यशस्वी पुरुषामागे स्त्री (चांगली की वाईट)

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, अशी शब्दावली प्रचलित आहे; पण सकारात्मक अर्थाने! याचा अनुभवही अनेकांना आला असेल. पण एखाद्याची बायको किंवा प्रेयसी खाष्ट असेल तर, तो पुरुष यशस्वी होणारच नाही का? यावर प्रत्येकाची मते भिन्न असू शकतात. नव्हे असतीलच, यात शंका नाही. पत्नी खाष्ट आणि तऱ्हेवाईक असेल तर पती यशस्वी होणारच नाही, असे कुणाचे म्हणणे असेल तर अब्राहम लिंकनच्या आयुष्यात डोकवा म्हणजे डोक्‍यातील भ्रम दूर होतील. कुणी म्हणेल हा अपवाद आहे... (ज्याचा-त्याचा प्रश्‍न!)

अब्राहम लिंकनची पत्नी मेरी टॉड अशीच खाष्ट आणि तऱ्हेवाइक होती. राग, द्वेष, चीड, हाव हे सर्व 'गुण' तिच्या अंगी होते. त्यामुळे तिची जीवनकथाही वैचित्र्यपूर्ण आहे. मेरीच्या अंगी असलेल्या या 'गुणां'मुळे लिंकनला तोटाचा झाला असेल, असा दावाही कुणी करू शकते. काही बाबतीत तो खराही ठरेल. पण तिचा त्रास असूनही लिंकन अमेरिकाचा अध्यक्ष झाला, हीदेखील वस्तुस्थिती आहे. यावरून एकतर उपरोक्त शब्दावली बाद ठरवावी लागेल किंवा 'कोणत्याही यशस्वी पुरुषामागे (चांगल्या/वाईट स्वभावाची) स्त्री असते' अशी शब्दावली रूढ करावी लागेल.

असो. लिंकनच्या आयुष्यात डोकावले आहेच. त्याबाबत आणखी जाणून घेवू या.अब्राहम लिंकन हा अत्यंत गरीब होता. लाकूडतोड, शेतमजुरी, सुतारकी, बोटी धुणे, जमीनमोजणी, किराणा मालाचे दुकान चालविणे, असे अनेक धंदे त्याने केले. त्या उलट मेरीचे. ती धनिक कुटुंबात जन्मलेली आणि उच्चभ्रू शाळेत शिकलेली. आपण इतर अमेरिकन मुलींप्रमाणे नसून, अधिक गुणसंपन्न आहोत, अशी तिची समजूत होती. त्यामुळे दुसऱ्यांचे ऐकणे, इच्छांना मुरड घालणे तिला जमणे कधीच शक्‍य नव्हते.

असे हे लिंकन आणि मेरी दोन टोकांवरचे! प्रामाणिकपणा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे, ही लिंकनची बलस्थाने होती. मेरी आणि लिंकन यांचा प्रेमविवाह. लिंकन दिसायला धड नव्हता. त्यामुळे मेरीच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हते. पण त्याच्याकडे अशी काही कौशल्ये होती की त्या बळावर तो अमेरिकेचा अध्यक्ष होणार, याची मेरीला कल्पना होती. त्यामुळेच तिने लिंकनशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. (बापरे, केवढी ही दूरदृष्टी! प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या भविष्याचा अंदाज येऊ लागला तर..?)

मेरीच्या अशा स्वभावामुळे तिच्याबरोबर आपला संसार होणार नाही, असे लिंकनला वाटत होते. त्याने मेरीला पत्र लिहिले, "तू दिलेल्या विवाहाच्या प्रस्तावाचा मी विचार केला आहे; पण लग्न करण्याएवढे माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे लग्नाचा बेत आपण रद्द करू."

लिंकनने हे पत्र लिहिले खरे; पण मेरीला त्याने तोंडीच नकार द्यावा, असा लिंकनच्या मित्रांचा आग्रह होता. यात बरेच दिवस गेले. नकार देण्याचा दिवस आला, त्यादिवशी लिंकन लग्नाला होकार देऊन बसला.

लग्न झाल्यानंतर मेरी आणि लिंकन वसतिगृहात राहायला गेले. ते खानावळीत जेवत असत. मेरीला श्रीमंती थाटात जगायची सवय. तिला वसतिगृहातलं उपरं जीवन नकोसं झालं. ती सारखी कटकट, कुरकूर करू लागली. लिंकनवरही ती अनेकदा चिडत असे. एकदा तर रागाच्या भरात तिने लिंकनला गरम कॉफीचा कप फेकून मारला होता. (पुरुषांनो, बघा)

अशा परिस्थितीतही लिंकन शांत राहात असे. आपण नवऱ्यावर रागावूनही तो काहीच बोलत नाही. प्रत्युत्तर देत नाही, याचा मेरीला भयंकर राग येत असे.ती अनेकप्रकारे लिंकनला छळत असे. त्याच्या वागण्या-बोलण्यातले दोष दाखवून त्याला हिणवत असे. माणसाने कसे ताठ, छाती पुढे काढून चालावे, चालीत जोश, शान असावी, असे ज्ञान ती लिंकनसमोर पाजळत असे. तुझे कान फताडे आहेत, नाक वाकडं आहे. तू ताड-माड आहे. तुझं डोकं फार लहान दिसतं-एखाद्या लांब काठीवर लहान भांडं ठेवल्यासारखं वाटतं, अशा बोचणाऱ्या शाब्दिक टपल्याही ती मारत असे.

मेरीच्या अशा बोलण्याने लिंकन दुखावला जायचा; पण त्याने कधी मेरीवर राग काढला नाही. (किती ही सहनशीलता? आहे एवढी कुणाकडे?)मुलगा झाल्यावर लिंकनने घर विकत घेतले. घर अतिशय टुमदार होते; पण तेही मेरीला आवडले नाही. म्हणून ती त्या घराला 'दीड मजली' घर म्हणत असे. लिंकनच्या गृहजीवनाविषयी त्याच्या मित्रांना कल्पना होतीच; पण मेरीची आरडाओरड, आदळआपट हे परिसरातील लोकांनाही परिचयाचे झाले होते. मेरीच्या अशा स्वभावामुळे लिंकन सहसा कुणाला घरी बोलावत नसे.

मेरी असे वागत होती; परंतु लिंकनच्या मनात तिच्याविषयी कायमच ओढ आणि प्रेम दाटून असायचे. किंबहुना मेरीलाही लिंकनविषयी थोडे की होइना प्रेम होते, असे म्हणावे लागेल. कारण त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकून राहिले.

मेरी आणि लिंकन यांच्यातील विचारविश्‍व सर्वस्वी भिन्न होते. मेरीला राजकारणात रस होता. चैनीची तिला भयंकर हौस होती आणि सामाजिक प्रतिष्ठेची हावही! तर लिंकन अतिशय प्रामाणिक. गरीबीची जाणीव असल्याने काटकसरी होता. दोघांच्या विचारसरणीतील भेदामुळेच कदाचित मेरी लिंकनला त्रास देत असावी. मेरीच्या अशा विक्षिप्त स्वभावाचा लिंकनच्या भवितव्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. तो अमेरिकेचा अध्यक्ष झालाच. किंबहुना मेरीने त्याचा संसार नेटका (शांतपणे) केला असता, तर कुणी सांगावे लिंकन जन्मभर वकील म्हणूनच जगला असता...

आता मेरीला काय म्हणणार, चांगले की वाईट?