली इजा मानसिक आणि शारीरिक देखिल होती. त्यांचा एक डोळा चांगला लालबुंद आणि सुजलेला होता. त्यांची मोलकरीण अतिशय भक्तिभावाने ती जखम व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणाने धुऊन काढत होती. बाईसाहेब थकलेल्या दिसत होत्या. त्या एका कोचावर पडून विश्रांती घेत होत्या. पण आम्ही आत पाऊल टाकताच एका क्षणात त्यांच्या नजरेत आणि मुद्रेवर जे सावध भाव उमटले त्यावरून त्यांच्या बुद्धीला आणि मनोधैर्याला काही धक्का बसलेला नाही हे मला जाणवलं. त्यांच्या अंगावर एक निळा-चंदेरी गाऊन होता पण  एक काळा , मण्यामण्यांचा,  जेवताना  घालायचा पोषाख त्यांच्या शेजारीच ठेवलेला होता. 
"मि. हॉपकिन्स, काय काय झालं ते मी तुम्हाला सांगितलंय." त्या थकलेल्या आवाजात म्हणाल्या. " ते सगळं माझ्या वतीने तुम्हीच पुन्हा एकदा यांना सांगाल का? काही सांगायचं राहिलं असेल तर मी तसं सांगीन.  या दोघांची जेवणघरातली तपासणी उरकली का? "
"नाही अजून. आधी त्यांना आपला वृत्तांत ऐकवावा म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आलो."
"तुम्ही तिथली हालवाहालव लौकर आटोपलीत तर खूप बरं होईल. त्यांना अजून तसंच ठेवलंय आणि मी त्यांच्याबद्दल सांगतेय ही कल्पनाच अतिशय भीतिदायक आहे." असं म्हणताना त्यांच्या अंगावर एकदम शहारा आला आणि त्यांनी आपला चेहरा आपल्या ओंजळीत लपवला. तेव्हाच त्यांच्या सैलसर गाऊनच्या बाह्या एकदम कोपरापर्यंत मागे सरकल्या. होम्सच्या तोंडून एक आश्चर्याचा उद्गार बाहेर पडला.
"बाईसाहेब, तुम्हाला आणखीही जखमा झाल्या आहेत. हा सगळा काय प्रकार आहे?
त्यांच्या हातांवर दोन लालबुंद जखमांच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. त्यांनी घाईघाईने आपले हात झाकून घेतले.
"काही नाही. या जखमांचा कालच्या भीषण प्रकाराशी काही संबंध नाही. आपण उभे का? बसा ना.मी माझ्या परीने काय झाले ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करते."
"मी सर युस्टास ब्रॅकेन्स्टॉल यांची बायको आहे. साधारण एक वर्षापूर्वी आमचं लग्न झालं. आमचा संसार अजिबात सुखाचा नव्हता ही गोष्ट लपवून ठेवण्यात फारसा अर्थ नाही. तशीही ही गोष्ट मी लपवायची म्हटली तरी आमच्या शेजारपाजाऱ्यांकडून ती तुमच्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही. यात थोडी चूक माझीही होती. कारण माझं बालपण दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये अतिशय मोकळ्या आणि आनंदी वातावरणात गेलं आहे. त्यामुळे इंग्लंडचं वातावरण, इथले शिष्टाचार आणि संकेत माझ्या फारसे अंगवळणी पडलेले नाहीत. पण हे काही आमचा संसार सुखाचा नसण्यामागचं मुख्य कारण नाही. आमचा संसार सुखाचा न होण्याचं कारण म्हणजे  सर युस्टास यांचं दारू पिणं. सर युस्टास दारूच्या व्यसनाबद्दल कुख्यात होते.  असल्या माणसाच्या संगतीत एक तासभर सुद्धा राहणं अशक्य होईल.  एका संवेदनाशील आणि उत्कट वृत्तीच्या मुलीला रात्रंदिवस अशा माणसाबरोबर बांधून घातलं तर तिची काय अवस्था होईल याची तुम्ही कल्पनाच केलेली बरी. असल्या संसाराची बंधनं पाळायला लावणं हा क्रौर्याचा कळस आहे. ज्या देशात अशा प्रकारचे क्रूर कायदे अस्तित्वात आहेत त्या भूमीवर देवाचा कोप झाल्यावाचून राहणार नाही. परमेश्वर तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही.."
बोलता बोलता त्या एकदम उठून बसल्या. त्यांचे गाल संतापाने लालबुंद झाले होते आणि त्यांच्या भुवईवर झालेल्या त्या भयंकर जखमेमुळे त्यांच्या डोळ्यातली संतापाची चमक आणखीनच भीषण दिसत होती. त्यांच्या मोलकरणीने अदबशीर पण तरीही अधिकार व्यक्त करणाऱ्या हातांनी त्यांना परत मागे झोपवलं. त्या हाताचा स्पर्श झाल्यावर त्यांचा सात्त्विक संताप एकदम विरून घेतला आणि त्याची जागा आवेगाने येणाऱ्या मूक हुंदक्यांनी घेतली. जरा वेळाने त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"मी काल रात्री काय घडलं ते सांगते. तुम्हाला बहुधा हे माहीत असेल की या घरातली नोकरमाणसं नव्या इमारतीत झोपतात. घराचा मधल्या भागात भागात आम्ही राहतो ,जिथे आपण आता बसलो आहोत. मागच्या बाजूला भटारखाना आणि वर आमची निजायची खोली आहे. माझी मोलकरीण थेरेसा माझ्या खोलीच्या वरच्या खोलीत झोपते. आमच्याशिवाय इथे आणखी कोणीही नसतं आणि इथे काहीही झालं तरी तो आवाज पलीकडच्या भागात जात नाही. त्या दरवडेखोरांना हे सगळं नीट माहिती असणार नाहीतर त्यांनी असं काही केलंच नसतं."
"काल रात्री साडेदहा वाजता सर युस्टास झोपायला गेले. नोकर माणसं आधीच त्यांच्या घरी गेली होती. फक्त थेरेसा जागी होती आणि मी तिला काही कामानिमित्त बोलावून घेईपर्यंत ती वर आपल्या खोलीतच होती. अकरा वाजेपर्यंत मी याच खोलीत पुस्तक वाचत बसले होते. मग माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे  सगळं काही जागच्या जागी आहे ना हे पाहायला मी इकडेतिकडे एक फेरी मारली.  मी हे काम रोज स्वतःच करते कारण सर युस्टास यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थच नसतो. म्हणून मी आधी भटारखान्यात गेले. मग बटलर लोकांच्या जेवायच्या खोलीत, तिथून बंदुका ठेवायच्या खोलीत, तिथून बिलियर्डच्या खोलीत मग दिवाणखान्यात आणि शेवटी जेवणघरात गेले. तिथल्या खिडकीला जाड पडदे आहेत आणि ते नेहमी ओढून घेतलेले असतात. अचानक वाऱ्याची एक झुळूक माझ्या चेहऱ्यावर आली आणि माझ्या लक्षात आलं की ती खिडकी उघडी होती. मी ते पडदे बाजूला केले आणि पाहते तर माझ्यासमोर एक म्हातारा माणूस उभा होता. त्याचे खांदे रुंद होते. तो नुकताच आत खोलीत शिरला असावा. ती खिडकी बरीच मोठी आणि फ्रेंच पद्धतीची आहे. तिथून पुढे बागेकडे जाणारी वाट आहे. माझ्या हातात माझ्या बेडरूममधली मेणबत्ती होती. तिच्या प्रकाशात त्या माणसाच्या मागून आत शिरत असलेली आणखी दोन माणसं मला दिसली. मी मागे सरकले. पण एका क्षणात त्या माणसाने मला धरलं. आधी त्याने माझ्या मनगटाला धरलं आणि मग माझा गळा धरला. मी किंकाळी फोडायला तोंड उघडलं पण त्याने आपल्या मुठीने एक जबर फटका माझ्या डोळ्यावर मारून मला खाली पाडलं. मी बेशुद्ध पडले असणार कारण मी पुन्हा भानावर आले तेव्हा त्यांनी मला टेबलाजवळच्या ओकच्या मोठ्या खुर्चीत बसवून घंटेला बांधलेल्या दोरीने करकचून घट्ट बांधलं होतं. मला जरासुद्धा हालचाल करता येत नव्हती आणि माझ्या तोंडावर एक हातरुमाल बांधून ठेवला होता त्यामुळे माझ्या तोंडून आवाज फुटणं शक्य नव्हतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मला शुद्ध आली तेव्हाच सर युस्टास त्या खोलीत आले.  खालचे आवाज ऐकून त्यांना संशय आला असावा कारण ते आत येताना त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीनेच आले होते. झोपताना घालायचे कपडे बदलून त्यांनी शर्ट - पँट चढवलेली होती आणि त्यांच्या हातात त्यांची लाडकी ब्लॅकथॉर्न लाकडाची काठी होती.  ते एका माणसाच्या अंगावर धावून गेले पण तेवढ्यात त्या म्हाताऱ्या चोराने फायरप्लेसमधली निखारे सारखे करायची काठी उचलली आणि त्यांच्यावर एकच निर्घृण वार केला. एक शब्दही न उच्चारता ते खाली कोसळले आणि त्यानंतर त्यांनी एकदाही हालचाल  सुद्धा केली नाही. ते पाहून मला पुन्हा एकदा चक्कर आली. पण काही मिनिटांनंतर मी पुन्हा शुद्धीवर आले असणार. मी डोळे उघडले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी जेवायची चांदीची ताटं कडेच्या कपाटावर गोळा केली होती आणि एक वाइनची बाटलीही उघडून तिथे ठेवलेली होती. त्या तिघांच्याही हातात एक एक ग्लास होता. जसं मी तुम्हाला आधीच म्हणाले तसं, त्यातला एक म्हातारा होता आणि उरलेले दोघं तरुण होते पण त्यांना टक्कल पडलेलं होतं. तो म्हातारा माणूस त्या दोघांचा बाप असावा. ते आपापसात कुजबुजत होते.  मग ते माझ्याजवळ आले आणि मला बांधलेल्या दोराच्या गाठी अजूनही घट्ट आहेत ना याची त्यांनी खात्री करून घेतली. शेवटी त्यांनी तिथून पोबारा केला. जाताना त्यांनी ती खिडकी लावून घेतली. माझ्या तोंडाला बांधलेल्या रुमालाची गाठ सैल करायला मला चांगली पंधरा मिनिटे लागली. एकदाची ती गाठ सैल झाल्यावर मी ओरडायला सुरुवात केली. माझा आवाज ऐकून थेरेसा धावत खाली आली. मग बाकीच्या नोकरांना जागं करून आम्ही इथल्या पोलिसांना कळवलं. त्यांनी लगेच लंडनच्या पोलिसांशी संपर्क साधला. यापेक्षा जास्त मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही आणि मला अशी आशा आहे की या वेदनादायक प्रसंगातून मला परत जायला लागणार नाही."
"तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत का मि. होम्स?" हॉपकिन्सने विचारले.
"मला वाटतं बाईसाहेबांना याहून अधिक त्रास देणं बरोबर नाही. पण जेवणघरात जाण्यापूर्वी तुम्ही काय काय पाहिलंत ते मला ऐकायचं आहे." त्या मोलकरणीकडे वळून होम्स म्हणाला.   
" त्या दरवडेखोरांना घरात शिरण्याच्या आधी पाहिलं होतं. " ती मोलकरीण म्हणाली. "मी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा चांदण्यात बागेच्या फाटकाजवळ घोटाळत असलेली तीन माणसं मला दिसली पण मला त्यात फार गंभीर असं काही वाटलं नाही. साधारण तासाभराने मला माझ्या मालकिणीच्या हाका ऐकू आल्या आणि मी धावतच खाली गेले तर माझी बिचारी मालकीण खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होती आणि आमचे मालक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर आडवे पडले होते. त्यांचा मेंदू डोक्याबाहेर पडून जमिनीवर पसरला होता. ते दृश्य पाहून कोणीही बाई गर्भगळित झाली असती. पण त्या खुर्चीत बसलेली बाई कोणी सामान्य स्त्री नव्हती. ऍडलेडची मिस मेरी फ्रेझर आणि ऍबी ग्रेंजची लेडी ब्रॅकेन्स्टॉल असं तिचं नाव आहे. आजवर मी तिला भीतीने गर्भगळित होताना पाहिलेलं नाहीये . अंगावर नवऱ्याच्या रक्ताचे डाग असलेल्या अवस्थेतही ती अजिबात डगमगली नाही.   तुम्ही बराच वेळ तिची उलटतपासणी घेतली आहे आणि आता माझी मालकीण आपल्या खोलीत जाणार आहे. आणि मी डोळ्यात तेल घालून तिच्या विश्रांतीकडे लक्ष देणार आहे."
असं म्हणून आईच्या मायेने त्या मोलकरणीने आपल्या मालकिणीला त्या खोलीबाहेर नेले.
"तिने बाईसाहेबांना लहानाचं मोठं केलं आहे. तिचं नाव थेरेसा राईट. दीड वर्षांपूर्वी बाईसाहेबांबरोबर तीही इंग्लंडला आली. आजकाल अशा मोलकरणी शोधूनही सापडत नाहीत.  मि. होम्स, या बाजूने चला. " हॉपकिन्स म्हणाला.

--अदिती
(क्रमशः)