माझी डायरी

३१ मार्च

आज उपक्रमाच्या खरडवहीत गप्पा मारताना पुण्याचा विषय निघाला आणि अभिमानाने छाती भरून आली. अरे, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे, महाराजा. सांस्कृतिक राजधानी, खायच्या गप्पा नाहीत. पुण्याचं महत्त्व त्या मुंबईच्या बनियेगिरीला काय कळणार? नुसता पैसा कमावणे हे एकच ध्येय. पुणे तिथे काय उणे, उगीच नाही म्हटलेलं. पुणे विद्यापीठ, एनसीएल, भांडारकर यादी करायला गेलो तर तास लागेल, आहात कुठे? शेवटी पैसा म्हणजेच सगळं असतं का? माणसाला इंटेलेक्चुअल बाजूही असतेच ना? हे त्या सिंध्यांना काय कळणार म्हणा, जाऊ द्या झालं.

५ एप्रिल

आज सचिनचा यूट्युबवरचा व्हिडिओ पाहिला. दिल खूश हो गया! अरे शेवटी मर्द मराठा गडी आहे. शेन वॉर्नला शारजात काय धूळ चारली होती अजून आठवतंय. काही म्हणा, क्रिकेट खेळाडू द्यावेत तर मुंबईनेच. गावसकर काय किंवा तेंडुलकर काय. हे त्या बंगाली बाबूंना किंवा मद्राशी अण्णांना जमणार आहे होय? कुठेही जमले की कंपूबाजी करायची इतकेच माहिती त्यांना. मुंबैतून हाकललं पाहिजे सगळ्यांना त्यांच्या राज्यांमध्ये. इथे येऊन आम्हाला शिकवतायत.

दुसरी चांगली बातमी. मुकेश अंबानी जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. काय सांगू, घशात हुंदकाच आला. अरे, बिल गेट्सला मागे टाकलं. बिझनेस सेन्स म्हणतात तो यालाच.

११ एप्रिल

नेटवर टवाळक्या करत होतो. नोबेलच्या साईटवर गेलो, टागोरांची गीतांजली दिसली.  ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य असताना नोबेल मिळवलं, आहात कुठे? तसेच दुसरे सी व्ही रामन. अरे लॅबसाठी पैसेही नव्हते तेव्हा कशीबशी तजवीज करून प्रयोग केले आणि रामन इफेक्ट शोधला. काही म्हणा, हिंदुत्वाची अस्मिता दिसते ती इथे. अरे आपल्या भाषा वेगळ्या आहेत म्हणून काय झालं? शेवटी आपला धर्म तर एकच ना? बस, त्या मुसलमानांना हाकललं पाहिजे इथून. एकदा ते इथून गेले की हिंदू धर्माच्या ध्वजाखाली आपण सुखाने नांदू. काही अर्थ आहे का त्यांच्या धर्माला. सगळं बरोबर उलटं. आपल्याला पूर्व पवित्र, त्यांना पश्चिम. आपण एका दिशेने वाचतो, त्यांचं नेमकं उलटं. छ्या!

२५ एप्रिल

आज लगान पाहिला. काय पिक्चर आहे यार! आमिर खान, हॅट्स ऑफ टू यू. अरे, ऑस्करला पहिल्या पाचात गेला होता, आहात कुठे? भारतीय चित्रपट म्हणजे फक्त साँग आणि डान्स नाही महाराज. आम्हीही उत्कृष्ट चित्रपट बनवतो म्हटलं. आणि लाइफटाइम का होईना, सत्यजित रेंना द्यावंच लागलं ना ऑस्कर! हे अमेरिकन्स म्हणजे ना, सगळ्या जगाला कस्पटासारखं लेखतात. ही गोरी कातडी फार मुजोर. स्वत;ला कल्चर्ड म्हणवणारे ब्रिटिश, इथे येऊन काय कल्चर दाखवलं सगळ्यांना माहितिये. शेवटी मिळवलंच ना आम्ही स्वातंत्र्य, तेही अहिंसेच्या मार्गाने!

दुसरी चांगली बातमी. गालिबने लिहिलेली गुलाम अलीची गझल किती दिवसांपासून शोधत होतो. अखेर आज मिळाली.

शौक हर रंग रकीबे, सरोसामां निकला

कैस तस्वीर के पर्दे में भी उरियां निकला

गालिबविषयी काय लिहावं. अरे गटेच्या तोडीस तोड आहे महाराज, आहात कुठे. ह्या युरोपिअन लोकांना त्यांच्या संस्कृतीचा फार अभिमान. आमचीही आहे म्हटलं दोन हजार वर्षांची संस्कृती.

११ मे

आज हॅम्लेट संपवलं आणि काही वेळ स्तब्ध बसून राहिलो. काय ताकद आहे या माणसाच्या लिखाणात. आणि चारशे वर्षांनंतरही हे तितकंच रेलेव्हंट वाटत हे विशेष. संस्कृतीचा वारसा म्हणतात तो यालाच. हे त्या अमेरिकन लोकांना काय कळणार म्हणा, उणीपुरी दोन-तीनशे वर्षांची संस्कृती. आणि तीही कुणाची, बहुतेक सगळे बाहेरून आलेले इमिग्रंटस. दुसरं काय होणार? आणि तरी आपले भारतीय जातच आहेत, ग्रीन कार्ड घ्यायला. ह्या लोकांना देशाभिमान वगैरे काही भावनाच नाहीये का?

२७ मे

आज यूट्यूबवर नील आर्मस्ट्राँगचा व्हिडिओ पाहिला आणि अंगावर अक्षरशः शहारे आले. वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जायंट स्टेप फॉर अ मॅन काईंड. चंद्रावर माणूस उतरवला, महाराजा. आहात कुठे? काही म्हणा, वर्क कल्चर असावं तर अमेरिकेचं. अरे उण्यापुर्‍या दीड-दोनशे वर्षात केवळ मेहनतीवर हे साम्राज्य उभे करायचं म्हणजे काय चेष्टा आहेत का? आणि तेही कोण, तर जगभरचे निर्वासित. उगीच नाही इथून ब्रेन ड्रेन होत. अरे राहिलंय काय या कंट्रीमध्ये. करप्शन आणि ब्युरोक्रसी? छ्या, काही अर्थ नाही राहिला.

६ जून

आज मुंबईचा एक मित्र आला होता. आल्या आल्या सुरू. काय तुमचं हे पुणं. चितळे १२ ते ४ दुकान काय बंद ठेवतात. म्हटलं, बॉस, पुण्याविषयी एक शब्द ऐकून नाय घेणार. अरे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे, महाराजा. खायच्या गप्पा नाहीत. पण हे तुमच्या मुंबैच्या बनियेगिरिला काय कळणार म्हणा, जाऊ द्या झालं...

हॅम्लेट