पिवळी पिवळी रेघ काढली खेळाच्या अंगणी ... पण कशी?

परवा फुटबॉलचा सामना पाहताना मला बरेच दिवस असलेली शंका पुन्हा उफाळून आली. खेळ चालू असताना टीव्हीवर 'आयत्या वेळी' क्रीडांगणावर एक पिवळी रेघ आखतात. हवी तेव्हा ती दाखवतात. नको तेव्हा ती पुसतात. ती रेघ क्रीडांगणाच्या जमिनीवर असते आणि खेळाडू 'तिच्यावरून' इकडे तिकडे जातात. हे कसे बरे करीत असावेत? दृश्य कुठल्याही चित्रकाचे कुठल्याही कोनातून कितीही अंतरावरून घेतलेले असो, ही रेघ बिनचुक आखतात. आंतरजालावर भ्रमंती करीत असताना ह्या शंकेचे उत्तर मला मिळाले, ते असेः

फुटबॉलच्या क्रीडांगणाची जमीन सपाट नसते. पाण्याचा निचरा होण्यासाठी ती किंचित फुगीर बनवलेली असते. ज्या क्रीडांगणावर सामना होणार असेल तेथे तंत्रज्ञ जातात आणि ह्या फुगवट्याची मोजणी लेसरच्या साहाय्याने सर्वेक्षण करून अचूक मापून घेतात. ती वापरून संगणकावर क्रीडांगणाच्या जमिनीचे नेमके प्रतिरूप तयार करतात.

आयत्या वेळी पिवळी रेघ (किंवा स्पष्टीकरणाच्या खुणा ... किंवा काहीही!) आखतात ती ह्या प्रतिरूपावर. खेळाचे चित्रीकरण करणाऱ्या प्रत्येक चित्रकाला क्रीडांगणाकडे कुठल्या कोनातून आणि किती अंतरावरून तो पाहात आहे ह्याचे (स्वयंचलित) भान असते. त्याच वेळी त्याच कोनातून त्याच अंतरावरून क्रीडांगणाच्या वर वर्णन केलेल्या प्रतिरूपाकडे पाहिले तर ते नेमके कसे दिसेल हेही त्याला सतत 'समजण्याची' व्यवस्था केलेली असते. आयत्यावेळी मूळ क्रीडांगणाचे खेळ चालू असलेले चित्र आणि प्रतिरूपाचे त्याच कोनातले चित्र ह्या दोघांचे सातत्याने मिश्रण करून त्याची मिश्र प्रतिमा पुढे निवडण्यासाठी पाठवली जाते. (अशा अनेक चित्रकांच्या अनेक प्रतिमांतून निवडून कोठली प्रेक्षकांना दाखवायची ते पुढे ठरते.) हे मिश्रण करताना प्रतिरूपातल्या आकृत्या (रेघा किंवा आकृत्या) मूळ क्रीडांगणाच्या प्रतिमेच्या 'मागे' जातील हे चित्रमिश्रणाचे काही नियम ठरवून साध्य केले जाते. (त्यामुळे खेळाडू त्या पिवळ्या रेघेवरून इकडे तिकडे जाऊ शकतात!)

खेळाच्या चित्रीकरणाचा वेग त्यातल्या कोनांचे आणि अंतराचे सतत बदल हे ध्यानात घेतले तर हे मिश्रण कमालीच्या वेगाने (सेकंदाला सुमारे ३० चित्रे ... म्हणजे तितकीच मिश्रणे!) कसे बरे साध्य केले जात असेल ह्याचा अचंबा वाटल्यावाचून राहत नाही.

वर वर्णन केलेल्या चित्रमिश्रणाच्या नियमात मिश्रण करतेवेळी प्रत्येक चित्रपेशी ही क्रीडांगणाच्या जमिनीवरची आहे की खेळाडूंच्या अंगावरची / कपड्यांवरची आहे हे तिच्यात असलेल्या रंगाचे पृथक्करण करून ठरवले जाते. जमिनीचा हिरवारंग आणि इतरत्र असलेल्या हिरव्या रंगाच्या छटा ह्यांतला सूक्ष्म फरकही ह्या पृथक्करणासाठी पुरतो. मात्र पेचप्रसंग निर्माण होतो तो जेव्हा चिखल असेल त्यावेळी. अशावेळी पिवळी रेघ जमिनीवरच्या चिखलावरून जायला हवी मात्र खेळाडूंच्या कपड्यांवरच्या चिखलावरून जायला नको! कपड्यांवर चिखल कमी असेल तर हाही प्रसंग निभावून जातो. पण कपडे चिखलाने माखलेले असले तर असा विवेक कठीण झाल्याने त्या दिवशी पिवळी रेघ दाखवायची नाही असा निर्णय घ्यावा लागतो!

अमेरिकी फूटबॉलप्रमाणेच फुटबॉल आणि बेसबॉलच्या क्रीडाचित्रीकरणातही अशा युक्या वापरात आहेत असे कळते. फर्स्ट अँड टेन लाईन

 असे ह्या तंत्राचे नाव असून ती स्पोर्टव्हिजन नावाच्या कंपनीची निर्मिती आहे. ह्या कंपनीला ह्या तंत्रज्ञानासाठी अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.

ही सर्व माहिती मला सायन्सलाईन सायन्सलाईन आणि स्पोर्टव्हिजनच्या वर दिलेल्या संकेतस्थळावर मिळाली. चित्रेही मी त्यात्या ठिकाणाहून ओढून जोडलेली आहेत.

ही माहिती मी मला उमजली तशी माझ्या परीने सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. चू. भू. द्या. घ्या.