पौर्णिमा

चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमा
रातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा

चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!

रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे
नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा?

रातरांगोळी तुझी मी वाट बघते राजसा
चंद्र होऊनी पुन्हा भरशील कोरी पौर्णिमा?

बघ मला, कोजागिरीचा चंद्रही पडु दे फिका
(ऐकले हल्ली जरा करते मुजोरी पौर्णिमा)