खवय्यांचं इंदूर

लोक जगण्यासाठी खातात, पण इंदूरचे लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदुरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि या किश्श्यांत कणभरही अतिशयोक्ती नाही हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेशी बांधील नाही. त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं (किमान इंदूरमध्ये आल्यानंतर तरी) कारण नाही.

महाराष्ट्रात सकाळी नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये विविध पदार्थ असतात. काही ठिकाणी मिसळ खूप प्रसिद्ध आहे. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यांवर विविध प्रकारची शेव, मसाला घालून दिले जातात. काही ठिकाणी जिलबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे हे इथे समीकरण आहे. म्हणूनच प्रचंड प्रमाणात पोहे खपणारे हे भारतातील एकमेव शहर असावे. या माझ्या विधानातही कणभरही अतिशयोक्ती नाही.

इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर देख्याच नहीं, असे म्हणता येईल. कारण सराफा हा इंदुरच्या खाद्यसंस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. इथे जिवंत या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूरमध्ये मधोमध होळकरांचा राजवाडा आहे. या राजवाड्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने दुकाने आहेत. यात कपडे, सराफांची दुकाने अर्थातच जास्त आहेत. पुढे गेल्यास सर्व सराफ बाजार लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे. येथे सराफी दुकाने बंद झाली की रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थांची दुकाने लागण्यास प्रारंभ होतो. ही दुकाने रात्रभर उघडी असतात. त्यामुळे हा भाग रात्रभर अगदी जिवंत असतो. चहल पहल रात्रभर सुरू असते. आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकाने नसतात. वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही.

इथल्या विजय चाटभंडारचे खोब्रा पॅटीस, बटला (वाटाणे) पॅटीस याशिवाय इतर पॅटीसचे प्रकार म्हणजे अप्रतिम. याच दुकानाच्या समोर असलेल्या जॉनी हॉटडॉगची (हिंदीत हाटडाग) छोले टिकिया, हॉटडॉग प्रसिद्ध आहेत. सराफ्याच्या आत घुसल्यास जोशी का दहीवडा हे दुकान लागेल. माझ्यासारख्या खाण्यावर नितांत प्रेम करणाऱ्यानेही याच्याइतका अप्रतिम दहीवडा आजपर्यंत खाल्लेला नाही. निव्वळ अप्रतिम एवढ्या शब्दातच त्याच्या चवीचे वर्णन करता येईल. या वडेवाल्याचीही वडा देण्याची विशिष्ट पद्धत आहे. पत्रावळीच्या वाटीत तो वडा काढतो. त्यावर भरपूर दही घालतो आणि नंतर त्यावर विविध मसाले घालतो. पण हे विविध प्रकारचे मसाले त्याच्या एकाच हाताच्या विविध बोटात असतात. आणि तो बरोब्बर त्यातील एकेक एकावेळी घालतो. हे प्रमाण कधीही कमी जास्त आजवर झालेलं नाही. शिवाय हे सर्व मसाले घालत असताना पत्रावळीची वाटी तो उंच फेकून पुन्हा झेलत असतो. हे करताना आजवर ही वाटी कधीही पडलेली नाही. या सराफ्यात फिरताना मक्याचा कीसही मिळतो. त्याची चवही फारच छान लागते. याशिवाय कचोरी, सामोसे हे येथील पदार्थही प्रसिद्ध आहे.

[float=font:chakra;color:FF7B11;size:17;background:ffffff;place:top;]पाणीपुरीवर बंदी घातल्यास इंदुरी लोक तडफडून मरतील असे माझ्या ऐकण्यात आले आहे. आपल्याकडे वडा पाव जसा यत्र तत्र सर्वत्र मिळतो, तेच येथे पाणीपुरीचे आहे.[/float] अगदी पाच रुपयाला दहा पुऱ्यांपासून पाच रुपयाला पाच पुऱ्यांपर्यंत त्याची रेंज असते. या पाणीपुरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शक्यतो तिखट पाण्याबरोबरच खातात. चिंचेचे आंबटगोड पाणी सहसा त्यात घातले जात नाही. ही पाणीपुरी खाल्ल्याशिवाय इंदूर सोडणे महापाप. मला स्वतःला पूर्वी पाणीपुरी फारशी आवडत नव्हती. (कारण पाणीपुरीने पोट भरू शकते यावरच विश्वास नव्हता.) पण येथे आल्यानंतर पाणीपुरी भयानक आवडायला लागली आहे. येथील दहीपुरीही क्लास. इंदुरच्या महात्मा गांधी रस्त्यावर सिख मोहल्ला नावाचा भाग आहे, तेथेही ही सगळी चाटची दुकाने आहेत.

याशिवाय पलासिया नावाच्या भागालगत छप्पन दुकान नावाचा भाग आहे. गेल्या वीस वर्षांपासून या भागात विविध खाण्यापिण्याची दुकाने सुरू झाली. हा भाग आता खाद्यपदार्थांचे आणखी एक केंद्र बनला आहे. राजवाडा भागात मिळणारे पदार्थ तर येथे मिळतातच, पण याशिवाय इतरही पदार्थ येथे मिळतात. राजवाडा भागात असलेल्या दुकानांनी येथेही शाखा उघडल्या आहेत. पण येथे मिळणाऱ्या जॉनीचा बेंजो हा पदार्थही आवर्जून चाखायला हवा. गोलाकार पावाच्या आत आमलेट असे त्याचे स्वरूप असते. पण चवीला ते खूपच छान लागते. संध्याकाळी येथे तरुणाईचा वेढा या भागाला पडलेला असतो. गाड्यांमधून तरुणाई इकडे तिकडे सांडत असते.

कोठारी मार्केट भागात सपना सॅंडविच नावाचे एक दुकान आहे. सॅंडविचचे एवढे प्रकार असू शकतात, हे येथे आल्यानंतर मला कळले. एकेक चव जिभेवर रेंगाळणारी. अगदी बारा रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतची सॅंडविचेस त्याच्याकडे आहेत.गोड खाणं हा इंदुरी लोकांचा वीक पॉईंट म्हणता येईल. यांच्या जेवणात काही गोड नसेल तर जेवण खरोखरच गोड लागणार नाही. माझे एक खास इंदुरी नातेवाईक सुरवातीच्या काळात कधीही फोन केला की विचारायचे आज गोड काय? आमच्याकडे गोड सणावाराला किंवा काही विशिष्ट दिवशीच करतात, हे त्यांना मला हे समजावून सांगायला खूप अवघड गेलं. नानाविध गोड पदार्थ इंदुरी लोकांची रसना भागवायला हजर असतात. रबडी, माव्याचा कीस, गुलाबजाम, रसगुल्ले, शिकंजी असे गोड पदार्थही येथे ठायी ठायी मिळतात. इंदूरचा शिकंजी हा पदार्थही प्रसिद्ध आहे. दुधासह, आंब्याचा रस, पपईचा लगदा आणि असे बरेच काही घालून हे पेय तयार केले जाते. एकदा शिकंजी खाल्ल्यानंतर आपण दुसरे काहीही खाऊच शकत नाही, एवढी ती पचायला कठीण असते. हिवाळ्याच्या दिवसात सध्या गजक हा पदार्थ दिसतोय. हे गजक म्हणजे संक्रांतीला आपल्याकडे केल्या जाणाऱ्या तिळाच्या वड्यांसारखं असतं. पण चवीला छान लागते.

मोनिकाचं आइसक्रीम आणि नेमाची कुल्फी हे दोन पदार्थ खाल्ले नाही तर तुम्ही इंदूरला आले नसतात तरी चाललं असतं, असं म्हटलं जातं. हायकोर्टासमोरच्या मोनिका आइसक्रीम या दुकानात आइसक्रीमचे जेवढे प्रकार मी पाहिले तेवढे आजपर्यंत कुठेही  पाहिलेले नाहीत.दोन मोठ्या फ्रीजमध्ये हे प्रकार मांडून ठेवले आहेत. हे प्रकार पाहिल्यानंतर यातलं कुठलं घ्यावं असा प्रश्न पडतो. चवी अगदी जिभेवर रेंगाळणाऱ्या. तीच कथा नेमाच्या कुल्फीची. ही कुल्फी आयुष्यात एकदा तरी खाल्लीच पाहिजे.

इंदूरला आल्यानंतर जेवायचं कुठे हा प्रश्न पडायचं कारण नाही. कारण इथल्या गुरुकृपा हॉटेलची प्रसिद्धी अगदी दिगंत झाली आहे. या हॉटेलमध्ये संध्याकाळी किमान शंभर दीडशेचे वेटिंग असते. ( संध्याकाळी खूप प्रतीक्षा करावी लागते, म्हणून लोक येथे पाच, सहाला सुद्धा जेवायला म्हणून येतात.) या हॉटेलमध्ये शिरेपर्यंत ते काय चीज आहे ते कळत नाही. आतमध्ये अप्रतिम सजावट. शिवाय तिन्ही मजल्यांवर वेगवेगळी. मुख्य म्हणजे येथील पदार्थ. येथे किती ओरपशील दो कराने एवढाच प्रश्न असतो. त्यातही ही मंडळी आतिथ्यशील. अगदी अगत्याने वाढणार. वाढण्यात कुठलीही कंजूषी नाही. हे आतिथ्य तुम्ही पैसे देता म्हणून नाही. अगदी आतून येतं. आणि बिल पाहिल्यावर एवढं खाल्लं तरी बिल एवढंच हा प्रश्नही तुमच्या समाधानी चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहणार नाही.

अशी ही इंदूरची खाद्यसंस्कृती. नानाविध चवींची आणि चवीनं खाणाऱ्यांची.