'लोकसत्ता' मध्ये राजीव भोसेकर यांची उचलेगिरी

आज, १० नव्हेंबर रोजी, 'लोकसत्ता'च्या मुंबई वृत्तान्त या पुरवणीत छापून
आलेला डॊ. राजीव भोसेकर यांचा "कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन" हा किशोर
कुमारवरील लेख बराचसा श्री. शिरीष कणेकर यांच्या "यादों की बारात" या
संग्रहातील "हम है राही प्यार के" या किशोर कुमारवरील लेखातून सरळ-सरळ आणि
कणेकरांचा नामोल्लेख न करता उचललेला आहे. वाक्यंच्या वाक्यं, काही
तशीच्या तशी व काही किरकोळ फेरफार करून भोसेकरांनी बिनदिक्कत वापरलेली
आहेत. खाली उदाहरणं देत आहे. कणेकरांची वाक्यं लाल रंगात
भोसेकरांची निळ्या रंगात आहेत.

'आंदोलन'
ते 'शाब्बास डॆडी' या ७४ चित्रपटांत भूमिका, अनेक नशीली, रसीली, फडकती
गाणी, मोजकं पण नावीन्यपूर्ण संगीत, चार विवाह, चिकटपणाच्या व
तऱ्हेवाईकपणाच्या सुरस कथा व घमेलंभर बदनामी ही किशोरकुमार गांगुली या
अष्टपैलू हिऱ्याची गेल्या तीस वर्षातली हिंदी चित्रसृष्टीतली कमाई आहे.

'आंदोलन' ते
'शाब्बास डॆडी' या ७४ चित्रपटांत भूमिका, अनेक नशिली, रसिली फडकती गाणी.
मोजकं पण नावीन्यपूर्ण संगीत. चार विवाह, तऱ्हेवाईकपणाच्या सुरस कथा ही
किशोरकुमारची गेल्या तीस वर्षांमधील हिंदी चित्रपटसृष्टीतील कमाई आहे.

या सोनपुतळ्याला
फिल्मवाल्यांनी फारसं सीरियली घेतलंच नाही. कारण मुळात त्यानंच स्वत:ला
सीरियली घेतलं नाही. उछलकूद करण्याची उपजत आवड होती.ती नैसर्गिकरित्या कॅमेऱ्यापुढे केली. प्रेक्षकांना ती रुचली म्हणून हा गात राहिला.देवानं
गाता गळा दिला होता. सहज गाऊन गेला. ऐकणारे खूष होत राहिले म्हणून हा गात
राहिला.

तसे या अष्टपैलू
हिर्यासारख्या अष्टपैलू कलाकाराला  फिल्मवाल्यांनी कधीही गंभीरपणे घेतलंच
नाही. कारण मुळात तो स्वत: गंभीर नव्हता. मौजमस्ती करण्याची त्याला
नैसर्गिक आवड होती, ती त्याने नैसर्गिकरित्या कॅमेऱ्यापुढं आणली.
प्रेक्षकांना ती रुचली. गाता गळा होता, प्रतिभा होती, प्रत्येक गाणे सहज
गाण्याची क्षमता होती. प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत गेल्यामुळे तो
गात गेला.

खेमचंद प्रकाशकडे 'जगमग जगमग करता निकला' सैगल ढंगात गायला. तृप्त खेमचंदनं आशीर्वाद दिला, - 'दुसरा सैगल होशील.'


एकदा खेमचंद प्रकाशकडे 'जगमग जगमग करता निकला' हे गाणे त्याने सैगलच्या ढंगात गायले. तृप्त झालेल्या खेमचंदने त्याला आशीर्वाद दिला.

किशोरकुमारनं 
पडदाप्रवेश केला तेव्हा दादामुनी, दिलीप, राज व देव यांनी अवघा
प्रेक्षकवर्ग आपसात वाटून घेतला होता....आपला प्रेक्षकवर्ग त्यानं (किशोर कमारनं)
हिसकावून तयार केला. पण तो टिकवण्यासाठी त्यानं कसलेच प्रयास केले नाहीत.
कारकीर्द नीट 'प्लॆन' करायची असते हे त्याच्या गावी नव्हतं.



किशोरकुमारने जेव्हा
चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तेव्हा अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, देव
आनंद इत्यादी प्रतिभासंपन्न कलाकारांची धूम होती. अशा परिस्थितीतही
किशोरकुमारने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार केला. परंतु कारकीर्द नीट
प्लॆन करायची असते हे त्याच्या गावी नव्हतं.

पण अमीर आणि फकीर दोघांच्याही काळजाला भिडेल अशी काही तरी विलक्षण गोष्ट किशोरच्या साध्यासुध्या वाटणाऱ्या आवाजात आहे.


"अमीर" आणि "फकीर" दोघांच्याही काळजाला भिडेल अशी काहीतरी विलक्षण गोष्ट किशोरच्या साध्यासुध्या वाटणाऱ्या आवाजात आहे.

परंतु
'सार्वभौम' रफीला किशोरनं मोडीत काढावं ही गोष्ट माझ्या आकलनापलीकडची
आहे....'आराधना'च संगीत मस्त होतं व किशोर गायलाही झकास.पण एका
'आराधना'च्या जोरावर किशोरनं रफीची जागा घ्यावी?


सार्वभौम
गणल्या जाणाऱ्या रफीला किशोरनं आव्हान दिलं, आराधनाच्या द्वारे,
'आराधना'च्या जोरावर किशोरनं रफीची जागा घेतली.'आराधना'चं संगीत मस्त होतं
व किशोर त्यात गायलाही झकास.


काय
असेल ते असो, त्यानंतर कुठल्याही नायकानं गाण्यासाठी म्हणून आ वासला की
आतून किशोरचा आवाज उमटू लागला. एकाही संगीतकाराचं त्याच्यावाचून गाणं
वाजेना.

प्रत्येक नायकाच्या तोंडातून किशोरकुमारचा आवाज उमटू लागला. एकाही संगीतकाराचं त्याच्या वाचून गाणं वाजेना.


चुका मात्र डॊक्टर मजकुरांनी स्वयंप्रद्न्येने केल्या आहेत आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. डॊक्टर भोसेकर म्हणतात,
"हृषिकेश मुखर्जींनी 'आनंद' साठी किशोरलाच नजरेसमोर ठेवला होता. किशोर हा 'आनंद' साकार करणार्या राजेश खन्नाचा जणू आवाजच बनला होता."
'आनंद' चित्रपटातील राजेश खन्नावर चित्रित "ज़िंदगी कैसी है पहेली", "कहीं
दूर जब दिन ढल जाये" व "मैने तेरे लियेही सात रंगके सपने चुने" ही गाणी
अनुक्रमे मन्ना डे, मुकेश व मुकेश यांनी गायलेली आहेत ! आराधना (१९६९)
नंतर किशोर कुमार हा राजेश खन्नासाठी पार्श्वगायक म्हणून ठरून गेल्यासारखा
असतानाही 'आनंद' (१९७१) मध्ये संगीतकार सलिल चौधरी व दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी मन्ना डे व मुकेश
यांचा यशस्वीपणे वापर केला हे विशेष.

ज्या दैनिक 'लोकसत्ता'मध्ये कणेकरांनी अनेक वर्षं नोकरी केली,
स्तंभलेखन केलं त्याच 'लोकसत्ता'त त्यांचे लिखाण दुसऱ्याच्या नावावर छापून
यावं हे त्यांचं दुर्दैव. आपल्या सुमार संपादकीयांतून जगाला रोज नैतिकतेचे डोस पाजणाऱ्यांना आपल्या पायाखाली काय जळतय याची कल्पना नाही ? की हा विषय गांधी घराण्याशी संबंधित नसल्यामुळे परवा नाही ?